Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बी. एड्. सेट परीक्षेचा ‘मार्गदर्शक’
शिक्षण व्यवसायाबद्दल निष्ठा, आत्मियता, आवड व योग्यता असणारे व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा उद्देश शिक्षण व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असा आहे. नाशिक येथे स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करणारे प्रा. देवीदास गिरी व प्रा. छाया लोखंडे-गिरी यांनी बी. एड्. सामाईक प्रवेश परीक्षेसाठी पुस्तकाचे लेखन केले आहे. सामान्यज्ञान विभागात विविध विषयातील ज्ञान तपासले जाते. विषयाचे अद्यावत ज्ञान, नेतृत्व गुण, व्यावसायिक निष्ठा, शिक्षण क्षेत्रातील कल यातून अभिक्षमता तपासली जाते.
स्पर्धेच्या या युगामध्ये कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी त्याची व्यावसायिक माहिती, आवड, गुणवत्ता, पात्रता त्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीमध्ये आवश्यक आहे. या

 

गुणांचा जर त्या व्यक्तीमध्ये अभाव असेल तर त्या व्यवसायाच्या अथवा त्या व्यक्तीच्या दृष्टीने ते मारक ठरू शकते. भावी पीढी निर्माण करण्याची जबाबदारी पूर्णपणे शिक्षकावर असते म्हणून आजही शिक्षकाला समाजात मानाचे स्थान आहे. त्यानुसार या पुस्तकामध्ये परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार २० प्रश्नपत्रिका दिल्या असून पुस्तकाच्या प्रारंभी या परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्न कसे विचारले जातील, त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. विशेष म्हणजे मानसिक क्षमता चाचणीमध्ये विद्यार्थी कमी पडतात. कारण या चाचणीचा उद्देश कारणमीमांसा क्षमतेचा अंदाज घेणे हा होय. विद्यार्थी किती जलद आणि अचूक विचार करू शकतात, हे समजण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो. या चाचणीतील प्रश्न शृंखला, श्रेणी, तर्काधिष्ठता, सांकेतिकरण-निसांकेतिकरण, परस्पर संबध, नातेसंबध, साधम्र्य, वर्गीकरण, प्रश्न, भाषिक तसेच अभाषिक स्वरूपाचे असतात. हे प्रश्न सोडविण्याच्या पध्दती विद्यार्थ्यांना माहीत नसतात, म्हणून या पुस्तकामध्ये हे प्रश्न कसे सोडवायचे याचे स्पष्टीकरण दिलेले आहे.
सामान्यज्ञानावर जे प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घटना, चालु घडामोडी, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, राज्यशास्त्र, साहित्य व शिक्षण या क्षेत्रातील सर्वसामान्य घटना, प्रसंग यावर आधारलेल्या प्रश्नांचा समावेश होतो. त्याही प्रश्नांचा पुस्तकात समावेश असून विशेष म्हणजे २००९ वर्षांतील ज्या चालू घडामोडी आहेत, त्यावरदेखील भर दिलेला आहे. शिक्षक अभिक्षमता यावरील प्रश्नांचा समावेश केलेला असून त्याची सविस्तर माहिती देखील या पुस्तकात दिलेली आहे. त्याचप्रमाणे महत्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांची माहिती प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिलेली असल्याने विद्यार्थ्यांना इतर पुस्तके चाळण्याची गरज भासणार नाही. अशा रितीने या पुस्तकाची रचना केलेली असून बी. एड् सीईटी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त असे आहे.
डॉ. मोहिनी पेटकर
एस.एम.आर.के. महिला महाविद्यालय, नाशिक
शासनाने बी. एड्. अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ‘सेट’ आवश्यक केली आहे. मानसिक क्षमता, अभिक्षमता आणि सामान्यज्ञान या तीन घटकांवर ही परीक्षा आधारित आहे. या तीन घटकांवर अनुक्रमे १५, २० व १५ असे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांचे स्वरूप काल्पनिक आणि बहुपर्यायी अशा प्रकारचे असते. एकूण ५० प्रश्नांची ही परीक्षा आहे. या अभ्यासक्रमातील अनेक किचकट मुद्यांचा परामर्श नाशिकचे प्रा. देवीदास गिरी व छाया लोखंडे-गिरी लिखित ‘बी.एड. सामाईक प्रवेश परीक्षा’ या पुस्तकात घेण्यात आला असून त्याविषयीची थोडक्यात माहिती.