Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

एरवी हिरवीगार श्रीमंती मिरविणाऱ्या वृक्षांची स्थिती उन्हाळ्यात पानगळीमुळे दरिद्रीनारायणासारखी होते. शहरी भागापेक्षा पेठ, सुरगाणा तसेच सातपुडय़ासारख्या दऱ्याखोऱ्याच्या भागात पानगळीचे स्वरुप अधिक. जणू काही सुकलेल्या पानांचा गालिचा अंथरलेला दिसावा, असे दृश्य या भागात दिसत आहे.

मतदानाचा टक्का घसरल्याने महापौरांच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह
वार्ताहर / जळगाव

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर विधानसभा क्षेत्रात अवघे ३४ टक्केच मतदान झाल्याने भाजप उमेदवारास शहरातून लाखाचे मताधिक्य देण्याबाबत महापौर रमेश जैन यांनी केलेल्या दाव्यावर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. महापौरांचा दावा किती खरा व किती काल्पनिक हे आता निकालाअंतीच स्पष्ट होईल, असे पदाधिकाऱ्यांमार्फत सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्य़ात सरासरी ४५.६३ टक्के मतदान झाले. रावेर मतदारसंघात ५०.५७ टक्के मतदान नोंदविले गेल्याने निदान रावेरने पन्नाशीतरी पार केली. मात्र जळगाव मतदारसंघात फक्त ४२.४३ टक्केच मतदान झाल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. रावेर मतदारसंघात भुसावळ आणि चोपडा मतदारसंघ वगळता रावेर, जामनेर, मलकापूर आणि मुक्ताईनगर तालुक्यात ५० टक्क्यांवर मतदान झाले. भाजपचे विधीमंडळ गटनेते एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर क्षेत्रात जिल्ह्य़ातील सर्वाधिक ५८.०८ टक्के मतदान नोंदविण्यात आले. रावेरच्या तुलनेत सुरेश जैन यांचा मोठा प्रभाव असणाऱ्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाची टक्केवारी अवघी ४२.४३ आहे. एकाही मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले नाही. महत्वाची बाब म्हणजे जैन यांनी १९८० पासून विधानसभेच्या लागोपाठ आठ निवडणुका जिंकत प्रतिनिधित्व केलेल्या जळगाव शहरात जिल्ह्य़ातील सर्वात कमी ३४.२१ टक्के मतदान झाले. त्यामुळे सुरेश जैन यांचे भाऊ व महापौर रमेश जैन यांच्या निवडणूकपूर्व दाव्यावर शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडून त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली जात आहे.

संशयितांच्या अटकेमुळे पिंपळगाव बंद मागे
वार्ताहर / पिंपळगाव

पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी प्रदीप छाजेड यांच्या हत्या प्रकरणातील तीन संशयितांना पोलिसांनी जेरबंद केल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांतर्फे मंगळवारी आयोजित पिंपळगाव बंद मागे घेण्यात आला. शहर गुन्हे शाखा व सुरगाणा पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. छाजेड हत्या प्रकरणातील संशयित निलेश मुर्तडक (२५) याला नाशिकच्या ठक्कर बसस्थानकावरून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. दिवसभर कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देतानाच ५० हजाराची रोकडही पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी या प्रकरणी सुरूवातीपासून सुरगाणा येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या शामू पवार याच्यावर नजर ठेवली होती. त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता तपासकामात त्याने गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. पोलिसी हिसका दाखविल्यानंतर शामू पवारने गुन्ह्य़ाची कबुली दिली. शुक्रवारी सायंकाळी प्रदीप छाजेड यांना प्रवासी वाहनाने नेण्याचा बहाणा करून रस्त्यातच त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह अलंगूण-कोठुळा रस्त्यावरील झुडूपात टाकल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी शामू नागू पवारसह जीपचालक प्रदीप केदारनाथ पवार याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी एक संशयित ठक्कर बाजार येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुर्तडकला जेरबंद करण्यात आले. या टोळीतील अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. शुक्रवारी सुरगाणा येथील व्यापाऱ्यांकडे नेहमीप्रमाणे किराणा मालाची वसुली करून छाजेड सायंकाळी खासगी वाहनाने परतत असताना ही घटना घडली होती. सुरगाणा येथील आठ ते दहा व्यापाऱ्यांनी छाजेड यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. दरम्यान छाजेड यांचा मृतदेह आढळून आला. छाजेड यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ स्थानिक व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणातील संशयितांना अटक झाल्यामुळे व्यापारीवर्गाने हा बंद मागे घेतला. संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन व्यापाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.