Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
राज्य

शिर्डीतील साईबाबांच्या सान्निध्यात राणी मुखर्जीचे घर होणार!
३० लाख रुपयांची गॅरंटी; राणीचे नाव सात-बारावर
औरंगाबाद, २८ एप्रिल/खास प्रतिनिधी
शिर्डीत साईबाबांच्या चरणी अभिनेत्री राणी मुखर्जी हिचे घर बांधले जाईल, यावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले. साईभक्त राणीने शिर्डीजवळील निमगाव कोऱ्हाळे येथे घेतलेल्या ११ गुंठे जमिनीवर सात-बाराची नोंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी दिला. त्यासाठी येत्या दोन महिन्यांत उच्च न्यायालयात ३० लाख रुपयांची बँक गॅरंटी देण्याची अटही न्यायालयाने घातली आहे.

कोणाही उमेदवाराचा एकतर्फी विजय अवघड
रत्नागिरी-सिंधुदुर्ग निवडणूक
रत्नागिरी, २८ एप्रिल/ खास प्रतिनिधी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानाचे स्वरूप लक्षात घेता कोणाही उमेदवाराचा एकतर्फी विजय अवघड बनला असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.मतदारसंख्या हा निकष मानून झालेल्या मतदारसंघ फेररचनेत कोकणातील या दोन जिल्ह्यांचा मिळून एक मतदारसंघ झाला आहे आणि या नवीन रचनेमुळे उमेदवारांसह सर्व राजकीय पंडितांना मतदानाचा कल लक्षात येणे अवघड होऊन बसले आहे.

पुण्यात बॉम्बची अफवा
पुणे, २८ एप्रिल/प्रतिनिधी

शहरातील दोन महाविद्यालये, एक पोलीस ठाणे व एका गणेश मंदिरात बॉम्ब ठेवल्याची माहिती असलेले पत्र एका महाविद्यालयात सापडल्याने आज सकाळी अफवांचे पीक आले. बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या साहाय्याने पोलिसांनी सर्व ठिकाणी कसून तपासणी केल्यानंतर त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र परीक्षांच्या काळात अज्ञात व्यक्तीने केलेल्या या खोडसाळपणामुळे शहर पोलीस दलाची दमछाक झाली.

विदर्भात वैशाख वणवा
अकोला ४५.८, नागपूर ४५.६, चंद्रपूर ४४.६
नागपूर, २८ एप्रिल प्रतिनिधी
संपूर्ण चैत्र महिन्यात उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत गेली असतानाच वैशाखाच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकू लागला आहे. दोन दिवसांपासून वाढत चाललेल्या उन्हाने आज विदर्भात उच्चांक गाठला. सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात (४५.८), त्यानंतर नागपूर ४५.६ आणि चंद्रपूर येथे ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर येथे नोंदवण्यात आलेले आजचे तापमान २००० नंतरचे सर्वाधिक तापमान आहे.

संतसाहित्याच्या अभ्यासक वीणाताई हरदास यांचे निधन
नागपूर, २८ एप्रिल / प्रतिनिधी

संत साहित्याच्या गाढय़ा अभ्यासक आणि साहित्याचार्य महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास यांच्या पत्नी वीणाताई हरदास यांचे सोमवारी दुपारी वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पुतणे, नातू श्यामसुंदर हरदास, श्रीराम हरदास आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. वीणाताईंना आठ दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने रामदासपेठेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच दुपारी त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक कुप्प. सी. सुदर्शन यांनी दक्षिणामूर्ती चौकातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

‘अहिल्याताईंचे हृदय नेत्याचे नव्हे आईचे होते’
पुणे, २८ एप्रिल/प्रतिनिधी

समाजातील कणखर माणसे सर्वाना सोडून जातात, अशा माणसांच्या आठवणी कोठेही लिहून ठेवल्या जात नाहीत. त्या आठवणी त्यांच्यासोबत जातात. त्यामुळे दु:ख वाटते, असे उद्गार भारतीय कम्युनिस्ट महिला फेडरेशन अध्यक्ष शांताबाई रानडे यांनी आज अहिल्या रांगणेकर श्रद्धांजलीसभेत काढले.

चाकरमानी कोकणात परतू लागल्यामुळे मुंबई-ठाण्यातील उद्याच्या मतदानावर परिणाम?
सावंतवाडी, २८ एप्रिल/वार्ताहर

मुंबईकर चाकरमानी कोकणात परतू लागल्याने ठाणे-मुंबईच्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवसेना व मनसेच्या उमेदवारांना त्याचा फटका बसेल, अशी भीती आहे.कोकणातील चाकरमानी ठाणे, नवी मुंबई, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, कांजूरमार्ग या भागांत मोठय़ा प्रमाणात राहतात. शाळांना सुट्टय़ा पडल्याने चाकरमानी गावी परतू लागले आहेत.मराठी या विषयावर शिवसेना आणि मनसे दावा करीत असताना चाकरमानी गावी परतू लागल्याने शिल्लक राहिलेल्या मतदारांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. मराठी विषयावर मतांची विभागणी होण्याची भीती आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी ३० एप्रिलचे मतदान करूनच गावी जावे, असे काही उमेदवारांनी नियोजन केले आहे. लग्नसराईमुळे काही मंडळींना ३० एप्रिलच्या मतदानापर्यंत थांबता येणे शक्य नसल्याने चाकरमानी गावी दाखल झाले आहेत.मुंबई आणि ठाणे येथील लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईकर चाकरमानी गावी परतत असला तरी काही उमेदवारांनी लोकांना गावी पोहोचविण्याचीही जबाबदारी उचलली असल्याचे बोलले जात आहे.

एफटीआयआय’च्या लघुपटाला पुरस्कार
पुणे, २८ एप्रिल/खास प्रतिनिधी

‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’मधील दीप्ती गोंगा या विद्यार्थिनीच्या लघुपटाची अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सवरेत्कृष्ट लघुपट म्हणून निवड करण्यात आली आहे. दीप्ती गोंगा यांनी दिग्दर्शित केलेला ‘नर्मिन’ हा लघुपट अमेरिकेतील या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता. भारत आणि पाकिस्तान फाळणीच्या निमित्ताने विविध सामाजिक, भावनिक, मानवी भावनांचा व प्रश्नांचा वेध या लघुपटामध्ये घेण्यात आला आहे.