Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

उन्हाच्या तीव्रतेने उत्तर महाराष्ट्र होरपळला
प्रतिनिधी / नाशिक

राजस्थानकडून वाहत येणारे वारे आणि त्यातच वातावरणातील आद्र्रतेचे प्रमाण घटल्याने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उष्म्याची लाट आली असून उन्हाने अक्षरश अंग भाजून निघण्याची अनुभूती घ्यावी लागत असल्याने दैनंदिन जिवनावर विपरित परिणाम झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे, नाशिक जिल्ह्य़ातील तापमानाने गत पाच वर्षांतील सरासरी कमाल तापमानाची पातळी गाठली असून मंगळवारी ही नोंद ४१ पर्यंत जावून पोहोचली.

फाळके फिल्म सोसायटीतर्फे विदेशी चित्रपट महोत्सव
नाशिक / प्रतिनिधी

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त तसेच दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीच्या तिसाव्या वर्धापनदिनानिमित्त रसिकांना ३० एप्रिल ते तीन मे या कालावधीत चार विदेशी चित्रपट विनामूल्य दाखविण्यात येणार आहेत.
दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी ३० एप्रिलला तिसरे दशक पूर्ण करत आहे. या ३० वर्षांत सोसायटीतर्फे मराठी, हिंदी, बंगाली, मल्याळी, तामिळी, तेलुगू, कानडी, आसामी, संस्कृत इत्यादी अनेक भारतीय भाषांतील उत्कृष्ट जुने-नवे चित्रपट दाखविण्यात आले.

पोत्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रतिनिधी / नाशिक

शहरातील इंदिरानगर भागात असलेल्या जॉगींग ट्रॅकवर एका पोत्यात मृतदेह ठेवल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून अज्ञात आरोपींनी खून करून हा मृतदेह या ठिकाणी आणून ठेवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. इंदिरानगर येथील जॉगींग ट्रॅकवर सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याची माहिती अंबड पोलीस ठाण्यास कळविली.

नाशिक विभागात माहिती अधिकाराचा प्रभावी वापर
प्रतिनिधी / नाशिक

माहितीच्या अधिकाराचा वापर नाशिक विभागातील नागरिकांकडून अधिक प्रभावीपणे होत असल्याचे दिसून येत असून २००८ या वर्षांत नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्य़ात प्राप्त झालेल्या ३५ हजार ३९२ अर्जापैकी केवळ एक हजार ७९२ अर्जावर माहिती देणे बाकी असल्याची माहिती राज्य माहिती आयुक्त सुरेश जोशी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. भारतात माहितीच्या अधिकाराचा वापर जास्त प्रमाणात होत असून महाराष्ट्र यामध्ये आघाडीवर आहे. मात्र माहितीच्या अधिकाराचा वापर करतांना यामध्ये काही त्रुटी दिसून आल्याचेही जोशी यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्य़ातून प्राप्त सात हजार ५७८ पैकी सात हजार २७० अर्जाना माहिती देण्यात आली.

बनावट औषधांवर न्यायालयाची बंदी
नाशिक / प्रतिनिधी

ऑर्थो ऑइन्टमेन्ट, ऑर्थो कॅपसुल्स, ऑर्थो ऑईल, अश्वराज, राजटोन, पायरोकोल्ड, राजलिप्ट हबरेकफ या प्रकारची औषधे उत्पादन करण्यास मे. कुस्मी सेल्स कॉर्पोरेशन व गुजरातच्या सुगम हेल्थ केअर यांना न्यायालयाने तूर्त बंदी केली आहे. या प्रकरणी व्यावसायिक वादातून सिन्नर-मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील मे. राजस्व एन्टरप्रायझेस यांनी याबाबत न्यायालयात दावा दाखल केला होता. नाशिक येथील कुस्मी सेल्स कॉर्पोरेशनमार्फत पूर्वी राजस्व एन्टरप्राईजेस-सिन्नर यांच्या उत्पादनांचे वितरण होत असे. कुस्मी सेल्स कॉर्पोरेशनने गुजरातमधील सुगम हेल्थ केअरशी संधान साधून राजस्वच्या उत्पादनांची नक्कल करून तसेच लेबल असलेली औषधे बाजारात विकावयास आणली होती. ही बाब राजस्व एन्टरप्राईजेसने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या दाव्याची सुनावणी न्या. एम. एस. जवळकर यांच्यासमोर झाली. त्यात कुस्मी सेल्स कॉर्पोरेशन व त्यांचे भागीदार जयेश मजेठिया, मदन ब्रrोचा व सुगम हेल्थ केअर, गुजरात यांना हे आदेश देण्यात आले. राजस्व एन्टरप्राईजेसतर्फे अ‍ॅड. विजय तळेकर यांनी काम पाहिले.

बसवेश्वर जयंतीदिनी मान्यवरांचा सत्कार
नाशिक / प्रतिनिधी

येथील वीरशैव तरूण संघातर्फे अवधूत स्वामी मठ मंगल कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
वीरशैव समाजाचे माजी अध्यक्ष ब. ल. विश्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नाशिक जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष राजेंद्र पैलवान, भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षक प्रदीपकुमार पाटील, नाशिकचे माजी नगराध्यक्ष सदु भोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पैलवान, पाटील, विश्वेकर, संध्या तोडकर यांनी महात्मा बसवेश्वरांबद्दल, त्यांच्या क्रांतिकारी विचारांबद्दल माहिती दिली. त्यांचे विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा समितीचे अध्यक्ष वसंत घोडके, वीरशैव पतसंस्थेचे वसंत नगरकर, बद्रीनाथ वाळेकर, भिकन फत्तरफोडे, विश्वनाथ दंदणे, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पटणे उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष बाळासाहेब उदार यांनी स्वागत केले तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन अ‍ॅड. रवींद्र दिवटे यांनी केले.

‘नाशिप्र’तर्फे आज यार्दी स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यान
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे रं. कृ. यार्दी स्मृतिप्रित्यर्थ बुधवारी ‘पाकिस्तानची सद्यस्थिती व त्याचे भारतावर होणारे परिणाम’ या विषयावर सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात सायंकाळी सहाला होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष द. शं. नाईक भूषविणार आहेत. संस्थेतर्फे संस्थापक सदस्य गुरूवर्य कै. रं. कृ. यार्दी यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण दरवर्षी करण्यात येते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रतिवर्षी संस्थेच्या वतीने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यान आयोजित केले जाते. व्याख्यान ठरविताना विषयाचे वैविध्य, त्याचे महत्व यासारख्या घटकांना प्राधान्य देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. या परंपरेला अनुसरून यंदाही व्याख्यानाच्या विषयाची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. वि. रा. काकतकर, अ. ब. जामखेडकर, प्रवीण बुरकुले, उदय शेवतेकर व कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष महेश दाबक आदी उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानास मोटय़ा संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

जळगाव; ६ गावांत टँकरने पाणी पुरवठा
वार्ताहर / जळगाव

एप्रिलच्या अखेरीस वाढत्या तापमानबरोबरच जिल्ह्य़ात पाणी टंचाईचे संकट तीव्र होत चालले असून जळगावसह जामनेर व मुक्ताईनगर तालुक्यातील सहा गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला आहे. जिल्ह्य़ातील खासगी ६० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे व १३ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असून २८ एप्रिल रोजी जळगाव आणि भुसावळ येथे राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. या वाढत्या तापमानाचा परिणाम एकूणातच जनजीवनावर होत असून त्यामुळे पाणी टंचाई अधिकच तीव्रतेने जाणवत आहे. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाण्याची पातळीही खोल गेली असून त्याच्या बेसुमार उपशावर र्निबध आणण्याची मागणी होत आहे. अनेक ठिकाणी असलेल्या साठय़ांमधील पाण्याची पातळीसुद्धा खालावली असून हजारो हेक्टरवरील केळी बागा सुकण्याच्या मार्गावर आहेत. जेथे थोडेफार पाणी आहे तेथे भारनियमनामुळे पाणी दिले जाणे शक्य नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. शेतीप्रमाणेच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचेही हाल होत आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील मंडळींना तर दूरवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जळगाव तालुक्यातील देव्हारी, उमाळे, ममुराबाद व वराडसीम, मुक्ताईनगर तालुक्यात रुईखेडा, लोहारा पाचोरा या गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्ह्य़ात ६० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून १३ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांची कामे मुक्ताईनगर, जळगाव, चोपडा, जामनेर तालुक्यात सुरू करण्यात आली आहेत.

नाशिप्रचा माजी विद्यार्थी विशेषांक
नाशिक / प्रतिनिधी

येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असून या संस्थेतील सर्व माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधता यावा यासाठी संस्थेतर्फे ‘ज्ञानयात्री’ नावाचे त्रमासिक सुरू करण्यात आले आहे. यंदा त्रमासिकाचा विषय हा ‘माजी विद्यार्थी विशेषांक’ असून अंकाचे प्रकाशन एक मे रोजी होणार आहे. चित्रकला शिक्षक अरूण पैठणकर यांनी काढलेली कुसुमाग्रजांची सुरेख रांगोळी हे या विशेषांकाच्या मुखपृष्ठाचे वैशिष्टय़े म्हणावे लागेल. कुसुमाग्रज जु. स. रूंग्टा हायस्कूलचे माजी विद्यार्थी व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकुशल खजिनदार होते. कुसुमाग्रजांची रेखाटलेली रांगोळी म्हणजे संस्थेच्या एका माजी विद्यार्थ्यांने कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांना वाहिलेली ‘कुसुमांजली’ होय. रंगावलीत कलाप्रेमींना कुसुमाग्रजांचे मिस्कील हास्य, गळ्यावरच्या सुरकुत्या, चष्मा, चष्म्याच्या काचेवर पडणारे प्रतििबब, माथ्यावर विरळ होत गेलेले केस, कपाळावरची चमक, केसांच्या भुरक्या-पांढऱ्या रंगछटा हे रांगोळीतून प्रतिबिंबीत करणे कलाकारासाठी आव्हान होते. ते पैठणकरांनी यशस्वीरित्या पेलल्याचे या रांगोळीतून जाणवते.

‘एनडीसीए’तर्फे गुणवत्ता शोध प्रशिक्षण शिबीर
नाशिक / प्रतिनिधी

जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित गुणवत्ता शोध व प्रशिक्षण शिबीरात नामवंत माजी खेळाडू मार्गदर्शन करीत असून अधिकाधिक खेळाडूंनी या शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. संघटनेतर्फे दरवर्षी एप्रील व मे महिन्यात अशा प्रकारचे शिबीर आयोजित करण्यात येते. १८ वर्षांआतील मुलांच्या क्रीडा गुणांना वाव मिळवून देणे व त्यातून गुणवान खेळाडू हेरून त्यांचा विकास करणे या उद्देशाने या शिबीराचे आयोजन अनंत कान्हेरे मैदानात तसेच जिल्ह्य़ात इतर ठिकाणी स्थानिक क्लबच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यावर्षी महात्मानगर मैदानावरही शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सुधाकर भालेकर स्वत: दररोज मैदानावर उपस्थित राहून प्रशिक्षक व खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहेत. शिबीरात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून जास्तीत जास्त इच्छुकांना सहभागी करून घेण्यासाठी दररोज सकाळी दहापर्यंत व सायंकाळी चार ते सात या कालावधीत महात्मानगर व अनंत कान्हेरे मैदानावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. जास्तीत जास्त इच्छुक खेळाडूंनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात येत आहे.