Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मेरिटचा प्रवास : मुंबई बोर्ड ते दिल्ली बोर्ड
ठाणे, २८ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशभरात आणि ठाण्यात उमेदवारांच्या गुन्हेगारीची पाश्र्वभूमी जोरात चर्चेत असताना या वादाशी सर्वस्वी विसंगत अशी एक उमेदवारी प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिली आहे. तसे पाहिले तर या उमेदवाराचा इतिहास आणि भवितव्य या दोहोंचा संबंध थेट मेरिटशी आहे. फरक इतकाच की पूर्वी सिद्ध झालेले मेरिट मुंबई बोर्डातले आहे आणि आता राजकारणातील मेरिटची परीक्षा आहे, ती थेट लोकसभेची.. अर्थात दिल्ली बोर्डाची!
राजन राजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाण्यातील उमेदवार. पण ही ओळख तुटपुंजी आहे. महापालिकेची दगडी चाळ शाळा, मग ब्राह्मण विद्यालय असे टप्पे पार करीत महाराष्ट्र विद्यालयातून मॅट्रिकला बसलेला हा विद्यार्थी साडेतीन लाख विद्यार्थ्यांमधून १६ वा आला. त्यावेळी म्हणजे १९७४ साली मुंबई आणि पुणे बोर्ड एकत्र होते. आज मराठीच्या मुद्यावर रान उठविणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षाचा उमेदवार असलेल्या राजन राजेंचे मॅट्रिकला मराठीचे सुवर्णपदक एका मार्काने हुकले होते. पुढे मेडिकलच्या शिक्षणासाठी मुंबईतील जी. एस. मेडिकलमध्ये दाखल झालेल्या राजेंनी एम. बी. बी. एस.चे शिक्षण अर्धवट सोडून कोलशेतच्या एका कंपनीत स्टोअर्समध्ये कारकुनाची नोकरी केली. अडीचशे रुपये पगाराच्या या नोकरीत अभ्यासाखेरीजच्या बाहेरच्या विश्वाचे खरे दर्शन त्यांना झाले.
एकीकडे आध्यात्म, गीता यांच्याकडे ओढा असलेल्या राजन राजे यांना क्रिकेट- कॅरमसारखे खेळ, चित्रकला, वाद्यसंगीत यातही विलक्षण गती होती.
पुढे कायद्याची पदवी घेऊन खिमलाईन कंपनीत नोकरी करता करता युनियनमध्ये सत्याचे प्रयोग करीत राहिला.
आता ३५ वर्षांंनी राजन राजे पुन्हा परीक्षा देताहेत. या दिल्ली बोर्डाच्या परीक्षेत ‘मेरिट’च्या बरोबरीने ‘इलेक्टोरल मेरिट’ ही लागते, याची जाणीव त्यांनाही आहेच की!