Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
  शूर वीरांची जननी ..
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
  इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया
  डिपॉझिटरी
  तुर्कस्तान सरकारची शिष्यवृत्ती
  चाकोरीबाहेरची माणसं
अभेद्य चिकाटीचे फळ
  आधारसामुग्री आणि तिची वैशिष्टये
  एन सी ई आर टी
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (राष्ट्रीय स्तर)
  वंचितांची ‘वकील’!
  ब्युटी थेरपी आणि कॉस्मेटॉंलॉजीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण
  अभिनयातील करिअर
  जर्मनीचा सदस्य शाळा प्रकल्प: विद्यार्थी, शिक्षकांसाठी संधी

 

मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ या दिवशी झालेला अतिरेकी, अमानवी, क्रूर परंतु तितकाच भ्याड हल्ला असो किंवा कारगिलचे युद्ध असो किंवा यापूर्वी घडलेली कोणतीही दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई असो, या प्रत्येक देशावरील संकटाच्या वेळी आपल्या छातीचा कोट करून प्राणपणाने बाजी मारणारे, लढणारे कोणतेही भारतीय सैनिक असोत, जवान असोत वा अधिकारी असोत कोणताही सच्चा भारतीय त्यांना विसरू शकणार नाही आणि कुणीही विसरू नयेच. देशासाठी केलेले बलिदान केव्हाही विसरता न येण्यासारखे असेच आहे. देशभक्ती, देशप्रेम, जाज्ज्वल्य देशाभिमान अंगी बाणविलेले दिवंगत तरुण सेनाधिकारी अभिजीत गाडगीळ, विनायक गोरे, संदीप उन्नीकृष्णन यांच्यासारखे ज्ञात आणि असंख्य अज्ञात अधिकारी आपल्या देशाला लाभले हे खरं तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांचं अहोभाग्यच! अत्यंत धाडसी वृत्ती, ‘जननी, जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे’ अशी विचारसरणी लाभलेल्या, लष्करी
 

जीवनाची आवड असलेल्या, सीमेवर डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करणाऱ्या अशा अनेक शूरवीरांमुळेच खरं तर आपण सर्व भारतीय नागरिक सुखाने, शांततेने रात्रीची झोप अनुभवत आहोत आणि म्हणूनच अशा अधिकाऱ्यांचा आपल्यालासुद्धा तेवढाच अभिमान वाटत असतो, संरक्षण दलात असणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल एक आदराची भावना आपल्या सर्वाच्याच मनात असते. इतर कुणाही पुढे सहसा न वाकणारे आपण सर्वसामान्य लोक सैन्य दलातील एखादा अधिकारी त्याच्या कडक, रुबाबदार युनिफॉर्ममध्ये समोर आलाच तर नक्कीच त्याला सलाम करायला (अंत:करणापासून) आपल्यालाही आवडेल याविषयी मला तीळमात्रही शंका नाही.
विद्यार्थी मित्रहो, बारावीनंतर लष्करी अधिकारी होणे हे जर तुमचे ध्येय असेल तर तुमचा निर्णय खरोखरच स्तुत्य आहे व करिअरसाठी निवडलेला एक उत्तम पर्याय तुमच्यासमोर असेलच परंतु त्याच जोडीला एक गोष्ट लक्षात घेणेही तितकेच गरजेचे आहे की, सैन्यात अधिकारी होण्यासाठी खडतर परिश्रम, प्रशिक्षण, शिक्षण यांना सामोरे जावे लागते. इथे प्रत्येक विद्यार्थी केवळ शारीरिक-दृष्टय़ाच नव्हे तर मानसिकदृष्टय़ा आणि नैतिकदृष्टय़ादेखील तितकाच कणखर असणे आवश्यक आहे. कारण इथला प्रत्येक प्रशिक्षणार्थी हा शौर्याचं मूर्तिमंत जिवंत प्रतीक असतो आणि पु. ल. देशथपांडेंनी तर म्हटलेलंच आहे की, ‘भक्कम देहापेक्षा भक्कम मनाशीच शौर्याचा संबंध अधिक असतो.’ तेव्हा सैन्यातील एखादा जवान शारीरिकदृष्टय़ा एखाद्या अधिकाऱ्यापेक्षा हट्टाकट्टा, उंचापुरा असू शकतो परंतु मानसिकदृष्टय़ा तो अधिकाऱ्याइतका बलवान असेलच असे नाही. निर्णायक परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता आणि अधिकार अधिकाऱ्याकडेच असतात. या क्षेत्रात जाण्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रनिष्ठा तर असायलाच हवी परंतु जबरदस्त इच्छशक्तीची आवश्यकता आहे. समुपदेशनासाठी आमच्याकडे आलेल्या एका सधन कुटुंबातील एकुलत्या एक मुलाची इ. आठवीमध्ये शिकत असल्यापासून सैन्यात अधिकारी होण्याची प्रचंड इच्छा होती. आई-वडिलांचा मात्र त्याला विरोध होता. इ. १२ वी सायन्समध्ये असताना तो विद्यार्थी पालकांसोबत आमच्याकडे आला. हुशार, बुद्धिमान असलेल्या आपल्या मुलाने इंजिनीअरिंगकडे जावं असं पालकांना वाटत होतं.परंतु मुलाचं ध्येय निश्चित झालं होतं, ते म्हणजे काहीही होवो सैन्यातच जायचं. त्या मुलाला विचारलेल्या पहिल्याच प्रश्नाच्या उत्तराने सर्वानाच निरुत्तर केलं. एवढा तो मुलगा स्वत:च्या निश्चयाशी ठाम होता. त्याला विचारलं, तुला सैन्यात जावंसं का वाटतं? तू असं का ठरविलंस? मित्रांनो, त्याने दिलेलं उत्तर एवढं निश्चयी होतं की, आम्हाला कळून चुकलं की, हा मुलगा करारी आहे व त्याला समजलंय की त्याला काय हवंय. त्याने दिलेलं उत्तर असं होतं की, सर मी आठवीला असताना एक हिंदी चित्रपट पाहिला जो सैन्यातील अधिकाऱ्यांशी निगडित जीवनावर आधारलेला होता. त्या चित्रपटात शेवटी युद्धात मरण पावलेल्या अधिकाऱ्याचा मृतदेह आपल्या राष्ट्रध्वजामध्ये (तिरंग्यामध्ये) गुंडाळलेला असतो. सर, मला वाटतं की मलादेखील असाच मृत्यू यावा आणि माझादेखील देह असाच तिरंग्यामध्ये गुंडाळून माझ्यावर अंत्यसंस्कार व्हावेत आणि म्हणूनच सैन्यात जाण्याची माझी तीव्र इच्छा आहे. आज तो मुलगा लेफ्टनंट या पदावर कार्यरत आहे. यालाच म्हणतात तीव्र इच्छाशक्ती! ही कोणतीही कल्पनेतील कथा नाही तर सत्य घटना आहे.
आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं अशी संस्था म्हणजे नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी. (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) ही संस्था पुण्यामध्ये खडकवासला येथे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ६ ऑक्टोबर, १९४९ या दिवशी बांधकामाचा शिलान्यास कार्यक्रम पार पडला तर १६ जाने. १९५५ या दिवशी त्या वेळचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले.
युनियन पब्लिक सव्‍‌र्हिस कमिशन (UPSC) न्यू दिल्ली यांच्यामार्फत वर्षांतून दोन वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलै या महिन्यांमध्ये एन. डी. ए. आणि नेव्हल अ‍ॅकॅडमीच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या विंग्जमध्ये प्रवेशासाठी देशपातळीवर स्पर्धा परीक्षा घेतली जाते. संपूर्ण भारतातून जवळजवळ तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसतात व त्यातून फक्त दोन हजार विद्यार्थ्यांची गुणवत्तेचे पूर्ण निकष लावून निवड केली जाते. लेखी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांमध्ये मुलाखतीस सामोरे जावे लागते. ही मुलाखत पाच दिवसांची असून, ती सव्‍‌र्हिस सिलेक्शन बोर्डामार्फत घेतली जाते.
पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे- 1) नागरिकत्व 2) उमेदवार भारताचा नागरिक असावा किंवा 3) भूतान किंवा नेपाळ या देशाचा नागरिक असावा किंवा 4) १ जानेवारी १९६२ पूर्वी भारतात कायमचे स्थायिक झालेले तिबेटी निर्वासित किंवा पाकिस्तान, श्रीलंका, ब्रह्मदेश, केनिया, युगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, झांबिया, मालावी, झैरे, इथिओपिया, व्हिएतनाम येथून भारतात स्थलांतरित झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीही अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : केवळ अविवाहित पुरुष उमेदवार ज्यांचे वय साडेसोळा वर्षे ते एकोणीस वर्षे याच्या दरम्यान आहे. तेच अर्ज करू शकतात. पूर्ण प्रशिक्षण संपेपर्यंत उमेदवाराला विवाह करण्याची परवानगी नसते.
शैक्षणिक पात्रता: आर्मीमधील प्रवेशासाठी - कोणत्याही शाखेची (आर्टस्, सायन्स, कॉमर्स, व्होकेशनल) इ. १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. एअरफोर्स व नेव्हीमधील प्रवेशासाठी किंवा नेव्हल अ‍ॅकॅडमीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रँच कोर्ससाठी- भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह इ. १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इ. १२वीला शिकत असलेले विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात. परंतु या उमेदवारांना सव्‍‌र्हिस सिलेक्शन बोर्डाची मुलाखत पास झाल्यानंतर मुलाखतीच्या वेळी किंवा ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावेच लागते.
शारीरिक पात्रता : उंची कमीतकमी १५७.५ सें.मी. व वजन उंचीच्या प्रमाणात असणे आवश्यक असते. एअरफोर्ससाठी १६२.५ सेंमी. उंचीच आवश्यक असते. तसेच पायांची उंची ९९ ते १२० सेंमी.च्या दरम्यान असावी लागते. मांडय़ांची लांबी ६४ सेंमी. असून, बसल्यानंतर उंची ८१.५ सेंमी ते ९६ सेमी. असणे आवश्यक.
लेखी परीक्षेचे स्वरूप : लेखी परीक्षा ही एकूण ९०० गुणांची असते. यामध्ये ३०० गुण गणित व ६०० गुण सामान्य क्षमता चाचणी असे दोन प्रत्येकी अडीच तासांचे पेपर्स असतात. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी असून, इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रश्नपत्रिका तयार केलेली असते. गणिताच्या पेपरमध्ये इ. ११ वी, १२ वीला अभ्यासलेल्या गणिती संकल्पनांवर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात तर सामान्य क्षमता चाचणीच्या पेपरमध्ये इंग्रजी व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात.
या परीक्षेची जाहिरात दीड ते दोन महिने अगोदर फक्त एकदाच रोजगार समाचार वा एम्लॉयमेंट न्यूज यासारख्या वर्तमानपत्रामध्ये येते. इच्छुक उमेदवारांनी त्याकडे लक्ष ठेवून विहित नमुन्यातील अर्ज, ‘सचिव, यू. पी. एस. सी., धोलपूर हाऊस, शाहजहान रोड, न्यू दिल्ली,’ या पत्त्यावर वेळेवर पाठविणे आवश्यक आहे. अर्जासोबत वय, शिक्षण, जात या संदर्भातील प्रमाणपत्रे जोडू नयेत, मात्र लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्रे (मूळप्रती) सादर करणे आवश्यक असते. महाराष्ट्रात मुंबई व नागपूर अशी दोन केंद्रे या परीक्षेसाठी उपलब्ध आहेत. प्रथम लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखत व त्यानंतर वैद्यकीय तपासणी अशा सर्व कसोटय़ांमधून तावूनसुलाखून बाहेर पडलेल्या उमेदवारांची मेरीट लिस्ट तयार करून त्यानुसार आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा नेव्हल अ‍ॅकॅडमीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रँचसाठीच प्रवेश सुकर होतो. त्यानंतर जागतिक स्तरावर मान्यता पावलेल्या एन.डी. ए.सारख्या नामवंत संस्थेमध्ये उमेदवारांना चार वर्षे ट्रेनिंग दिले जाते. या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च भारत सरकार करते. वर्षांला प्रत्येक प्रशिक्षणार्थीमागे जवळजवळ चार लाख रुपये खर्च येत असतो. पहिली तीन वर्षे एन. डी. ए.त व चौथे वर्ष ज्या विशिष्ट दलाची निवड केलेली असते त्या दलाच्या प्रशिक्षणासाठी असते. तसेच पहिल्या अडीच वर्षांमध्ये शैक्षणिक शिक्षण देऊन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची बी.ए./ बी.एस्सी.ची पदवी देण्यात येते. एकूण या लष्करी सेवेत दाखल होण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांना कठोर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते व त्यानंतर या प्रशिक्षणातूनच तयार होत असतो एक कर्तव्यनिष्ठ, धाडसी, धर्मनिरपेक्ष वृत्तीचा, निर्णयक्षम, शत्रूला यमसदनास पाठविण्यासाठी प्रसंगी प्राणांची आहुती देण्यास तयार असलेला, वीरमरणाला निधडय़ा छातीने सामोरे जाणारा एक लढवय्या भारतीय लष्करी अधिकारी. आकर्षक वेतनश्रेणीसोबत मोफत रेशनिंग सुविधा, विनामूल्य प्रवास, लाईफ इन्शुरन्स, विनामूल्य उत्तम दर्जाची आजीवन वैद्यकीय सेवा या आणि इतरही बऱ्याच सुविधा या अधिकाऱ्यांना मिळतात.
‘‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’’ या गीताचे शब्द हृदयात साठवून देशप्रेमाने ज्यांचे मन भारून गेलेले आहे, देशाच्या प्रती ज्यांच्या हृदयात ठायी ठायी अभिमान साचलेला आहे, ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारधारेणमध्ये जे चिंब न्हाऊन निघालेले आहेत, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या व शिवरायांच्या कथा लहानपणापासून ऐकत मोठे होत असलेल्या माझ्या तरुण, धाडसी वृत्तीच्या विद्यार्थी बांधवांनो, मेडिकल, इंजिनिअरिंग अन् त्यापाठोपाठ एम. बी. ए.चं फॅड असलेल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्यासारख्या बुद्धिमान आणि शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सशक्त हिंदपुत्रांनो, तुम्ही एन. डी. ए.चा पर्यायदेखील डोळ्यासमोर ठेवू शकता. ऐन तारुण्यात असलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलाला गमावलेले आई-बाबा जेव्हा म्हणतात की, आम्हाला आणखी एखादा मुलगा असता तर त्यालादेखील आम्ही सैन्यातच पाठविलं असतं तेव्हा तर आपल्या भारतीय संस्कृतीला व या उज्ज्वल संस्कृतीत तयार झालेल्या अशा माता-पिता पुत्रांच्या कुटुंबाला कडकडीत ‘सॅल्युट’ ठोकावा असे वाटते आणि असे शूर पुत्र तयार होतात कुठे, तर आपल्या देशातील, आपल्या महाराष्ट्रातील एन. डी. ए.मध्ये आणि म्हणूनच सुप्रसिद्ध कवी कै. दु. आ. तिवारी म्हणतात त्याप्रमाणे म्हणावेसे वाटते की,
सोन्याचा धूर कोठे तर भारतखंडामध्ये,
रत्नाच्या खाणी कोठे तर हिंदुस्थानमध्ये,
अमृताची वृष्टी कोठे तर आर्यावर्तामध्ये

अन् याच्याही पुढे जाऊन असे मनात येते की, शूरवीरांची खाण कोठे तर आपल्या महाराष्ट्रातील एन. डी. ए.मध्ये!
सुहास कदम
SuhasKadam11@yahoo.in