Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पोत्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रतिनिधी / नाशिक

शहरातील इंदिरानगर भागात असलेल्या जॉगींग ट्रॅकवर एका पोत्यात मृतदेह ठेवल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून अज्ञात आरोपींनी खून करून हा मृतदेह या ठिकाणी आणून ठेवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात

 

आला आहे.
इंदिरानगर येथील जॉगींग ट्रॅकवर सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याची माहिती अंबड पोलीस ठाण्यास कळविली. या जॉगींग ट्रॅकच्या आजुबाजुला दाट झाडी असल्याने त्याचा फायदा घेवून आरोपींनी हा मृतदेह येथे आणून ठेवला असावा अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
या घटनेची माहिती परिसरात समजल्यानंतर नागरिकांची गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मारेकऱ्यांनी ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे तोंड व डोके विद्रूप केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सिडको व इंदिरानगर परिसरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना अपयश येत असतानाच पुन्हा ही नवी घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जॉगींग ट्रॅकच्या परिसरात सकाळी व सायंकाळी स्थानिक नागरिकांची वर्दळ असते. इतरवेळी या ठिकाणी फारसे कुणी फिरकत नाही. त्याचा लाभ गुन्हेगारांकडून घेण्यात आल्याचे यानिमित्ताने उघड झाल्याची चर्चा आहे. मयत व्यक्तीची ओळख सायंकाळी उशीरापर्यंत पटली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.