Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

पनवेल कल्चरल सेंटरचा वर्धापनदिन साजरा
पनवेल/प्रतिनिधी -
पनवेल कल्चरल सेंटरच्या प्रत्येक सदस्याकडे विशिष्ट कलागुण आहेत. ही गोष्ट खरोखरच दाद देण्यासारखी. एखादी संस्था इतकी वर्षे चालविणे आणि टिकविणे ही सोपी गोष्ट नाही, अशा शब्दांत प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अशोक समेळ यांनी पनवेल कल्चरल सेंटरचे कौतुक केले.
या संस्थेचा १९वा वर्धापन दिन सोहळा रविवारी येथील गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अशोक समेळ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी संगीत संयोजक आप्पा वढावकर आणि शास्त्रीय गायक मेघनाथ कोल्हापुरे यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. अशोक समेळ यांनी श्रोत्यांशी अनौपचारिक संवाद साधताना आपल्या कारकीर्दीला उजाळा दिला. यादरम्यान त्यांनी सादर केलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितेला आणि नटसम्राटमधील स्वगताला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. होतकरू तरुणांना संधी मिळण्याच्या हेतूने आपण ठाण्यात प्रायोगिक नाटय़चळवळ सुरू केली असून, कल्चरल सेंटरनेही संगीताव्यतिरिक्त नाटय़विषयक उपक्रम करावेत, अशी सूचना त्यांनी केली.
सातत्याने दर्जेदार सांगीतिक कार्यक्रम करणाऱ्या या संस्थेचे देशभर नाव व्हावे, अशा शब्दांत कोल्हापुरे यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे संस्थेतर्फे देण्यात आलेला गौरवपर निधी कोल्हापुरे यांनी संस्थेलाच परत केला. आपल्यासारख्या पडद्यामागील कलाकाराचा सन्मान करणाऱ्या या संस्थेचा मी ऋणी आहे, असे मनोगत वढावकर यांनी व्यक्त केले. रोटरी क्लबच्या प्रांतपालपदी नियुक्त झालेले डॉ. दीपक पुरोहित आणि संगीतकार सलील चौधरी यांच्या कारकीर्दीचा लेखाजोगा ग्रंथबद्ध करणारे सुरेश राव व या संस्थेच्या सदस्यांना यावेळी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. संगीत-कला विद्यालयाचे कामकाज निरपेक्षपणे पाहणारे नंदकुमार गोगटे आणि जगन्नाथ जोशी यांनी आपले मानधन संस्थेलाच परत केले. संस्थेचे मावळते अध्यक्ष श्रीधर सप्रे यांनी जगन्नाथ जोशी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली. या दोघांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
त्यापूर्वी सकाळच्या सत्रात प्रसिद्ध गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांची शास्त्रीय मैफल तीन तास रंगली. त्यांनी मियाँ की तोडी, देसकार, विभावरी आदी विविध रागातील चिजा सादर करून भक्तीरसातील भैरवीने मैफलीचा समारोप केला.
त्यांची ही मैफल कल्चरल सेंटरच्या परंपरेला साजेशीच झाली. त्यांना संवादिनीवर सीमा शिरोडकर यांनी, तर तबल्यावर विश्वनाथ शिरोडकर यांनी साथ दिली. श्रीधर सप्रे यांनी त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. या संपूर्ण सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन नीलिमा जोशी यांनी केले, तर अनिरुद्ध भातखंडे यांनी आभारप्रदर्शन केले.