Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
विशेष

हवामान बदल व आपण!
हवामान बदलाबाबत सध्या नेहमीच वर्तमानपत्रांतून वाचावयास मिळते. हवामानातील बदलांचे विविध हानीकारक परिणाम आज आपल्यासमोर येत आहेत. विशेषत: अंटाक्र्टिका खंडावर होणाऱ्या परिणामांचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. आता शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, हवामान बदलांचा परिणाम फक्त अंटाक्र्टिकांवरील पेग्विनसारख्या मोठय़ा प्राण्यांवरच नाही तर तेथील अन्नसाखळीतील छोटय़ात-छोटय़ा अशा सूक्ष्म जीवाणूंवरही होणार आहे. हे संशोधन नुकतेच सुप्रसिद्ध अशा ‘नेचर’ नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. हवामान बदलाचे दीर्घकालीन कसे परिणाम होतील यासाठी शास्त्रज्ञांनी जागतिक स्तरावर २६ केंद्रे स्थापित केली असून यातील दोन संशोधन केंद्रे ही अंटाक्र्टिकावर उभारली आहेत.

इस्रोही बनविणार स्पेस शटल
चांद्रयान-१ या मोहिमेच्या माध्यमातून भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने भारतीयांना चंद्र देण्याचे आश्वासन पूर्ण केले. कुठल्याही भारतीयाला अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी होती यात शंकाच नाही. चंद्रावर मून इम्पॅक्ट प्रोब हे उपकरण क्रॅश लँडिंग करून उतरवण्यात आलेले यश हा त्यातील फार महत्त्वाचा भाग होता. अगदी ठरलेल्या कार्यक्रमानुसार हे उपकरण चंद्रावरील श्ॉकलटन विवराजवळ पडले. यात तंत्रज्ञानाची अचूकता व भारतीय वैज्ञानिकांनी या तंत्रज्ञानावर मिळवलेले प्रभुत्व सिद्ध झाले आहे. एकूणच या पहिल्यावहिल्या चांद्रमोहिमेत इस्रोकडे असलेले स्वदेशी तंत्रज्ञान अग्निपरीक्षेतून यशस्वीरीत्या पार पडले आहे. इस्रोचे अध्यक्ष जी.माधवन नायर यांनी चांद्रमोहिमेच्या यशानंतर आता २०१२ पर्यंत पहिला भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरवण्यात येईल, असे जाहीर केले आहे. आता त्यांनी आणखी एक शब्द दिला आहे, ही सगळी पाश्र्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो येत्या वर्षभरात आणखी एक मैलाचा दगड पार करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. हा मैलाचा दगड म्हणजे भारताचे स्वतंत्र असे स्पेस शटल.

‘तात्यानू, पेपरातली बातमी वाचल्यात
काय?’
‘खयची रे बाबल्या, सध्या निवडणुकीच्या हंगामात घे म्हणान बातम्यो. एकमेकार शिवी-गाळ सध्या हे राजकारणी करतसत, मग हेच गळ्यात गळो घालून फिरतले. ह्यो असल्यो बातम्यो वाचून माका ईट इलोसा.’
‘ह्यो, नाय हो बातम्यो. मी जी सांगतय ती खूप मजेशीर आसा आणि एकाच पानार दोन भिन्न बातम्यो एकाच दिवशी आयल्ल्यो’
‘ह्यो बातम्यो माझ्या कश्यो नजरेतून सुटल्यानी. सांग बाबा खयच्यो त्यो बातम्यो? माझ्या डोसक्यातल्या ज्ञानात तेवढीच भर पडात.’
‘कमाल आसा तात्यानू, तुम्ही ह्योया ता वाचणातच नाय, नको ता वाचतात’
‘मरू दे, आता सांगतलय की नाय, की जाव मी आता. ओगी मेलो भाव खाता.’
‘अवो परवाच्या पेपरात पह्यली बातमी होती ती, भारतात पाकिस्तानातसून १०० चे वर अतिरेकी घुसल्यानी. त्यातल्या बऱ्याच जणांक गोळ्यो मारल्यो. एक जिवंतय पकडलो’
‘छ्या. ही काय नवी बातमी नाय.’
‘जरा गप्प रवा हो तात्यानू, अजून मी दुसरी बातमी तुमका सांगूक नाय’
‘हा. सांग बाबा.’
‘अहो, भारतीय मुलींशी लग्न करूक पाकिस्तानी युवक इच्छुक आसत. लग्न जुळवच्यासाठी भारतातल्या आणि पाकिस्तानातल्या पेपरात जाहिराती आयल्योसत.’
‘शाब्बास. काय म्हणतय काय. म्हणजे एकीकडे अतिरेकी आणि दुसरीकडे प्रेमवीर भारतार आक्रमण करतले काय?’
‘मग आसा की नाय गमतीशीर बातमी.’
‘बाबल्या. नक्की मराठीतच ही बातमी होती मा? आणि बरी दिवसाउजेडीच वाचलंय ना बाबा?’
‘म्हणजे तात्यानू तुमका काय म्हणाचा आसा मी पावशेर लावन बातमी वाचली की काय? आणि माका इंग्रजी येणा नाय की काय?’
‘मतदानाच्या अगोदर ४८ तास ‘ड्राय डे’ असता ह्येची तुमका कल्पना आसा ना?’
‘पण बाबल्या, कमाल आसा नाय, माका तर असा वाटत होता, की सगळेच पाकिस्तानी लोक आपले शत्रू आसत. पण ते आपल्याशी लग्न करूक बघतत म्हणजे त्येंका आमच्याविषयी ओढ आसा. कोण शत्रूची सून घरात आणीत? नाय तर कोण शत्रूच्या देशात आपल्या झिलाचा सासर ठेवीत?’
‘तात्यानू, माका काय समजणासाय नाय. ह्यो
बातम्यो वाचून माझा डोसक्याच काय काम
करीनासा झालासा. अशी लग्ना करूचो काय ‘गेम’ नाय मा?’
‘छ्या. तू ‘वीरझरा’ पिक्चर बघ म्हणजे तुका समजात काय ता?’
‘तात्यानू, पूर्वी मुंबय-कराची बोट होती. आणि आपल्या कोकणातसून लोक मुंबयक गेल्यासारखे कराचीक जायत. एवढाच काय कोकणात अजून कराची शिक्षण संस्था आसा..’
‘असा. म्हणजे आज नाय तर पुढच्या पिढीत तरी भारत-पाक मैत्री जायत काय हो? जर्मनीसारखे हेय देश एकत्र येतीत काय? असा जर काय झाला तर दोनय देशातले लोक सुखान जगतीत.’
‘ह्यो लांबच्यो गजाली सोडून दी. आता एक मोठी काळजी माझ्या डोसक्यात आयलीसा’
‘ती कसली हो?’
‘अरे बाबा आणखी एक जिवंत अतिरेकी सापडलोसा. म्हणजे कसाबाक अंडा सेलमध्ये एक साथीदार मॅळतलो. म्हणजे आता हळूहळू कसाबबरोबरची अंडा सेलमधली गर्दी वाढतासा. म्हणजे ही नवीन डोकेदुखीच.’
प्रसाद केरकर
Prasadkerkar73@gmail.com.