Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
प्रादेशिक

‘एवढे असुरक्षित वाटत असेल तर कसाबचा खटला जंगलात चालवा’
मुंबई, २८ एप्रिल/प्रतिनिधी

ऑर्थर रोड तुरुंगातील न्यायालयात चालविल्या जाणाऱ्या कसाबवरील खटल्यात काही अतिरेकी हल्ला करून व्यत्यय आणतील, या शक्यतेमुळे न्यायालयाबाहेरून जाणाऱ्या साने गुरुजी मार्गावरील एका दिशेकडील वाहतूक बंद करण्याएवढे असुरक्षित वाटत असेल तर हा खटला दूर कुठे तरी निर्जन जंगलात चालवावा, असे भाष्य मुंबई उच्च न्यायालयाने आज केले.

दोन शेतमजूर तिहेरी खुनातून २५ वर्षांनी निर्दोष मुक्त
मुंबई, २८ एप्रिल/प्रतिनिधी

रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील आंबर्ले वडाचा कोंड या गावात २५ वर्षांपूर्वी झालेल्या तिहेरी खुनांच्या खटल्यातून सर्वोच्च न्यायालयाने नथू भाटरे आणि राम पवार या त्याच गावातील दोन शेतमजुरांची निर्दोष मुक्तता केली आहे.कनिष्ठ भूवैज्ञानिक एम. विद्यासागर रेड्डी आणि ओंकार जेरठ हे त्या भागात भूगर्भसर्वेक्षण करण्यासाठी गेलेले दोन सरकारी अधिकारी व त्यांचा वाटाडय़ा लक्ष्मण सोनावणे यांचे कुजलेले मृतदेह २५ फेब्रुवारी १९८५ रोजी आंबर्ले गावाजवळील तामखडा दरीत मिळाले होते. या खुनांबद्दल नथू भाटरे यास अलिबाग सत्र न्यायालयाने आणि राम पवार यास उच्च न्यायालयाने अपिलात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

केशवराव कोठावळे पारितोषिकाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त होणार
श्री. बा. जोशी यांचा ‘ग्रंथोपासक गौरव पुरस्कारा’ने सन्मान
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी
मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे देण्यात येणाऱ्या केशवराव कोठावळे पारितोषिकाला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्ताने मुंबईत येत्या ५ मे रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बडोद्याचे ज्येष्ठ वाङ्मयसेवक श्री. बा. जोशी यांना ग्रंथोपासक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच त्यांना सन्माननिधीही अर्पण केला जाणार आहे.

प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू निष्काळजीपणाचा कुटुंबियांचा आरोप
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी

वांद्रे येथील पाली रुग्णालय आणि नर्सिग होममध्ये सोमवारी रात्री एका महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. मात्र या मृत्यूला रुग्णालयातील परिचारिका जबाबदार असून तिने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतरच या प्रकरणी पुढील पाऊल उचलण्यात येईल, असे वांद्रे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मतदान करा- राज ठाकरे
मुंबई, २८ एप्रिल/ खास प्रतिनिधी

मुंबईत येऊन उत्तर भारतीय व बिहारी आपले मतदारसंघ बांधत आहेत. लालूप्रसादसारखे नेते एकजूट दाखविण्याचे आवाहन करत आहेत. आज जर तुम्ही सावध झाला नाहीत तर उद्याची पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

पाकिस्तानी नागरिकांना भारतीयांनी मदत करावी
‘सेंटर फॉर डायलॉग अ‍ॅण्ड रिकन्सिलिएशन’चे आवाहन
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी
पाकिस्तानात सुरू असलेल्या अराजकाच्या काळात भारतीयांनी पाकिस्तानी नागरिकांना पूर्ण मदत देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘सेंटर फॉर डायलॉग अ‍ॅण्ड रिकन्सिलिएशन’ या संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवदेनाद्वारे करण्यात आले आहे. केवळ आपल्या शेजारील राष्ट्राला बसलेली झळ असे म्हणून पाकिस्तानातील परिस्थितीकडे पाहून थंड बसू नये कारण हे सारे भारतापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या परिस्थितीचे धोके संभवतात, असे या निवेदनात म्हटले आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेतर्फे उद्या पहाटे निवडणूक स्पेशल गाडय़ा
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी

निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मध्य व पश्चिम रेल्वेने गुरुवारी पहाटे चौदा विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेवर आठ, तर पश्चिम रेल्वेवर सहा निवडणूक विशेष लोकल चालविल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेवर सीएसटी-आसनगाव, सीएसटी-बदलापूर, सीएसटी-पनवेल आणि ठाणे-वाशी या मार्गावर प्रत्येकी दोन लोकल चालविण्यात येणार आहेत.

मेरिटचा प्रवास : मुंबई बोर्ड ते दिल्ली बोर्ड
ठाणे, २८ एप्रिल/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशभरात आणि ठाण्यात उमेदवारांच्या गुन्हेगारीची पाश्र्वभूमी जोरात चर्चेत असताना या वादाशी सर्वस्वी विसंगत अशी एक उमेदवारी प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिली आहे. तसे पाहिले तर या उमेदवाराचा इतिहास आणि भवितव्य या दोहोंचा संबंध थेट मेरिटशी आहे. फरक इतकाच की पूर्वी सिद्ध झालेले मेरिट मुंबई बोर्डातले आहे आणि आता राजकारणातील मेरिटची परीक्षा आहे, ती थेट लोकसभेची..

पी. वैद्यनाथन सिटी युनियन बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष
मुंबई, २८ एप्रिल/ व्यापार प्रतिनिधी

खासगी क्षेत्रातील १०५ वर्षे जुन्या सिटी युनियन बँकेच्या संचालक मंडळाच्या शिफारशीप्रमाणे पी. वैद्यनाथन यांची बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याला भारतीय रिझव्र्ह बँकेने मान्यता दिली आहे. पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट, कॉस्ट अकाऊंटंट आणि कंपनी सेक्रेटरी असलेले वैद्यनाथन यांनी १९७४ साली इंटिग्रेटेड एंटरप्राइज या कंपनीची स्थापना केली आणि जनसामान्यांपर्यंत वित्तीय सेवा पोहचविण्याचा प्रयत्न केला. ते अनेक कंपन्यांवर संचालक तसेच सल्लागार मंडळांवर कार्यरत आहेत. एनएसडीएल आणि सेबीच्या ‘गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी’च्या शिस्तपालन समितीवरही ते कार्यरत आहेत. १९८४ ते १९९२ या दरम्यान तसेच २००३ सालापासून ते सिटी युनियन बँकेच्या संचालक मंडळावर आहेत.

इंडियन बँकेचा ३० टक्के लाभांश
मुंबई, २८ एप्रिल/ व्यापार प्रतिनिधी

इंडियन बँकेने २००८-०९ वर्षांसाठी ३० टक्के लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या २७ एप्रिल रोजी चेन्नईत झालेल्या ंसचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कंपनीने या काळात भरीव कामगिरी केली आहे. २००८-०९ आर्थिक वर्षांत कंपनीचा निव्वळ नफा २३.४५ टक्क्यांनी वाढून १२४५.३२ कोटी रुपयांवर गेला. बँकेने कॅपिटल अॅडिक्वसी रेशो १३.२७ टक्के साध्य केला आहे. बँकेच्या अनुत्पादक मालमत्ता ०.१८ टक्के एवढय़ाच आहेत. बँकेच्या समभागांची प्रति कमाई २७.९६ टक्के झाली. बँकेच्या ठेवी १८.९० टक्क्यांनी वाढल्या.

पी. वैद्यनाथन सिटी युनियन बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष
मुंबई, २८ एप्रिल/ व्यापार प्रतिनिधी

खासगी क्षेत्रातील १०५ वर्षे जुन्या सिटी युनियन बँकेच्या संचालक मंडळाच्या शिफारशीप्रमाणे पी. वैद्यनाथन यांची बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याला भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने मान्यता दिली आहे.
पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट, कॉस्ट अकाऊंटंट आणि कंपनी सेक्रेटरी असलेले वैद्यनाथन यांनी १९७४ साली इंटिग्रेटेड एंटरप्राइज या कंपनीची स्थापना केली आणि जनसामान्यांपर्यंत वित्तीय सेवा पोहचविण्याचा प्रयत्न केला. ते अनेक कंपन्यांवर संचालक तसेच सल्लागार मंडळांवर कार्यरत आहेत. एनएसडीएल आणि सेबीच्या ‘गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी’च्या शिस्तपालन समितीवरही ते कार्यरत आहेत. १९८४ ते १९९२ या दरम्यान तसेच २००३ सालापासून ते सिटी युनियन बँकेच्या संचालक मंडळावर आहेत.

प.रे.वर आज मेजर ब्लॉक लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत होणार?
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेवरील करंबेली आणि बिहाड या स्थानकांदरम्यान उद्या एका पुलाच्या फेरउभारणीसाठी मेजर ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अप मार्गावर सकाळी ९.०० ते दुपारी १३.३० या वेळेत हा मेजर ब्लॉक करण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे वांद्रे टर्मिनस-वापी पॅसेंजर संजान स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल. तसेच अन्य अनेक गाडय़ा एक ते दीड तास उशिराने धावतील, असे पश्चिम रेल्वेने कळविले आहे.