Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

फाळके फिल्म सोसायटीतर्फे विदेशी चित्रपट महोत्सव
नाशिक / प्रतिनिधी

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त तसेच दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीच्या तिसाव्या वर्धापनदिनानिमित्त रसिकांना ३० एप्रिल

 

ते तीन मे या कालावधीत चार विदेशी चित्रपट विनामूल्य दाखविण्यात येणार आहेत.
दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी ३० एप्रिलला तिसरे दशक पूर्ण करत आहे. या ३० वर्षांत सोसायटीतर्फे मराठी, हिंदी, बंगाली, मल्याळी, तामिळी, तेलुगू, कानडी, आसामी, संस्कृत इत्यादी अनेक भारतीय भाषांतील उत्कृष्ट जुने-नवे चित्रपट दाखविण्यात आले. त्याचबरोबर फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड, हंगेरी, नेदरलॅण्ड, नॉर्वे, स्वीडन, झेकोस्लाव्हाकिया, बग्लेरिया, रशिया, ब्राझिल, अर्जेन्टिना, उरुग्वे, जपान, चीन, तैवान, दक्षिण कोरिया, श्रीलंका इत्यादी अनेक देशांचे उत्कृष्ट जुने-नवे चित्रपट दाखविण्यात आले आहेत. तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त ३० एप्रिल रोजी ‘द जनरल (१९२७)’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. जगभरातील उत्कृष्ट १० विनोदपटात या विनोदपटाचा समावेश करण्यात येतो. तसेच ‘द मॅन विथ द मूव्ही कॅमेरा’ (१९२९) हा आगळा वेगळी कथा, मांडणी, फोटोग्राफीसाठी गाजलेला चित्रपटही रसिकांना पाहावयास मिळेल. महामार्ग बस स्थानकाजवळील मोराणकर यांचे आदर्श क्लासेस येथे सायंकाळी ६ वाजता हे चित्रपट दाखविण्यात येतील. तसेच १ मे रोजी ‘मॉस्को डिस्ट्रस्टस् इन टिअर्स’ हा १९८१ मध्ये विदेशी भाषेतील सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर पारितोषिक विजेता चित्रपट तसेच ३ मे रोजी ‘कारमेन’ हा उत्कृष्ट थरारपट म्हणून गाजलेला चित्रपट सर्कल थिएटरमध्ये सकाळी पावणेदहाला दाखविण्यात येईल. या चित्रपटांसाठी रसिकांना मुक्त प्रवेश असून १८ वर्षांवरील कोणाही व्यक्तीस सोबत घेऊ शकतात. फाळके सोसायटीच्या या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.