Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

पाण्याचा ठणठणाट तरी सर्व सुरळीत; महापौरांचा दावा
नागपूर, २८ एप्रिल/ प्रतिनिधी

जलकुंभांवर पोलीस तैनात करणारपाणी चोरीवर आळा घालण्यासाठी यंत्रणा
शहरात सर्वच भागात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत असताना आणि टंचाईग्रस्त भागात टँकरच्या १ हजार ४१४ फेऱ्या सुरू असतानाही महापौरांनी मात्र शहरातील पाणी पुरवठा सुरळीत असल्याचा दावा आज पत्रकार परिषदेत केला. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यात पाणी चोरीवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिसांच्या मोहिमेमुळे ‘घरच्या बैठका’ तेजीत दारूच्या विक्रीतून शासकीय महसुलात २२२ कोटींची भर
नागपूर, २८ एप्रिल/ प्रतिनिधी

पोलिसांच्या ड्रंकन ड्रायव्हिंगविरुद्धच्या मोहिमेमुळे आणि घरीच दारू पिणे आर्थिकदृष्टय़ा परवडते म्हणून की काय, बहुतेक मद्यपींनी बारऐवजी घरीच दारू पिण्याला पसंती दिली आहे. त्यांच्यामुळेच जिल्ह्य़ात उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आर्थिक वर्षांत शासकीय महसुलात सुमारे २२२ कोटी रुपयांची भर घातली आहे. सर्वाधिक वाढ बिअरच्या खपात झाली आहे.नागपूर जिल्ह्य़ातील मद्यपींनी गेल्या वर्षभरात तब्बल ३.४७ कोटी लीटर दारू रिचवली आहे. यामुळे उत्पादन शुल्क विभागाने शासनाच्या तिजोरीत गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल २२२ कोटी रुपयांची विक्रमी भर घातली आहे.

मत्स्य विद्यापीठातील नोकर भरती;
तक्रारकर्त्यांची आज सुनावणी

नागपूर, २८ एप्रिल / प्रतिनिधी

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील नोकर भरतीची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त आनंद लिमये यांची नियुक्ती करण्यात आली असून उद्या, बुधवारी या प्रकरणात तक्रारकर्ते त्यांची बाजू मांडणार आहेत. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील नोकर भरतीत झालेल्या गैरप्रकाराची तक्रार पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने राज्यपालांकडे केली होती.

अक्षय्य तृतीयेलाही मंदीने ग्रासले
नागपूर, २८ एप्रिल/ प्रतिनिधी

अक्षय्य तृतीयेचा शुभमुहूर्त साडेतीन मुहूतार्ंपैकी एक असल्याने या दिवशी सोने खरेदीसोबतच इतर नवीन वस्तू खरेदी करण्याचा नागरिकांचा कल असतो. मात्र यंदा अक्षय तृतीयेच्या शूभमुहुर्तालाही मंदीचा फटका बसला. शहरातील सोने चांदीच्या दुकानात खरेदी करणाऱ्यांनी गर्दी केली मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त २० टक्केच खरेदी झाल्याचा दावा सोने-चांदी व्यापाऱ्यांनी केला आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणाऱ्यांमध्ये अनेकांचा समावेश आहे. सोन्याचे दर वाढले म्हणून खरेदीचे प्रमाण कमी होत गेले असले तरी अनेकांनी मुहूर्त सोडला नव्हता. मात्र यंदा सोन्याचे भाव गगनाला भिडले.

नियुक्त्यांमधील अनियमिततेमुळे कृषी विद्यापीठ पुन्हा ढवळले
ज्योती तिरपुडे, नागपूर, २८ एप्रिल

कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांच्या कार्यकाळातील नियुक्तयांचा गोंधळ अद्याप निवळला नसतानाच विद्यमान कुलगुरूंच्या काळातील प्राध्यापक आणि इतर नियुक्तयांमधील अनियमितता चव्हाटय़ावर आल्याने कृषी विद्यापीठ अक्षरश: ढवळून निघाले आहे. विद्यापीठातील नियुक्तयांच्या विरोधात कार्यकारी परिषदेचे सदस्य, आमदार आणि उमेदवारांनी थेट राज्यपाल, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला तक्रारी केल्या असून उद्या, बुधवारी कृषी शिक्षण व संशोधन संचालक गणेश ठाकुर कृषी विद्यापीठात चौकशी करणार आहेत.

नानाभाऊ एम्बडवारांचा पुन्हा विदर्भाचा नारा
नागपूर, २८ एप्रिल / प्रतिनिधी

स्वतंत्र विदर्भासाठी आता आणखी एका मोर्चाची स्थापना करण्यात आली आहे. माजी मंत्री नानाभाऊ एम्बडवार यांच्या नेतृत्वाखाली येत्या १ मे रोजी, महाराष्ट्र दिनी सदर परिसरातील गांधी चौकात धरणे देण्यात येणार आहेत. यासंदर्भात नानाभाऊ एम्बडवार यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच बैठक झाली. यात विदर्भाच्या आंदोलनाचे धोरण निश्चित करण्यावर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत विदर्भ मोर्चाच्या उमेदवारांसह समविचारी उमेदवारांना मोर्चाचा पाठिंबा राहील. लहान राज्यांचे समर्थन करणाऱ्या विविध पक्षांनी विदर्भ मोर्चाला सहकार्य करावे, असे आवाहनही एम्बडवार यांनी केले. यावेळी अहमद कादर, बाबा समर्थ, गुणवंत नागपुरे, भरत पराते, यशवंत चिंतले, अण्णाजी राजेधर, तिलकराज विज, शाहीद शेख, मोहम्मद इसहाक अंसारी, गणेश शर्मा, घनश्याम पुरोहित, इंद्रनाथ खिचे, नाना शेंडे, सुरेखा हेडाऊ, उषा सोनकुसरे, अ‍ॅड. गंगाधर रामटेके, निळकंठ बिनेकर यांनी त्यांच्या संघटनेची भूमिका मांडली. बैठकीत ज्ञानेश्वर बारापात्रे, विजयकुमार जैन, किशोर माने, बबलु पठाण, मेघनाथ वाकोडीकर, चंद्रप्रकाश चौधरी, अर्जुनसिंह बिनवार, मनीष तायडे आदींनी मते व्यक्त केली.

विवेकानंद केंद्राच्या वतीने व्यक्तिमत्व विकास शिबीर
कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या नागपूर शाखेच्या वतीने पाच दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन २५ एप्रिलला एम.के.एच. संचेती पब्लिक स्कूल येथे करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचेती पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अमिता शुक्ला होत्या. त्यांचे स्वागत विवेकानंद केंद्र नागपूर शाखेचे नगर प्रमुख आनंद बगडिया यांनी केले. प्रास्ताविकात गौरी खेर म्हणाले, सर्वामध्ये एक ईश्वर लपलेला असतो. स्वत:मध्ये असणारी क्षमता ओळखण्याकरता हे शिबीर आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अपर्णा केसकर यांनी केले.

काँग्रेस सेवादलाची फेरमतदानाची मागणी
नागपूर, २८ एप्रिल / प्रतिनिधी

नागपूर लोकसभा मतदारसंघात कमी मतदान आणि झालेल्या गोंधळास प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करून फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस सेवादल शहर प्रमुख रामगोविंद खोब्रागडे यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. मतदार यादीत नाव नसणे, छायाचित्र असलेले ओळखपत्र न मिळणे, ऐनवेळी मतदान केंद्रात करण्यात आलेला बदल, ओळखपत्राअभावी मतदान करू न देणे या सर्व गोंधळामुळे नागपुरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिले. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मतदारांना त्यांचा हक्क बजावता न आल्याने फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही खोब्रागडे यांनी केली आहे.

छायाचित्रकार राजेश टिकले यांना ‘ज्ञानदीप’चा पुरस्कार
नागपूर, २८ एप्रिल / प्रतिनिधी

‘ज्ञानदीप’ या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने उत्कृष्ट छायाचित्रासाठी दिला जाणारा पुरस्कार ‘लोकमत’चे छायाचित्रकार राजेश टिकले यांना घोषित झाला आहे.
११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून २३ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता पत्रकार भवनच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात छायाचित्रकार विवेक रानडे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी शिवाजी सायन्स कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. नामदेव सास्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे यंदा पहिलेच वर्ष आहे. विदर्भातील विविध वर्तमानपत्रांतील छायाचित्रकारांकडून या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. त्यातून टिकले यांच्या छायाचित्राची निवड करण्यात आल्याचे ज्ञानदीपचे सचिव प्रवीण महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

‘मातृशक्ती पुढे यावी आणि भ्रुणहत्या मूळापासून नष्ट व्हावी’ विषयावर स्पर्धा
नागपूर, २८ एप्रिल/ प्रतिनिधी

डॉ. राजेंद्रप्रसाद बहुउद्देशीय संस्था नागपूरतर्फे ‘मातृशक्ती पुढे यावी आणि भ्रुणहत्या मूळापासून नष्ट व्हावी’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये युवक आणि महिला भाग घेऊ शकतील. निबंध हिंदीमध्ये जास्तीत जास्त ५०० शब्दांचा असावा. प्रथम विजेत्याला ५०० रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे ३०० रुपये व २०० रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात येईल. शिवाय भ्रुणहत्येवर घोषवाक्य आणि छायाचित्र पाठवणाऱ्यांना सुद्धा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल. स्पर्धकांनी निबंध १५ मे पर्यंत डॉ. राजेंद्रप्रसाद बहुउद्देशीय संस्थेचे सचिव जया प्रदीप खानोरकर, सी/५०२, जयशंकर सहनिवास, चिटणविसपुरा, झेंडा चौक, महाल, नागपूर-४४००३२ या पत्यावर पाठवावे. स्पर्धकाने नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष प्रदीप खानोरकर यांच्याशी ९३७२०४३७२३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आदरांजली
नागपूर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त भारतीय बहुजन विकास परिषद विदर्भ प्रदेशच्या वतीने न्यू सुभेदार ले-आऊट येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळय़ाला परिषदेचे विदर्भ प्रदेश सदस्य रामदास तांडेकर यांनी हार घालून आदरांजली वाहिली. याप्रसंगी मदनलाल इंगळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष महेंद्रसिंग ठाकूर, सुरेंद्र पालिवाल, नरेंद्र हिवसे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

रामकृष्ण पोद्दार यांच्या हस्ते वॉटर कुलरचे लोकार्पण
नागपूर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

जायन्ट्स ग्रुप ऑफ नागपूर ग्रीन सिटीच्यावतीने सेन्ट्रल एव्हेन्यूमधील आर्य समाज मंदिरात जितेंद्र कोठारी व मनोज कोठारी यांच्या सौजन्याने वॉटल कुलरचे लोकार्पण श्री पोद्दारेश्वर राम मंदिराचे व्यवस्थापक रामकृष्ण पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. अनिल शर्मा यांनी आर्य समाजाच्या कार्याची रुपरेषा मांडली. मोहनभाई पटेल यांनी जायन्ट्स ग्रुपच्या कार्याचा परिचय दिला. डॉ. मोहंतो यांनी आर्य समाजाद्वारे संचालित रुग्णालयाच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. रामकृष्ण पोद्दार यांनी आर्य समाजाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. पं. मिश्रा म्हणाले, कोणताही समाज, संस्था व सामाजिक कार्यकर्ता करीत असलेले समाजसेवेचे कार्य नेहमीच त्याला पुढे नेणारे राहील. कार्यक्रमाचे संचालन अशोक यादव यांनी केले. कृष्णकुमार शास्त्री यांनी आभार मानले.

विविध कलमान्वये २७ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई
नागपूर, २८ एप्रिल / प्रतिनिधी

शहर पोलिसांनी गेल्या दोन दिवसात विविध कलमान्वये २७ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई तर दारूबंदी कायद्यान्वये तीन आरोपींना अटक केली. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०७ अन्वये १४, १०९ अन्वये ४, ११० अन्वये ७ तसेच ४१ अन्वये २ असे एकूण २७ आरोपींवर कारवाई करण्यात आली. दारूबंदी कायद्यान्वये तीन प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. नाकाबंदीद्वारे २ हजार ७ वाहनांची तपासणी केली आणि ४५ वाहन चालकांना चालान करून २ वाहने ताब्यात घेण्यात आली. वाहतूक पोलिसांनीही मोटारवाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत १ हजार २७६ वाहनचालकांवर कारवाई करून एकूण १ लाख ८१ हजार ५०० रुपये तडजोड शुल्क वसूल केले. जादा प्रवासी वाहतूक, कॉर्नर पार्किंग, बस थांब्याजवळ पार्किंग, सिग्नल तोडणे, कर्कश हॉर्न, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, मर्यादेपेक्षा जास्त गती आदींप्रकरणी ही कारवाई झाली. सहा आसनी ऑटो रिक्षा - २, तीन आसनी ऑटो रिक्षा- ५, दुचाकी- १२ अशी एकूण १९ वाहने डिटेन करण्यात आली़ मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ११७ चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहनचालकांनी वाहन चालवताना कागदपत्र सोबत ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक
नागपूर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पाचपावली कुंभारपुरा येथून लालगंज गोरोबाकाका मठापर्यंत आली. यावेळी गोपालकाला व दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कुंभार महासंघाचे अध्यक्ष गोपाल बनकर, सुरेश पाठक, फकिरचंद चौधरी, रामभाऊ आमदे, उपासराव वखाडे उपस्थित होते.

भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा
नागपूर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

भगवान परशुराम सर्व ब्राम्हण परिवारच्या वतीने परशुराम जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी वर्धा मार्गावरील गोरक्षण सभा येथून निघालेली शोभायात्रा लोकमत चौक, पंचशील चौक, व्हेरायटी चौक, सीताबर्डी मेन रोड, भाजी मंडी चौक, आनंद टॉकीज, मुंजे चौक, मेहाडिया चौक, धंतोली येथून गोरक्षण येथे विसर्जित करण्यात आली. शोभायात्रेच्या पूर्वी भगवान परशुरामाच्या रथाचे पूजन, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, पोद्दारेश्वर राम मंदिर शोभायात्रा समितीचे पं. उमेश शर्मा, नागपूर गुजराती ब्रह्म समाजाचे अध्यक्ष पं. योगेश महाराज जोशी, संस्थेचे अध्यक्ष दीनानाथ दस्तुरे यांनी केले. यावेळी शिवसेना युवा नेता प्रवीण शर्मा यांच्या नेतृत्त्वात शोभायात्रेतील भाविकांना ५०१ लीटर सरबताचे वितरण करण्यात आले.

विदर्भाच्या निर्मितीवर महाराष्ट्र दिनी परिसंवाद
नागपूर, २८ एप्रिल / प्रतिनिधी

नव्यानेच स्थापन झालेल्या स्वतंत्र विदर्भ राज्य अभ्यास परिषद या विदर्भवाद्यांच्या संघटनेतर्फे महाराष्ट्र दिनी (१ मे) सायंकाळी ६.३० वाजता धरमपेठेतील राजाराम वाचनालयाच्या प्रांगणात ‘विदर्भाची निर्मिती - आजची अपरिहार्यता’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात सेवानिवृत्त मुख्य आयकर आयुक्त धनंजय धार्मिक, तरुण भारतचे संपादक सुधीर पाठक, निवृत्त मुख्य वनसंरक्षक राम इंदूरकर, शेतकरी चळवळीतील नेते चंद्रकात वानखेडे, साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके, गो.से. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य ए.एस. उखळकर व पत्रकार अविनाश पाठक सहभागी होणार आहेत. परिसंवादाचे संचालन संयोजिका डॉ. अंजली कुळकर्णी करणार आहेत. या परिसंवादाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. मृणालिनी फडणवीस, डॉ. उदय बोधनकर, श्रीकांत गाडगे, शरद चौधरी, रमेश लाडखेडकर यांनी केले आहे.

चार पोलीस निरीक्षकांची बदली रद्द
नागपूर, २८ एप्रिल / प्रतिनिधी

ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली नागपुरातील चार पोलीस निरीक्षकांची परगावी झालेली बदली रद्द करण्यात आली असून ते पुन्हा नागपुरात परतणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर राज्यातील २४६ पोलीस निरीक्षकांच्या विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. त्याविरुद्ध काही पोलीस निरीक्षकांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली. ‘मॅट’ने त्यांच्या बदल्या रद्द करीत त्यांना दिलासा दिला. यामध्ये नागपुरातीलही चार पोलीस निरीक्षकांचा समावेश होता. त्यापैकी राजरत्न बन्सोड यांची पुण्याला झालेली बदली रद्द झाली आहे. राजरत्न बन्सोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला. नागपुरातून बदली झालेले आणखी काही पोलीस निरीक्षक नागपुरात परतण्याची शक्यता आहे.