Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

जो लोकसेवेत तोच लोकसभेत !
राम नाईक (भाजप-शिवसेना)-

जयप्रकाश नगरातील गोरेगाव जिमखान्याच्या शेजारील इमारतीच्या प्रवेशद्वारावर एक फलक आहे- राम नाईक, दुसरा मजला. राम नाईक यांचे हे जनसंपर्क कार्यालय. या कार्यालयात प्रत्येकजण नेमून दिलेले कार्य करीत आहे. कुणी प्रसारमाध्यमांशी संपर्क, तर कोणी मतदारयाद्यांची मोजणी, वाटणी तर कोणी प्रचारयंत्रणेचा समन्वयक. राम नाईक दोन सत्रात प्रचार करतात. सकाळी आणि संध्याकाळी. दुपारच्या वेळेत ठराविक बैठका, दुसऱ्या दिवसाची आखणी असा त्यांचा दिनक्रम आहे. संध्याकाळी साधारण साडेचार वाजता राम नाईक यांचा रथ निघतो. या रथाला त्यांनी परिवर्तन रथ असे नाव दिले आहे. ‘मी दोन रथ तयार केले आहेत. परिवर्तन आणि राम नाईक रथ.

‘जय हो जय हो..’
संजय निरुपम (काँग्रेस) -

काँग्रेसचे उमदेवार संजय निरुपम यांची देवीपाडा, बोरिवली येथे कार्यकर्ते सकाळपासून वाट पाहत होते. त्यांच्या प्रचाराचे काम पाहणारा कार्यकर्ता निरुपम यांना फोन करून विचारणा करून ते किती वाजता पोहोचणार याचा आढावा घेतो. निरुपम पोहोचताच ‘निरुपम आगे बढो..’ घोषणा सुरू होतात. गळ्यात काँग्रेसचा ध्वज असलेले उपरणे, डोक्यावर निरुपम यांचा फोटो असलेली टोपी घालून कार्यकर्ते, महिला प्रचारयात्रेत सहभागी होतात. निरुपम रथावर चढतात आणि रथ देवीपाडा झोपडपट्टी परिसरात प्रचारासाठी निघतो.

वाडी-वस्त्यांमधील थेट-भेट
शिरीष पारकर (मनसे) -

शिरीष पारकर यांच्या दहिसर येथील कार्यालयात धावपळ सुरू होती. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या सभेची तयारी करण्यात कार्यकर्ते व्यस्त होते. स्वत: शिरीष पारकर आणि या मतदारसंघातील रहिवासी तसेच मनसेचे नेते प्रवीण दरेकर संध्याकाळी होणाऱ्या सभेची आखणी करीत होते. आज मतदारसंघात पोहोचण्यास पारकर यांना थोडा उशीर झाला होता. सभेच्या तयारीच्या सूचना ते आपल्या घरूनच देत होते.

उमेदवारांचा लेखाजोखा मुंबई वोट्सच्या वेबसाइटवर
प्रशांत ननावरे

लोकसभेच्या अवघ्या सहा जागांसाठी मुंबईतून तब्बल १२३ उमेदवार रिंगणात आहेत. म्हणजेच सरासरी प्रत्येक मतदारसंघातून २० उमेदवार. आता खासदार या एवढय़ा मोठय़ा पदासाठी कुणाला लोकसभेत पाठवायचं हा प्रश्न आपल्यासमोर उभा असणारच. या सर्वातून योग्य उमेदवार निवडायचा तरी कसा? पण घाबरून जायची गरज नाही. www.mumbaivotes.com वर तुम्ही या सर्वाच्या प्रोफाईल्स तपासू शकताच, पण त्याचबरोबर उमेदवारांचा पाच-सात मिनिटांचा व्हिडीओ इंटरव्यूही पाहू शकता. जवळपास १२० विद्यार्थ्यांच्या मदतीने चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर हा लेखाजोखा सर्व मतदारांसाठी तयार केला गेलाय.

एका त्रस्त मतदाराचे उमेदवारांना थेट प्रश्न!
प्रिय उमेदवार,

विविध योजना राबवूनही दरवर्षी देशाच्या लोकसंख्येत किमान दोन कोटींची भर पडतेय. त्यावर आता तरी काही ठोस उपाय योजले जाणार आहेत का? कारण लोकसंख्यावाढ हे सर्व समस्यांचे मूळ आहे. काही जणांच्या निष्काळजीपणाची किंमत साऱ्या देशाला मोजावी लागत आहे.
आम्हाला काय मिळणार हा मतदारांचा प्रश्न असतो, पण त्यांना त्यांच्या जबाबदारीची कोण जाणीव करून देणार? कुणीही, कुठेही कचरा टाकतो, थुंकतो, लघवी करतो, शौचास बसतो.

‘मराठी साहित्याच्या इंग्रजी अनुवादाला अमेरिकेत चांगला वाव’
प्रतिनिधी

मराठीतील दर्जेदार आणि चांगली पुस्तके इंग्रजीत अनुवादित झाली तर या साहित्याला अमेरिकेमध्ये चांगला वाव मिळेल. त्यासाठी मराठीतील प्रकाशकांनी एकत्र येऊन असा प्रयत्न अधिक जोमाने करायला पाहिजे, असे मत मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. पुस्तक महोत्सवात तेथील काही प्रकाशक, पुस्तक विक्रेते यांच्याशी चर्चा करताना त्यांनीही मराठी साहित्य, प्रकाशित होणारी पुस्तके याबद्दल उत्सुकतेने विचारणा केली. त्यातूनच असे लक्षात आले की, मराठीतील काही निवडक आणि दर्जेदार साहित्य इंग्रजी भाषेत अनुवादित झाले तर त्याला तिकडे चांगला प्रतिसाद मिळू शकेल.

उदयोन्मुख कलाकार रंगवणार ‘आरोही’ संध्याकाळ
प्रतिनिधी

पंचम निषाद या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोही’मध्ये उदयोन्मुख कलाकारांची अदाकारी पाहायला मिळणार आहे. येत्या १ व २ मे रोजी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भारतभरातील नवनवीन गायक-वादकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. यात धारवाड येथील गायक दत्तात्रय वेलणकर, सतारवादक अदनान खान, आसाम येथील गायिका मधुपर्णा वैद्य, हुबळीमधील योगेश हंसवाडकर (मेवाती घराणे), मुंबईतील व्हायोलिनवादक रागिणी व नंदिनी शंकर आणि अर्शद अली खान (किराणा घराणे) यांचा समावेश आहे. पंचम निषादचे संचालक शशी व्यास म्हणतात की, भारतीय शास्त्रीय संगीतातील नवीन ट्रेंड ऐकण्याची संधी ‘आरोही’च्या निमित्ताने रसिकांना मिळते. या माध्यमातून पडद्यामागे असलेली गुणवत्ता रसिकांसमोर येते. या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पंचम निषाद (२४१८८४९४) किंवा ऱ्हिदम हाऊस (२२८४२८३५) यांच्याशी संपर्क साधावा.

शरद राव यांचे कार्यकर्ते काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणार
प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व काँग्रेस पक्षाने बेस्ट व महापालिका कामगारांसह टॅक्सी-रिक्षा चालक, फेरीवाले यांच्याविरोधात धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. अशा विघातक निर्णयांमुळे सर्वसामान्य कामगार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीत विलासराव देशमुख व काँग्रेस पक्षाला धडा शिकविण्यासाठी मुंबई व परिसरातील सर्व काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय शरद राव यांच्या ‘हिंद मजदूर किसान पंचायती’ने घेतला आहे. संघटनेचे महासचिव शंकर साळवी व उपाध्यक्ष उदय अमोणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. ‘हिंद मजदूर किसान पंचायती’च्या पदाधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील विविध पदांचे राजीनामे दिले होते. परंतु, हे राजीनामे काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करता यावे, यासाठी दिले आहेत. मुंबई व परिसरातील काँग्रेस पक्षाच्या विरोधातील उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मात्र सकारात्मक प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात प्रचार करीत असल्याचा राग मनात धरून आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून त्यांच्यावर आकसाने गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

कामगार दिनी ‘बेडर वर्दीवाला' पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी

शहीद पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्या जीवनावर आधारित ‘विजय साळसकर बेडर वर्दीवाला' या जगदिश भुवड लिखीत पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार १ मे रोजी शिवाजी मंदिर-दादर येथे संध्याकाळी ५ वाजता केले जाणार आहे. यावेळी ‘दहशतवादाला प्रत्युत्तर-शिवाजी महाराजांची रणनीती' या विषयावर डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच ग्लोबल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च ट्रस्ट व स्टडी सर्कलच्या युवा उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमात २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा तसेच वीरयोद्धांचा यावेळी गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, शालेय शिक्षणम मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अपारंपरिक ऊर्जा व फलोत्पादन मंत्री विनय कोरे, आमदार बच्चूभाऊ कडू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्व. कृष्णराव केतकर यांच्या कलादालनाचे महाराष्ट्रदिनी उद्घाटन
प्रतिनिधी

ज्येष्ठ चित्रकार स्व. कृष्णराव केतकर यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या कलादालनाचे उद्घाटन शुक्रवार १ मे रोजी संध्याकाळी सहा वाजता डोंबिवली एमआयडीसीतील ज्येष्ठ शिल्पकार भाऊ साठे यांच्या शिल्पालयात करण्यात येणार आहे. यावेळी निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या मीनल बजाज उपस्थित राहणार आहेत. यावेळी जगद्विख्यात चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन १ ते ७ मे या कालावधीत शिल्पालयात आयोजित केले आहे. त्यात कृष्णराव केतकर, गोपाळ देऊसकर, नेत्रा साठे, ज. द. गोंधळेकर, निवेदिता लिमये, मुरलीधर आचरेकर, अल्पना लेले यांच्या चित्रांचा समावेश आहे. हे प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत रसिकांना खुले आहे, अशी माहिती शिल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीरंग साठे यांनी दिली. संपर्क-शिल्पालय, ए-१३२, एमआयडीसी, फेज-१, डोंबिवली, दूरध्वनी-९५२५१-२४४३०९१.