Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लोकशाहीचे धिंडवडे
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान गुरूवारी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील लढाई संपली, असली तरी वादंग-वादळाचे पडसाद नाशिकसह ठिकठिकाणी उमटत आहेत. गट-

 

तटातील मतभेद उफाळून येत आहेत. मतदानातील देण्या-घेण्याची कटूता, हल्ले-प्रतिहल्ले शांततेचा भंग करीत आहे. विचार-विकासांची जागा जातीयवाद व भ्रष्टाचाराने घेतल्याने वैर वाढीस लागले आहे. कोणत्याही जाहीरनाम्यात भ्रष्टाचार करणार नाही आणि करू देणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आलेला नाही. स्वच्छ व पारदर्शक प्रशासन देण्याचा आग्रह व्यक्त करण्यात आलेला नाही. वस्तुत भ्रष्टाचार हा विकासातील प्रचंड अडथळा आहे, याचे भान ठेवून कोणीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, असे चित्र निवडणूक प्रचारात निदर्शनास आले. सर्व पक्ष, उमेदवार व नेते स्वतला वगळून आरोप-प्रत्यारोप करीत असल्याचे दिसून आले. एकूणच काय तर पैशांतून सत्ता आणि सत्तेतून पैसा या कृतीवर सर्वाचे एकमत असल्याचे उघड झाले.
सर्वच राजकीय पक्षांचे अनेक मुद्यांवर मतभेद असल्याचे भासवून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. काही मुद्यांवर त्यांचे एकमत असते. भ्रष्टाचार, जातीयवाद करण्यात, मतदारांना प्रलोभन दाखविण्यात, गुंडाना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संरक्षण देण्यात, दारू पाजण्यात आणि दारू दुकानांची मालकी घेण्यात, खोटी आश्वासने देण्यात, सरकारी सवलती घेण्यात सर्वच राजकीय पक्षांचे एकमत असते, असे आतापर्यंत राजकीय निरीक्षणांतून स्पष्ट झाले आहे.
सद््सद्विवेकबुध्दीच्या पातळीवर सत्याची मूल्ये तपासली तर आपणास ही वास्तवता नाकारता येणार नाही. राजकीय नेते, पुढारी आणि तथाकथित विचारवंतांच्या बोलण्यात, भाषणात, आश्वासनांत व आचरणात विसंवाद आणि विसंगती पदोपदी प्रत्ययास येते. जो भ्रष्टाचार करतो तो म्हणतो भ्रष्टाचार निर्मुलन झाला पाहिजे, दारू पिणारा म्हणतो दारूबंदी झाली पाहिजे, जातीयवाद करणारा सांगतो जातीभेद नष्ट झाले पाहिजे, गुंडगिरी करणारे म्हणतात शांतता राखली पाहिजे, व्याभिचार करणारा म्हणतो चारित्र्य संवर्धन झाले पाहिजे, महात्मा गांधीजींच्या देशात जोपर्यंत आदर्शाचा प्रारंभ स्वतपासून होत नाही, तो पर्यंत आचार-विचारांचा प्रभाव पडणार नाही. आदर्श, त्याग, तत्व व नैतिकतेचा प्रभाव देशात वाढला नाही तर अराजकता, दहशतवाद, भ्रष्टाचार, अन्याय-अत्याचार, जातीयवाद, परस्परांतील राग, द्वेष वाढतच राहणार. तसेच जितक्या सहजतेने दुर्जन संघटीत होतात, तितक्या सहजतेने सज्जन संघटीत होत नाहीत, म्हणून अत्याचार-भ्रष्टाचार थांबत नाहीत.
जातीयवादात दुसऱ्या जातीचा द्वेष करूनच आपापल्या जातीचे संघटन करण्यासाठी स्पर्धा आज सुरू आहे. त्यामुळे राग-द्वेष, वैर वाढविले जात आहे. अशा अवस्थेत जातीभेद नष्ट कसे होतील? यामध्ये व्यापक भूमिका घेणे सर्वाच्या हिताचे ठरणार आहे. आज सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावत असून भ्रष्टाचार कोण करीत नाही, असा सर्वमान्य सिध्दांत झाला आहे. यामधूनच भ्रष्टाचार सर्व क्षेत्रातील व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यातच भ्रष्टमंडळी आता आपल्यात बदल करू इच्छित नाहीत. त्यांचे एकमेकांना संरक्षण असतेच, पण साखळीही असते. कोणतीही लाजीरवाणी तडजोड क्षणार्धात करण्याचे अनैतिक, निर्लज्ज धैर्य वाढीस लागत आहे. आज सारेच क्षुद्र स्वार्थाचे व सत्तेचे पुजारी बनले आहेत. सेवा व मदत करणाऱ्या हातांची जागा लुबाडणाऱ्या हातांनी घेतली आहे. या चिंताजनक व संतापजनक परिस्थितीविरूध्द निस्वार्थ आणि निर्भिड बाण्याने लढणारे अण्णा हजारेंसारखे हजारो हजारे पुढे येण्याची आवश्यकता आहे.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडिया आणि सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या अहवालात म्हटले आहे की, दारिद्रय रेषेखाली जगणाऱ्या एक तृतीयांश लोकांना अकरा सार्वजनिक सेवांपैकी एक किंवा त्यापेक्षा अधिक सेवांचा लाभ मिळवण्यासाठी ९०० कोटींची लाच द्यावी लागली. या तपासणीत देशातील विविध राज्यांमधील एकूण २२ हजार ७२८ बीपीएल प्रकरणांचे सव्‍‌र्हेक्षण करण्यात आले. भ्रष्टाचाराच्या या गंभीर स्थितीबरोबरच दुसऱ्या एका अहवालात न्यायालयातील भ्रष्टाचाराची आकडेवारी देण्यात आली आहे. भ्रष्टाचाराची व्यापकता वाढत असतानाच प्रत्येक वर्षी बलात्कार, हुंडाबळी, विनयभंगाच्या गुन्ह्य़ातदेखील वाढ होत असल्याची आकडेवारी एका अहवालात प्रसिध्द झाली आहे. या विदारक व भयावह अवस्थेबरोबरच देशाच्या लोकसंख्यावाढीच्या प्रमाणातही प्रचंड वाढ झाली असून गरीबी व बेरोजगारीचे प्रमाणातही प्रचंड वाढ झाली आहे. अशी देशाची चिंता व चिंतन करणारी परिस्थिती आहे.
पां. भा. करंजकर, नाशिक