Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

सातारा येथील इलेमेंटस् ऑफ नेचर कॉन्झव्‍‌र्हेशन संघटनेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निसर्ग छायाचित्र स्पर्धेत नगर येथील वृत्तछायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल (इन्सेटमध्ये) यांच्या पर्यावरण जागृतीविषयक छायाचित्रास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

जितेंद्र अग्रवाल यांच्या छायाचित्रास पारितोषिक
नगर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

सातारा येथील इलेमेंटस् ऑफ नेचर कॉन्झव्‍‌र्हेशन असोसिएशन (एन्का) या संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निसर्ग छायाचित्र स्पर्धेत येथील वृत्तछायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल यांच्या पर्यावरण जागृतीविषयक छायाचित्रास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
पारितोषिक वितरण ज्येष्ठ निर्माते अरुण गोडबोले, लेखक डॉ. राजेंद्र माने, निर्मल कलर लॅबचे आनंद बर्गे यांच्या हस्ते झाले. नगर शहर वृत्तपत्र छायाचित्रकार संघटना व प्रेस क्लबतर्फे अग्रवाल यांचे अभिनंदन करण्यात आले.

खरिपाचे क्षेत्र वाढणार खताचा पुरेसा साठा उपलब्ध
नगर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्य़ाच्या सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ५ लाख ६३ हजार ५०० हेक्टर क्षेत्राचे पीकउद्दिष्ट निश्चित केले आहे. चांगले उत्पादन व चांगला भाव मिळाल्याने सोयाबीन व मक्याचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर वाढेल, असा विभागाचा अंदाज आहे. खरीप हंगामाच्या नियोजनास आज झालेल्या कृषी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. सभापती मीराताई लांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. जिल्हा कृषी विकास अधिकारी पंढरीनाथ देशमुख यांनी हंगामातील नियोजनाची माहिती दिली.

शेवगावकरांना आता दर दोन दिवसांनी पाणी
शेवगाव, २८ एप्रिल/वार्ताहर

गावाला दर दोन दिवसांनी सुरळीत पाणीपुरवठा करण्याची ग्वाही सरपंच सतीश लांडे व उपसरपंच राहुल मगरे यांनी दिली. गावातील नळांना ऐन उन्हाळ्यात पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने गावकऱ्यांचे पाण्यावाचून मोठे हाल होत असल्याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध करताच ग्रामपंचायतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत ग्रामपंचायत सदस्यांची तातडीची बैठक घेतली.

नगर, शिर्डीची मतमोजणी एकाच वेळी प्रशासन आता ‘१६ मे’च्या तयारीत
नगर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

मतदान प्रक्रियेच्या कामातून मुक्त झालेले जिल्हा प्रशासन आता मतमोजणीच्या तयारीस लागले आहे. एमआयडीसीतील सरकारी गोदामात १६ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मोजणी एकाच वेळी होईल. त्यामुळे दोन्हींचे निकालही एकाच वेळी जाहीर होतील. त्यासाठी सरकारी गोदामाच्या मोठय़ा हॉलचे दोन भाग करण्यात आले आहेत. एकूण ३ हजार ४४२ मतदानयंत्रांमधील मतांची मोजणी करायची आहे.

जिल्ह्य़ातील २४७ गावे टंचाईग्रस्त
आढाव्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे तालुकानिहाय बैठका

नगर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

जिल्ह्य़ात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. आचारसंहितेचे सावट आणि निवडणुकीच्या वातावरणातून बाहेर न पडलेले अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे या तीव्रतेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांनी टंचाईचा आढावा घेण्यासाठी तालुकानिहाय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. जवळपास निम्म्या जिल्ह्य़ाचा दौरा त्यांनी केला असून, अकोले, संगमनेर व पारनेर तालुक्यात तुलनेत अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांना जाणवले.

मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर राष्ट्रवादी नगरसेवकाचा ठिय्या
संगमनेर, २८ एप्रिल/वार्ताहर

संपूर्ण शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. प्रभागतील नागरिकांना सुविधा दिल्या जात नाहीत. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही, असे आरोप करत राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते अविनाश थोरात यांनी आजपासून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. थोरात यांनी सांगितले की, वीजकपातीतून शहराचा पाणीप्रश्न सुटावा म्हणून पालिकेने स्वतंत्र एक्स्प्रेस फिडर वाहिनी उभारली. असे असताना शहरातल्या अनेक भागांत नागरिकांना पाणी मिळत नाही. कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यास नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरतात. विशेषत आपल्या प्रभाग १०मधील स्थिती अत्यंत बिकट आहे. नळाला पाणी येत नाही, सफाई कामगार तिकडे फिरकत नाहीत. एक-दोन वर्षांपूर्वी चालू झालेली रस्त्यांची कामे आजही अर्धवट आहेत. प्रभागातील अतिक्रमणांबाबत कारवाई होत नाही. याबाबत पालिकेकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कोणतीही दखल घेतली गेली नाही. याच्या निषेधार्थ श्री. थोरात यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर आजपासून रात्रं-दिवस ठिय्या आंदेलन सुरू केले. त्यांच्या आंदोलनास शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. सकाळी सुरू झालेल्या या आंदोलनावर रात्री उशिरापर्यंत तोडगा निघू शकला नाही.

साई संस्थानच्या कर्मचाऱ्याकडे सोन्याचे पॅडल आढळले
राहाता, २८ एप्रिल/वार्ताहर

साईबाबा संस्थानच्या कॅशकाऊंटिंगमधून गेल्या दोन वर्षांपूर्वी पैसे चोरताना पकडलेल्या कर्मचाऱ्याची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसतानाच आज आणखी एका कर्मचाऱ्याकडे या कक्षातून बाहेर पडताना सोन्याचे पॅडल आढळून आले. संस्थानच्या अधिकाऱ्यांनी ते पॅडल जमा करून घेतले. ते आपलेच असून चुकून आपल्या खिशात आल्याचा दावा हा कर्मचारी करीत असल्याची माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी सांगितले.
या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबत अधिकारी संभ्रमात असून, सायंकाळपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. संस्थान प्रशासनाने ही बाब ज्या सहजतेने घेतली, त्यावरून संबंधित व्यक्तीला पाठीशी घालण्याचा व प्रशासनाचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर एक-दोन दिवसांत चौकशी करून निर्णय घेऊ, असेही वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले. आजवर अनेकजण अशा प्रकारच्या गुन्ह्य़ात सापडले आहेत. त्यातील काहीजण निलंबित आहेत. पण सहा महिन्यांतही त्यांची खातेचौकशी पूर्ण होऊ न शकल्याने त्यांना सध्या तरी बसून पूर्ण पगार देण्यात येत आहे.

‘झिरो लोड’चा कर्जतकरांना धक्का!
कर्जत, २८ एप्रिल/वार्ताहर

महावितरण कंपनीने आज शेतकऱ्यांना विजेचा आणखी एक झटका दिला. लोकसभेची मतदान प्रक्रिया पूर्ण होताच ‘झिरो लोड’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासंदर्भात नाशिक महावितरण येथील क्षेत्रीय कार्यालयातून सर्व वीजकेंद्रांना लेखी आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार आता २४ तासांत कोणत्याही क्षणी व कितीही वेळा ‘झिरो लोड’अंतर्गत वीजकपात केली जाईल. या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र भागात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच शहरी भागाची वीजकपात पावणेआठ तासांवरून साडेपाच तास एवढी कमी केली गेली व प्रचारात लवकरच वीजकपातमुक्त महाराष्ट्र करण्याचे आश्वासने दिली गेली. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडय़ात आजपासून सक्तीचे ‘झिरो लोड’ सुरू करण्यात आले असल्याची माहिती कंपनीच्या कार्यालयातून समजली. आधीच प्रचंड उष्णता, उन्हाची वाढती तीव्रता यामुळे नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. त्यातच महावितरणने ‘झिरो लोड’चा धक्का दिला आहे.

दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी केवळ १५ रुपयांत वीजजोड
कोपरगाव, २८ एप्रिल/वार्ताहर

राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण विकास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषखालील ८५० लोकांसाठी केवळ १५ रुपयांत वीजजोड देण्यात येणार असून, ८०जणांनी या योजनेंतर्गत पैसे भरल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे शहर सहायक अभियंता एस. एस. अरबी यांनी दिली.
केवळ १५ रुपयांत वीजजोड देण्याची ही योजना आहे. त्याचा ठेका हैदराबादच्या चंदलवाडा कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात आला असून, लवकरच त्याचे काम सुरू होईल. कोपरगाव शाखेच्या उपविभागासाठी नव्याने १०० केव्हीए क्षमतेचे ५५, ६३ केव्हीए क्षमतेचे ३६ व २५ केव्हीए क्षमतेचे १८१ विद्युत रोहित्र बसविण्यासाठी मंजुरी दिली आहे. जेऊर पाटोदे, कुंभारी, चांदगव्हाण, कोकमठाण, औद्योगिक वसाहत व कोपरगाव शिवारात ही यंत्रणा बसविण्यात येईल. शहराजवळ औद्योगिक वसाहतीत ३३ बाय ११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्राचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, ५ एमव्हीए क्षमतेचे रोहित्र तेथे बसविण्याचे काम सुरू आहे.

महादजी शिंदे विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती
श्रीगोंदे, २८ एप्रिल/वार्ताहर

येथील रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयातील आठवीचे ६ व नववीचे ८ विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. या सर्व विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरमहा पाचशे रुपयांप्रमाणे इयत्ता बारावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थी व पालक यांच्या संयुक्त खात्यावर स्टेट बँकेच्या येथील शाखेत जमा केली जाणार असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. राजपुरे यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे वनमंत्री बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, प्रकाशशेठ पटवा, रवीशेठ दंडनाईक, प्राचार्य राजापुरे, उपप्राचार्य के. आर. थोरात व पर्यवेक्षक व्ही. एस. साळवे यांनी अभिनंदन केले आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी असे - इयत्ता आठवी - बाळासाहेब जगदाळे, वैभव कदम, सुयोग वाबळे, अमोल शिरोळे, मोहसीन खान, अमोल वेदपाठक. इयत्ता नववी - सागर शिंदे, प्रशांत रायकर, स्वप्नील शिंदे, अक्षय शिंदे, सागर गाडिलकर, अक्षय खेतमाळीस, अमोल शेटे, अमोल ठवाळ.

कोरडगावला तीव्र पाणीटंचाई
कोपरगाव, २८ एप्रिल/वार्ताहर

कोरडगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी मिळण्यासाठी गावकऱ्यांना सातत्याने प्रयत्नशील राहावे लागत आहे. गावासाठी टँकरचा प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, दफ्तर दिरंगाईत हा प्रस्ताव अडकला आहे. कळसपिंप्री, औरंगपूर, खंडोबानगर, तोंडोळी, मुखेकरवाडी येथेही पाणीसमस्या तीव्र आहे. कोरडगावच्या रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. विहीरमालकाची नजर चुकवून कळशीभर पाणी आणावे लागते. परिणामी विहिरींच्या पाणीपातळीत घट होऊ लागल्याने आता विहिरींची रखवालदारी करण्याची वेळ मालकांवर आली आहे. विहिरीतून पाणी शेंदण्यासाठी महिलांची जीवघेणी चढाओढ सुरू असते. तालुक्यातील तापमानानेही ४०, ४२ अंश सेल्सियसचा पारा गाठला आहे. तळपत्या उन्हात पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू आहे. तातडीने टँकर मिळण्यासाठीचा प्रस्ताव स्थानिक प्रशासनाने प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविला. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. कूपनलिकांपुढे पाण्यासाठी रांगा लागतात. मात्र, पुरेसे पाणी मिळत नाही. पाणीप्रश्न आणि उन्हाच्या झळा यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत.

दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना ‘संजीवनी’त उपचाराची सोय
श्रीगोंदे, २८ एप्रिल/वार्ताहर

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेंतर्गत काष्टी येथील संजीवनी रुग्णालयात उपचार घेता येतील. या योजनेंतर्गत संलग्नता मिळविणारे संजीवनी हॉस्पिटल हे तालुक्यातील पहिलेच रुग्णालय असल्याची माहिती संजीवनी रुग्णालयाचे संचालक डॉ. विजय मुनोत यांनी दिली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने दारिद्र्यरेषखालील नागरिकांसाठी राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना सुरू केली. या विमा योजनेमुळे अ‍ॅपेंडिक्स, गर्भाशयाच्या पिशवीतील उपचार व शस्त्रक्रिया, पित्ताशयाचे खडे, हार्निया, मूळव्याध, साथीचे विकार या आजारांबरोबरच अपघातग्रस्त रुग्णांना कॅशलेस उपचार मिळू शकतात. या योजनेंतर्गत घ्यावयाच्या उपचारांसाठी संजीवनी रुग्णालयाला संलग्नता दिली आहे. तसे पत्र एम. डी. इंडियाचे अधिकारी एस. गावडे यांनी रुग्णालयाला दिले आहे. याशिवाय राज्य सरकारने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू केलेल्या पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतील लाभधारकही काष्टी येथील संजीवनी रुग्णालयात उपचार घेऊ शकतील.

माजी विद्यार्थ्यांचा उद्या लोणीत मेळावा
राहाता, २८ एप्रिल/वार्ताहर

लोणी येथील पद्मश्री विखे महाविद्यालयात गुरुवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र विखे व प्राचार्य डॉ. एस. आर. वाळुंज यांनी दिली. महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात हा मेळावा होईल. खासदार बाळासाहेब विखे व डेटा केअर कार्पोरेशनचे संचालक अनिल म्हस्के उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाविद्यालय यंदा ३८व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. पद्मश्री विखे यांनी सन १९७१मध्ये हे महाविद्यालय उभारले. विविध पुरस्कार, तसेच ‘नॅक’तर्फे देण्यात आलेला ‘ए प्लस’ मानांकनाचा दर्जा यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगानेही क्षमताशील महाविद्यालय असा गौरव करून भरीव अनुदान

तुळजाभवानी मातेची आजपासून यात्रा
सोनई, २८ एप्रिल/वार्ताहर

नगर-औरंगाबाद मार्गाजवळील कांगोणी येथील तुळजाभवानी मातेची यात्रा उद्यापासून (बुधवारी) होणार आहे. गुरुवारी (दि. ३०) कुस्त्यांचा हगामा होणार असल्याची माहिती कांगोणी यात्रा समितीचे संघटक सखाहरी कर्डिले यांनी दिली. सकाळी कांगोणीचे युवक प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगाजलाने भवानीमातेला स्नान घालतील. विधिवत अभिषेक जालिंदर रौंदळ व छायाताई रौंदळ यांच्या हस्ते केला जाईल. बुधवार व गुरुवारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवी मंदिराजवळ पान-फूल, पुजा साहित्य विक्रीचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. गुरुवारी होणाऱ्या कुस्त्यांच्या हगाम्यासाठी नामवंत पैलवानांना निमंत्रित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची लष्कर भरती प्रकरणी नोटीस
नगर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

येथील पोलीस कवायत मैदानावर गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या लष्कर भरती प्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने लष्कराच्या सचिवांना नोटीस पाठविली, अशी माहिती जिल्हा इंटक संघटनेचे अध्यक्ष उबेद शेख यांनी दिली. ही भरती सर्वसाधारण उमेदवारांकरिता होती. तथापि, जातीच्या प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली आणि प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या मुस्लिम समाजातील काही उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. याबाबत शेख यांनी त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी भरती संचालक ब्रिगेडियर पुनिया यांना पत्र पाठवून प्रमाणपत्र मागणी व इतर पुराव्यांबाबत निर्देश दिले.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरतीप्रक्रियेत मराठा समाजाच्या उमेदवारांना राज्य सरकार जातीचे प्रमाणपत्र देते. मात्र, मुस्लिम, ब्राम्हण व इतर खुल्या वर्गातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याची तक्रार शेख यांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे केली. आयोगाने त्याची दखल घेत लष्कर सचिवांना नोटीस देऊन नगर भरती प्रकरणी चार आठवडय़ांत म्हणणे मांडण्यास सांगितले.

सराफ संघटनेतर्फे राजपूत यांचा सत्कारनगर,
२८ एप्रिल/प्रतिनिधी

व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी पकडल्याबद्दल नगर सराफ-सुवर्णकार संघटनेतर्फे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक (गृह) सुहास राणे यांच्या हस्ते राजपूत यांना गौरविण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक करून गुन्हे शोधण्याकामी व्यापारी संघटना नेहमी सहकार्य करेल, असे सांगितले. गुन्हेगारांना पकडून देणाऱ्या सराफांच्या कामाची नोंद पोलीस ठेवतील, असे आश्वासन राणे यांनी दिले. राहुरी येथील गणपती मंदिरातून चोरलेला चांदीचा मुकुट सराफ बाजारात विकण्यासाठी घेऊन आलेल्या दोन महिला व दोन मुलांना सराफ संघटनेचे सहसचिव राजेंद्र वालेकर, संतोष मुथा यांनी पकडून दिल्याची माहिती सुभाष मुथा यांनी दिली. या सराफांना बक्षीस व प्रशस्तिपत्र देऊ, असे राणे म्हणाले.

‘एटीएम संस्थेकडून नागरिकांची फसवणूक’
नगर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

एटीएम या संस्थेकडून फसविल्या गेलेल्या नागरिकांनी पतीत पावन विकास मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राम धोत्रे व सरचिटणीस राजेश भालेराव यांनी केले. नगर शहरातील चितळे रस्त्यावर असलेल्या एटीएम संस्थेने जाहिरात देऊन लोकांना लुबाडले. हा आर्थिक गुन्हेगारीचा मोठा प्रकार आहे. फसविल्या गेलेल्या लोकांनी संघटनेशी संपर्क साधावा, तसेच पोलिसांतही तक्रार द्यावी. संघटना या लोकांसाठी संघर्ष करून न्याय मिळवून देईल, असे पत्रकात म्हटले आहे.