Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मेंढपाळांना संरक्षण देण्याची मागणी
अमळनेर / वार्ताहर

उपजीविकेसाठी उघडय़ावर संसार मांडणाऱ्या मेंढपाळ कुटुंबियांवर ठिकठिकाणी दरोडे पडत असल्याने परिसरात चिंतेचे वातवरण पसरले आहे. दरोडेखोरांनी गोरगरीब मेंढपाळांना महिन्याभरात लक्ष केल्याने त्याची दखल घेऊन मेंढपाळांना त्वरित संरक्षण अथवा शस्त्र परवाना देण्याची मागणी जिल्हा धनगर समाज, मल्हार सेना व कर्मचारी महासंघाच्या वतीने

 

प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मेंढपाळांवर वारंवार होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दल समाज पूर्णत: व्यथीत झाला आहे. या महिनाभरात जळगाव-धुळे जिल्ह्य़ात मेंढपाळांच्या वस्तीवर चार दरोडे पडले. पाचोरा तालुक्यातील हडसन, यावल तालुक्यातील वढोदा, शिंदखेडयातील वारूड यासह अमळनेर तालुक्यातील कळमसरा या ठिकाणी दरोडेखोरांनी हल्ला चढविला.
जळगाव जिल्ह्य़ात उन्हाळ्याच्या हंगामात चराईसाठी मेंढपाळ गावोगावी शेतशिवारात मुक्कामी असतात. मात्र वाढत्या दरोडय़ांमुळे मेंढपाळांचे उपजिविकेचे साधन हिरावण्याची शक्यता लक्षात घेता त्यांना शस्त्र परवाना देण्यात यावा. मेंढपाळांचे संरक्षण होईल अशी एकही योजना शासनाकडे आज तरी उपलब्ध नाही.
नुकत्याच पडलेल्या दरोडय़ानंतर पोलिसांची दंडेलशाही कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली सुरू आहे. त्यामुळे मेंढपाळांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होत आहे. या बाबीची दखल घेऊन संरक्षण अथवा शस्त्रपरवाना त्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष अरूण ठाकरे, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डी. ए. धनगर, जिल्हा सदस्य दशरथ लांडगे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र लांडगे यांच्यासह समाजबांधवांनी निवेदनाव्दारे केली आहे.