Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

कडक उन्हामुळे धरणातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन
प्रतिदिन पाच मिलिमीटर बाष्पीभवन;
धरणांत २९ टक्के पाणीसाठा

पुणे, २८ एप्रिल / खास प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याचा परिणाम राज्यातील मोठय़ा धरणांच्या पाणीसाठय़ावर झाला असून पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग प्रतिदिन पाच मिलिमीटरपर्यंत वाढला आहे. वाढत्या उष्म्यामुळे विदर्भ आणि मराठवाडय़ातील धरणसाठा फारच खालावला आहे. या भागातील सात धरणे कोरडी ठणठणीत पडली आहेत. राज्यातील धरणांत केवळ २९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांमध्ये बेताचाच पाणीसाठा आहे. उन्हाचा पारा वाढल्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे.

‘मतदानाची सक्ती करण्यास हरकत नाही’
मतदारराजा का रुसला ?

पिंपरी, २८ एप्रिल / प्रतिनिधी

मतदार याद्यांमधील घोळ, ओळखपत्रे यासह निवडणूक यंत्रणेतील अनेक त्रुटी आहेत, त्या दूर केल्यास मतदान करण्याची सक्ती करण्यास कोणतीच हरकत नाही, असे मत िपपरी-चिंचवडच्या महापौर अपर्णा डोके यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले. आपले एक मत म्हणजे पाच वर्षांचा भविष्यकाळ असतो, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, अशी टिपणीही त्यांनी केली.
मावळ मतदारसंघातील चिंचवड व पिंपरी आणि शिरुर मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघात अपेक्षेपेक्षा खूपच कमी मतदान झाले, त्याविषयी महापौरांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड शहराकडे वेगाने विकसित होत असलेले शहर म्हणून पाहिले जाते.

जिल्ह्य़ात टँकरमुक्ती फसली
पुणे, २८ एप्रिल / खास प्रतिनिधी

वाढत्या उष्म्यामुळे दुष्काळग्रस्त गावांत पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची मैलोन्मैलाची भटकंती सुरू झाली आहे. जनावरे आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्नही ‘आ’ वासून उभा राहिला आहे. या टंचाईच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

नागरिकांच्या मारहाणीत चोरटा मृत्युमुखी
देहूगाव, २८ एप्रिल/वार्ताहर

चिखलीतील पाटीलवस्ती भागामध्ये आज पहाटे पाचच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरटय़ाला नागरिकांनी केलेल्या बेदम मारहाणीत उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आणखी तीन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. नागरिकांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश गणेश गायकवाड (वय ३५, रा. मनमाड) असे मृत संशयिताचे नाव आहे. त्याचे एक अल्पवयीन व दोन तरुण साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

शहरात चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या अफवा
पुणे, २८ एप्रिल/प्रतिनिधी

शहरातील दोन महाविद्यालये, एक पोलीस ठाणे व एका गणेश मंदिरात बॉम्ब ठेवल्याची माहिती असलेले पत्र एका महाविद्यालयात सापडल्याने आज सकाळी अफवांचे पीक आले. बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या साहाय्याने पोलिसांनी सर्व ठिकाणी कसून तपासणी केल्यानंतर त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र परीक्षांच्या काळात अज्ञात व्यक्तीने केलेल्या या खोडसाळपणामुळे शहर पोलीस दलाची दमछाक झाली. फग्र्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी. परदेशी यांच्या कार्यालयाबाहेर शिपाई अंबादास पायगुडे यांना सकाळी साडेनऊच्या सुमारास एक लिफाफा सापडला. त्यामध्ये एक धमकीचे पत्र होते. ‘गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या मोटारीतून आलेले तीन पाकिस्तानी अतिरेकी शहरात घुसले असून, त्यांच्याकडे चार रायफल, हातबॉम्ब व पिस्तुले आहेत. फग्र्युसनसह वाडिया महाविद्यालय, एक पोलीस ठाणे व एका गणेश मंदिरात स्फोट घडवून आणले जाणार आहेत,’ असा उल्लेख धमकीच्या पत्रामध्ये करण्यात आला होता. दुपारी दोन ते अडीच या वेळेत विविध ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते. देवनागरी लिपीत व हिंदी भाषेमध्ये लिहिण्यात आलेल्या या पत्रात ‘मोहम्मद त.’ अशी स्वाक्षरी करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस सहआयुक्त राजेंद्र सोनवणे यांनी दिली.

मतदारांना आवाहन
पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल हा जेवढा औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय झाला आहे, तेवढाच पुण्यातील मतदानाचे घटते प्रमाण हाही चर्चेचा विषय ठरला आहे. ‘विद्येच्या माहेरघरा’तील केवळ ४० टक्के मतदारांनाच मतदानाचा हक्क बजावावासा वाटला, ही राजकीय पक्षांसाठी धोक्याचीच घंटा म्हणावी लागेल. मतदारांमध्ये हे औदासीन्य का आले आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता’ करत आहे. ज्या मतदारांनी मतदान केले वा ज्यांनी काही ना काही कारणाने केले नाही वा ज्यांना मतदान करता आले नाही, अशांनी त्यांचे मत सुमारे दीडशे शब्दांत लिहून ‘लोकसत्ता’ कार्यालयाकडे पाठवावे. आपला अनुभव/आपले परखड मत वा आपल्या सूचना असे लेखन ४ मे पर्यंत पुढील पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
निवासी संपादक,
दै. लोकसत्ता, ३/११ अरोरा टॉवर्स, मोलेदिना पथ, पुणे- ४११ ००१.

‘अहिल्याताई चळवळ जगल्या’
पुणे, २८ एप्रिल/प्रतिनिधी

समाजातील कणखर माणसे सर्वाना सोडून जातात, अशा माणसांच्या आठवणी कोठेही लिहून ठेवल्या जात नाहीत. त्या आठवणी त्यांच्यासोबत जातात.त्यामुळे दु:ख वाटते, असे उद्गार भारतीय कम्युनिस्ट महिला फेडरेशन अध्यक्ष शांताबाई रानडे यांनी आज अहिल्या रांगणेकर श्रद्धांजलीसभेत काढले. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने या सभेचे आयोजन केले. या वेळी जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्ष किरण मोघे म्हणाल्या की, अहिल्याताई रांगणेकर केवळ नेत्या, मार्गदर्शकच नव्हत्या तर त्या आईसमान होत्या. स्त्री कार्यकर्तीला किती अडचणींना तोंड द्यावे लागते हे त्यांना माहित होते. तसेच या वेळी प्रेमा गुरव यांनी अहिल्याताई चळवळ जगली. तिचे आयुष्य म्हणजे चळवळच असे उद्गार काढत त्यांनी ब्रिटिशांबरोबर केलेल्या सत्याग्रहांच्या स्मृती जागृत केल्या. या वेळी कामगार संघटनेचे नेते बाबा आढाव म्हणाले की, अहिल्याबाईंचे जीवन म्हणजे त्या हाडाच्या कम्युनिस्ट होत्या. त्यांनी आठ वर्षे तुरुंगात काढली.त्यांच्या पिढीतील कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची दानत होती.

प्रशासनाकडे साध्या होडय़ा नाहीत? - बानगुडे पाटील
पुणे, २८ एप्रिल/प्रतिनिधी

भारतीय आरमाराचे जनक असलेल्या शिवाजी राजांच्या आरमारात देखील सुसज्ज व्यवस्था होती. परंतु आज महासत्तेचा डंका वाजवणाऱ्या आणि सव्वीस अकरासारखी लाजीरवाणी गोष्ट उघडय़ा डोळ्याने पाहणाऱ्या प्रशासनाकडे संरक्षणासाठी साध्या होडय़ा नाहीत, असे वक्तव्य नितीन बानगुडे पाटील यांनी केले. सुदामराव बाबर प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजी व संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. पाटील म्हणाले की, राजांनी स्वत:च्या नावाचा उदोउदो कधीच केला नाही. कसं जगावं हे सांगणारे शिवाजी व कसं मरावं हे शिकविणारे संभाजी राजांचे गुण आत्मसात करणे आवश्यक आहे. या वेळी कार्यक्रमाला अजित बाबर व नमेश बाबर आदी उपस्थित होते.

‘एएफएमसी’च्या कँटीनचे कुलूप तोडून चोरी
पुणे, २८ एप्रिल/प्रतिनिधी

वानवडी येथील ‘एएफएमसी’च्या कँटीनच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटय़ाने सव्वासात हजार रुपये किमतीच्या दारूच्या २७ बाटल्या चोरून नेल्या. २३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते २४ एप्रिल रोजी सकाळी आठ या वेळेत ही घटना घडली. लुईराम रोनरी गिलबर्ट (वय ३५, रा. ऑफिसर्स मेस, एएफएमसी) यांनी याबाबत वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कँटीन कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरटय़ाने गॅलरीतून प्रवेश करीत दरवाजाचे कुलूप तोडून २७ दारूच्या बाटल्या असा एकूण सात हजार तीनशे रुपयांचा माल चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक ए. के. पाटील या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

विशेष मुलांसाठी साहसी ट्रेकचे आयोजन
पुणे, २८ एप्रिल/प्रतिनिधी

नवक्षितिज अ‍ॅडव्हेंचर क्लबतर्फे विशेष मुला-मुलींसाठी मनाली- कोठी येथे साहसी ट्रेकचे आयोजन करण्यात आले असून येत्या २ मे रोजी ३६ जणांचा चमू पुण्याहून रवाना होणार आहे. नवक्षितिज संस्था अध्यक्ष डॉ. नीलिमा देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देसाई म्हणाल्या की, या साहसी ट्रॅकमध्ये निलेश चांदमल हा विद्यार्थी सहभागी होणार आहे. चांदमल याने विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी या खेळात सुवर्णपदक पटकावले होते. ट्रेकमध्ये दोन अंध मुलेही सहभागी होणार आहेत. ट्रेकमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांना सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग ही स्थळे दाखविली जाणार आहेत. नदी पार करणे, रॅपलिंग आदी साहसी प्रकार मुलांना अनुभवता येणार आहे. विविध सहलींमुळे मतिमंद मुलांमधील चिडखोरपणा, आक्रमकता आदी वर्तन समस्या कमी होता. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो व स्वतंत्र राहण्याची वृत्ती तयार होते म्हणून विशेष मुलांसाठी साहसी सहलींचे आयोजन करणे आवश्यक आहे, असेही देसाई यांनी सांगितले.