Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
नवनीत

जी व न द र्श न
बृहदारण्यक उपनिषद- २

उपनिषदात पहाटेला ‘उषा’ असे काव्यात्म नाव आहे. उषा हे यज्ञीय अश्वाचे शीर आहे. सूर्य हा डोळा. वायू हा प्राण. त्याचे उघडे तोंड वैश्वानर. संवत्सर त्याचा आत्मा. द्युलोक त्याची पाठ. अंतरिक्ष त्याचे पोट. पृथ्वी त्याची पाय ठेवायची जागा. दिशा त्याच्या दोन कुशी. अवांतर दिशा त्याच्या बरगडय़ा. ऋतू त्याची इतर अंगे. मास-अर्धमास हे त्याचे सांधे. दिवस-रात्र पाय. नक्षत्रे ही हाडे. असा तो अश्व. महिमा नावाचे भांडे अश्वासमोर आले तेव्हा दिवस उगवला. महिमा अश्वामागे आले तेव्हा रात्र झाली. (महिमा म्हणजे यज्ञात लागणारे द्रव्य ठेवण्याचे भांडे.) हा अश्व म्हणजे परमात्मा. हे विश्व म्हणजे एक यज्ञ आहे. त्याग, तप, अनुसंधान आणि भक्ती ही यज्ञाची मर्मस्थाने आहेत. अश्वमेध या सर्वश्रेष्ठ यज्ञात अखेर ईश्वरानुसंधान आहे. यासाठी घटनेचा अर्थ लावता आला पाहिजे. एखाद्या श्रीमंताला अचानक दारिद्रय़ आले. तो स्वत:चा विचार करीत राहिला आणि अधिक दु:खी झाला. पण त्याच्या जाणिवेने विचार केला तर, ‘असे प्रसंग पुष्कळांवर आले आणि अनेक दरिद्री लोकांतला मी एक आहे,’ ही भावना त्याला धीर देईल. अशी विशाल दृष्टी प्रत्येक घटनेत असली तरच संसार नीट साधता येईल. याच्याबरोबर परमार्थही साधता येईल. ही दृष्टी अंतरंगात स्थिर होण्यासाठी सदैव नामानुसंधान राखले पाहिजे. म्हणजे परमार्थ कळतो. जे. कृष्णमूर्तीच्या अखेरच्या आजारात ते मेरी ल्यूटेन्सच्या घरी राहिले. तीही त्यांच्या वयाची होती. ती त्यांना अनेकदा भेटायला येई. एकदा ती जे. कृष्णमूर्तीना म्हणाली, ‘तुम्हाला काही सांगायचंय?’ तेव्हा जे. कृष्णमूर्ती म्हणाले, ‘यू डोंट चेंज.’ आपली स्थिती अशीच आहे. गुरुवर्य बाबासाहेब बेलसरे यांच्या शब्दांत; ‘आपण गुरुघरी पन्नास वर्षे जातो. पण बदल काही नाही.’ हे कळण्याची पहाट लवकर फुटावी असे वाटल्यास हे उपनिषद अभ्यासावे. समर्थ रामदास म्हणतात-
धन्य धन्य हा नरदेहो। येथील अपूर्वता पहा हो।
जो जो कीजे परमार्थ लाहो। तो तो पावे सिद्धीते।।
यशवंत पाठक

कु तू ह ल
ज्युलियन व ग्रेगोरियन दिनदर्शिका
ज्युलियन आणि ग्रेगोरियन दिनदर्शिका या काय आहेत?

दिवस, रात्र आणि ऋतू या महत्त्वाच्या गोष्टी सूर्यामुळे नियंत्रित होतात. सूर्याचे वर्ष म्हणजे पृथ्वीची सूर्याभोवतालची प्रदक्षिणा आणि ऋतूंचे आवर्तनचक्र एकच असून, ते साधारण ३६५ दिवस ६ तासांचे आहे, असे गृहित धरून ज्युलियस सीझरने इ.स.पूर्व ४५ मध्ये सौर कॅलेंडरमध्ये सुधारणा केली. त्यानुसार प्रत्येक वर्ष ३६५ दिवसांचे घ्यावे आणि दर चार वर्षांनी येणारे चौथे वर्ष ३६६ दिवसांचे घ्यावे, असा नियम केला. ज्या वर्षसंख्येला चारने भाग जाईल तेच प्रवर्धित वर्ष (लीप) घ्यावे असे ठरले. या पद्धतीच्या कॅलेंडरला ‘ज्युलियन कॅलेंडर’ म्हटले जाऊ लागले.
प्रत्यक्षात ऋतूंचे आवर्तनचक्र म्हणजे वर्ष हे ३६५ दिवस ६ तासांपेक्षा सुमारे ११ मिनिटांनी कमी आहे. हा फरक अत्यंत कमी असल्यामुळे कॅलेंडर आणि ऋतू यांच्यातील तफावत लवकर लक्षात आली नाही. १६ व्या शतकाच्या अखेरीस हा फरक लक्षणीय झाला. २२ जून रोजी होणारे दक्षिणायनचक्र १२ जून रोजी होऊ लागले. अशा तऱ्हेने कॅलेंडरची तारीख व ऋतू यांची फारकत झाली. कॅलेंडरची तारीख आणि ऋतू यांचा मेळ राहावा म्हणून पोप ग्रेगरीने कॅलेंडरमध्ये पुन्हा सुधारणा सुचविली. शतकी वर्ष उदा. १५००, १६०० इत्यादी वर्षे ४ ने भाग जाण्याच्या नियमाप्रमाणे लीप वर्षे असतातच; परंतु नव्या सुधारणेनुसार ज्या शतकी वर्षांला ४०० ने भाग जाईल तेच शतकी वर्ष लीप वर्ष मानले गेले. त्यामुळे ४०० वर्षांच्या काळात जे तीन दिवस जास्त होतात ते काढून टाकण्याची सोय झाली. ही सुधारणा १५८२ साली झाली. तेव्हापासून इंग्रजी कॅलेंडरला ग्रेगोरियन कॅलेंडर या नावाने ओळखू लागले.
हेमंत मोने
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
राजा रविवर्मा
आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून राजा रविवम्र्याचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म एका राजघराण्यात २९ एप्रिल १८४८ रोजी केरळमधील किलिमनूर येथे झाला. त्यांचे काका उत्तम चित्रकार होते. तो वारसा त्यांच्यात उतरला. याशिवाय त्रिवेंद्रमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला, तसेच महाराजांच्या प्रोत्साहनामुळेही त्यांना प्रेरणा मिळाली. १८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळाले होते. दरबारात असणाऱ्या इटालियन तैलचित्रांमुळे तैलचित्र काढाण्याचा निश्चय त्यांनी केला. युरोपियन चित्रकारांप्रमाणे ‘कमिशन पोट्र्रेट’ काढणारे ते पहिले भारतीय चित्रकार. त्यांच्या चित्रकलेवर पाश्चात्त्यांचा पगडा असला तरी त्यांची चित्रे मात्र अस्सल भारतीय होती. रामायण-महाभारतातील प्रसंग, विश्वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, उर्वशी-पुरुरवा अशी एकापेक्षा एक सरस चित्रे आपल्या वास्तववादी शैलीच्या कलाकृतीतून चितारली आहेत. आपली चित्रे छापण्यासाठी त्यांनी लोणावळय़ाजवळील मळवली येथे शिळा (प्रेस) छापखाना उभारला. या छापखान्यातून हजारो देवदेवतांची चित्रं साऱ्या भारतभर पुजली जाऊ लागली. देवतांना मानवी चेहरे देण्याचे काम रविवर्मा यांनी केले. आपल्या चित्रातून भारतीय संस्कृतीचा ठसा जगात पोहचविणाऱ्या रविवर्माना अनेक मानसन्मान मिळाले. शिकागोच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात स्थान मिळणारे ते एकमेव. सातव्या एडवर्डने कैसर-ए-हिंद’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. त्या काळात देशविदेशातील राजांचे राजवाडे राजा रविवर्माच्या चित्रांच्या दालनांनी सजले होते. त्यांच्या चित्रातून मानवी स्वभावाच्या भावना, छटा सहजसुंदरतेने दर्शविल्या. वयाच्या ५८ व्या वर्षी २ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
गणिताचा पेपर आणि देवदर्शन
शाळेत गौरव नेहमीपेक्षा लवकर आलेला पाहून सिद्धार्थला आश्चर्य वाटले. आपल्या मित्राला तो चांगला ओळखत होता. हा आज असा कसा बुवा लवकर आला, अशा विचारात सिद्धार्थ असतानाच गौरव घाईने रामजवळ येऊन म्हणाला,‘‘अरे, मी राम मंदिरात जाऊन आलो. आपल्या दोघांसाठी देवाची प्रार्थना करून आलो. हा घे प्रसाद.’’ प्रसाद खातानाही सिद्धार्थला राहून राहून वाटत होते की, हा फरक कसा काय झाला याच्यात! एवढा देवावर विश्वास आणि देवदर्शनाचे वेड याला कधीच नव्हते. असो! झालाय तो बदल चांगलाच आहे, असे मनाशी म्हणत सिद्धार्थ वर्गात जाऊन दप्तरातली पुस्तके काढू लागला.
पहिला तास गणिताचा होता. शेजारी बसलेला गौरव पुस्तके आणि वहय़ा टेबलावर काढून वहीवर रेघोटय़ा मारत होता. गौरव म्हणाला,‘‘मला गणित आधीच काही कळत नाही. त्यातून आता हे बीजगणित, भूमिती.. छ्य़ाऽऽ. कटकट आहे नुसती!’’ ‘अरे, समजत नसेल तर तास संपल्यावर सरांना भेटून सांग. ते समजावून सांगतील तुला. वेळ नको घालवूस. परीक्षा बघ फक्त तीन आठवडय़ांवर आलीय आता’, सिद्धार्थ त्याला समजावत म्हणाला,‘‘एकदा तुला गणितं कशी सोडवायची ते लक्षात आले की, पुढचं काम सोप्पं होईल. फक्त रोज निदान पंधरा - वीस गणितं रायडर्स सोडवायचा सराव केलास की झालं!’ सिद्धार्थच्या सल्ल्याकडे गौरवने फारसे लक्ष दिले नाही.
मधल्या सुट्टीत दोघे झाडाखाली पारावर ऊब खात असताना समोरून गणिताचे शिंदेसर येताना दिसले. ‘गौऱ्या, ते बघ शिंदेसर. पटकन जाऊन सांग त्यांना तुझी गणिताची अडचण.’ पण गौरव काही गेला नाही. घरी दादा त्याचा अभ्यास घ्यायचा. बाबा त्याला गणित शिकवायचे. परीक्षेचे दिवस सुरू झाले. महिनाभर देवळात जाण्याचा आणि प्रसाद आणून सिद्धार्थलाही देण्याचा त्याचा दिनक्रम मात्र परीक्षेच्या दिवसांतही चालू होता. परीक्षा संपल्या. देवळात जाण्याचा नेम चुकत नव्हता. त्याची देवावरची श्रद्धा आणि देवदर्शनाचा ध्यास पाहून सिद्धार्थही त्याच्याबरोबर देवळात जायला लागला होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे गौरव देवळात आला नाही. सिद्धार्थला वाटले, आज काहीतरी कारण झाले असेल न यायला. उद्या येईल. पण दुसऱ्या दिवशीही गौरव देवळात आला नाही. शाळेत मात्र आला. ‘का रे, गेला महिना-दीड महिना न चुकता देवळात येणारा तू. गेले दोन दिवस झाले का येत नाहीस?’ गौरवला सिद्धार्थने विचारले. गौरव हसून म्हणाला,‘‘अरे, परीक्षा झाली. रिझल्ट लागला. मी गणितात पासही झालो. आता देवदर्शनाला कशाला जायचे? जे काम देवाकडून करून घ्यायचे होते ते पूर्ण झाले आहे.’’
देवाचे स्मरण नेहमीच ठेवावे. आपल्याला फक्त संकटाच्या वेळीच देव आठवतो आणि तेही आपले भले करण्यासाठी! ईश्वर सगळय़ांची काळजी करतो. त्याने आपल्याला एवढे सुंदर जीवन दिले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्याचे स्मरण, पूजन, दर्शन करावे. आपल्या स्वार्थासाठी नव्हे.
आजचा संकल्प- मी देवाचे रोज स्मरण करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com