Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आरोग्यदिनानिमित्त स्थलांतरीत कामगारांचे स्नेहसंमेलन
नाशिक / प्रतिनिधी

जागतिक आरोग्य दिनानिमित्त बागलाण सेवा समिती संस्थेच्यावतीने व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या सहयोगाने पंचवटी विभागातील स्थलांतरीत कामगारांचे स्नेहसंमेलन पलुस्कर सभागृहात नुकतेच पार पडले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा एड्स

 

नियंत्रण व प्रतिबंधक पथकाचे प्रमुख डॉ. व्ही. जी. शिरसीकर, नागरी आरोग्य केंद्र रेडक्रॉसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल औंधकर, मुक्ता प्रकल्पाच्या समन्वयक आसावरी देशपांडे, एन.जी.ओ. फोरमचे समन्वयक मुक्तेश्वर मुनशेट्टीवार उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ. व्ही. जी. शिरसीकर यांच्या हस्ते झाले. प्रास्तविक संस्थेचे प्रकल्प समन्वयक राजू शिसाठ यांनी केले. डॉ. औंधकर यांनी एच. आय. व्ही., एड्स म्हणजे नेमके काय त्याची प्रमुख कारणे, त्याची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय याविषयी विस्तृत माहिती देत एच.आय.व्ही. एड्सला थांबविण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे नमूद केले. आसावरी देशपांडे यांनी एच.आय.व्ही. एड्सच्या प्रभावी प्रतिबंधासाठी निरोधचा वापर हा सुरक्षित व सोपा मार्ग असल्याचे नमूद करून त्याची गरज, उपलब्धता व वापराचे फायदे यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत काम करणाऱ्या कुलदीप पवार व सत्यभामाबाई ठाकरे यांनी निरोधची क्षमता, त्याची उपयोगिता याविषयी माहिती दिली.
स्नेहसंमेलन प्रसंगी स्थलांतरीत कामगारांचे प्रतिनिधी म्हणून अनिल प्रसाद व अंगदकुमार प्रजापती यांनी विचार मांडले. या स्नेहसंमेलनादरम्यान पोस्टर प्रदर्शन, कठपुतळींच्या खेळाच्या माध्यमातून एच.आय.व्ही. एड्स विषयीची माहिती, ‘एड्स जागो’ व ‘निरोध एक मित्र’ या चित्रफितीही दाखविण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्थलांतरीत कामगारांसाठीच्या लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी मदत करणाऱ्या वस्तीपातळीवरील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. एच.आय.व्ही. एड्सचे आक्रमण थांबवून ते परतवून लावण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन प्रमुख पाहुणे व संस्थेच्यावतीने करण्यात येवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रकल्पाचे समुपदेशक अ‍ॅड. अशोक कोळेकर यांनी आभार मानले तर सूत्रसंचलन युवराज दाणी यांनी केले.