Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उन्हाच्या तीव्रतेने उत्तर महाराष्ट्र होरपळला
प्रतिनिधी / नाशिक

राजस्थानकडून वाहत येणारे वारे आणि त्यातच वातावरणातील आद्र्रतेचे प्रमाण घटल्याने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उष्म्याची लाट आली असून उन्हाने अक्षरश अंग भाजून निघण्याची अनुभूती घ्यावी लागत असल्याने दैनंदिन जिवनावर विपरित परिणाम झाला आहे. महत्वाची

 

बाब म्हणजे, नाशिक जिल्ह्य़ातील तापमानाने गत पाच वर्षांतील सरासरी कमाल तापमानाची पातळी गाठली असून मंगळवारी ही नोंद ४१ पर्यंत जावून पोहोचली. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद भुसावळ येथे ४५.५ तर त्या खालोखाल जळगावमध्ये ४४ आणि धुळे येथे ४४.३ एवढी झाली. गत सप्ताहापासून तापमान सातत्याने वाढत असल्याने उष्माघाताचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सलग तीन महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रातील वाढणाऱ्या तापमानाने एप्रिलच्या अखेरच्या सप्ताहात हंगामातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. एप्रिलच्या अखेरीस या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने मे महिन्यात नेमके कसे चित्र राहणार याची चिंता आणि चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. आद्र्रतेचे कमी झालेले प्रमाण तापमान वाढवण्यास कारणीभूत ठरल्याची माहिती मुंबई वेधशाळेकडून देण्यात आली. हवामानशास्त्र विभागाच्या नाशिक केंद्रात नोंदवले गेलेले आद्र्रतेचे प्रमाण मंगळवारी सकाळी केवळ आठ टक्के होते. आद्र्रता जसजशी कमी होते, तसतसा वातावरणातील शुष्कपणा वाढत जातो. मंगळवारी वातावरणात या स्वरूपाच्या घडामोडी घडल्याचे सांगण्यात आले. सकाळी १० पासून उन्हाची तीव्रता जाणवू लागली असताना दुपारनंतर तर अशी स्थिती निर्माण झाली की उन्हाचे चटके बसू लागले. तापमापकातील पारा ४० अंशापेक्षा अधिक चढल्याने रस्ते व जमीन तापल्याच्या परिणामी रस्त्यांवरून मार्गक्रमण करणे अवघड बनले. उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील वाहतूक थंडावली. अनेकांनी बाहेर पडण्यापेक्षा आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी अथवा अन्यत्र निवारा मिळेल तेथे आश्रय घेणे पसंत केल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पसरल्याचे दिसत होते. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारच्यावेळी कामे टाळण्यावर भर दिला.
परिसरातील जनजीवनावर या उष्म्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील शुष्कतेमुळे भल्या सकाळपासून जाणवणारा उकाडा सायंकाळी उशीरापर्यंत कायम असतो. दुपारनंतर उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी उष्ण वारे वाहत असल्याने फारसा दिलासा मिळू शकत नाही. त्यातच वीज भारनियमन व त्या व्यतिरिक्तही वेळी-अवेळी गायब होणारी वीज यामुळे पंखे, वातानुकूलन यंत्रे बंद ठेवावी लागत असल्याने अंगाची होणारी काहिली सहन करण्याशिवाय सर्वसामान्यांना पर्याय उरत नाही. रात्री तसेच पहाटेपर्यंतही वातावरणातील कोरडेपणा कायम रहात असल्याने या काळात सुद्धा एरवीपेक्षा अधिक उष्मा जाणवतो.
मंगळवारी नाशिकच्या हवामान केंद्रात ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामानातील कोरडेपणा व उष्णता येत्या काळात अशीच वाढत राहिली तर गत पाच वर्षांतील सरासरी कमाल तापमानाची पातळी यंदा ओलांडली जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. २००४ मध्ये तीन मे रोजी ४१.४ अंश इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यावेळी आद्र्रतेचे प्रमाण १२ टक्के होते. त्यापुढील वर्षांत म्हणजे २००५ मध्ये २० मे रोजी ४०.७ इतके सर्वाधिक तापमान नोंदले गेले आणि आद्र्रतेचे प्रमाण तेव्हा २० टक्के होते. २००६ हे वर्ष त्या तुलनेत कमी दाहक ठरल्याचे म्हणावे लागेल. त्या वर्षी दोन मे रोजी तापमानाने ३९.८ अंश एवढी कमाल पातळी गाठली होती. २००७ या वर्षांत तीन मे रोजी ४१.५ तर २००८ या वर्षांत ४१.४ अंश इतक्या सर्वाच्च तापमानाची नोंद झाली होती. यंदा एप्रिलच्या अखेरीस तापमानाने ४१.५ इतकी सर्वोच्च पातळी गाठली आहे. मागील आकडेवारीचा अभ्यास केल्यास सर्वाधिक तापमानाची नोंद मे महिन्यात झाल्याचे दिसते. यंदा ही पातळी एप्रिलमध्येच ओलांडली गेल्याने मे महिन्यात उत्तर महाराष्ट्रात स्थिती अधिक बिकट बनू शकते असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.
नाशिकबरोबर जळगाव, धुळे, व नंदुरबार जिल्ह्य़ात दोन दिवसांपासून उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. मनमाड व मालेगाव शहरात तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. जळगाव जिल्ह्य़ात मंगळवारी ४४ तर भुसावळ येथे सर्वाधिक म्हणजे ४५.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. दुपारच्या वेळी बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत असून यावेळी लग्न सोहळ्यास उपस्थित राहणे जिकीरीचे ठरले आहे. भुसावळ शहरातही आद्र्रतेचे प्रमाण कमी होवून २६ टक्क्य़ांवर येवून स्थिरावले आहे. राजस्थानसह पूर्वेकडून वाहत येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील तापमान वाढले आहे.
सध्या नाशिकमधून प्रति ताशी सरासरी सहा ते आठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. नंदुरबार जिल्ह्य़ातील अधिकृत तापमानाची आकडेवारी खुद्द शासकीय यंत्रणेला उपलब्ध होणे अवघड बनलेले आहे. तेथील जिल्हाधिकारी कार्यालयात तापमापक बसविण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तापमापक नसल्याने शासकीय यंत्रणा शहादास्थीत कृषी केंद्राकडून ही माहिती घेत असल्याची माहिती यानिमित्ताने पुढे आली आहे.