Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
क्रीडा

हाण पठाण
राजस्थान रॉयलची डेअरडेव्हिल्सवर मात

सेंचुरियन, २८ एप्रिल / वृत्तसंस्था

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये झंझावाती फलंदाजी करून विजयाचा घास अक्षरश: हिरावून घेणाऱ्या राजस्थान रॉयलच्या युसूफ पठाणने पुन्हा एकदा आपला हिसका दाखविला. यावेळी प्रतिस्पर्धी संघ होता, दिल्ली डेअरडेव्हिल्सचा. अवघ्या ३० चेंडूंत ६ षटकार व ३ चौकारांसह ६१ धावांची वादळी खेळ करणाऱ्या पठाणने राजस्थान रॉयलचा विजय झटपट दृष्टीपथात आणला आणि आपल्या संघाला गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर नेले. राजस्थानने हा सामना पाच विकेट्सनी जिंकला. सलामीवीर ग्रॅमी स्मिथने (४४) धावांची सावध खेळी केली.

तळाचे संघ झेप घेतील?
कोलकाता नाइट रायडर्स-बंगलोर रॉयल चॅलेंजर्समध्ये लढत
दरबान, २८ एप्रिल/ पीटीआय
‘ नाम बडे और दर्शन खोटे’ याला साजेसे असलेले कोलकाता नाईट रायडर्स आणि बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स हे दोन्हीही गुणतालिकेत खाली असलेले संघ उद्या एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या दोन्हीही संघाच्या दृष्टीने हा सामना जिंकणे महत्वाचा असेल, कारण जो संघ या सामन्यात पराभूत होईल त्याला अंतिम स्थानावर जावे लागणार आहे. दोन्हीही संघामध्ये काही गोष्टींची समानता पहायला मिळते.

मुंबई इंडियन्ससमोर किंग्ज इलेव्हनची परीक्षा
दरबान, २८ एप्रिल/ पीटीआय

सलग दोन सामने जिंकून युवराज सिंगचा किंग्ज इलेव्हन पंजाब हॅट्ट्रीक करण्याच्या तयारीत असला तरी मुंबई इंडियन्सचा उद्याचा पेपर त्यांना सोपा जाणार नाही हे मात्र नक्की. पंजाबचा संघ दोन सामने जिंकून फॉर्मात आला असला तरी मुंबईच्या संघाने ज्याप्रकारे गेला सामना जिंकला आहे, ते पाहता त्यांना पराभूत करणे फारच अवघड जाऊ शकते. पंजाबला पहिले दोन सामने पावसामुळे गमवावे लागले होते, पण त्यानंतर गतविजेत्या राजस्थान रॉयल्स आणि बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स यांना पराभूत करीत त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे मुख्यालय मुंबईत; भारतात २९ सामने
मुंबई, २८ एप्रिल / क्री. प्र.

पाकिस्तानकडून २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे सहयजमानपद काढून घेतल्यानंतर आता पाकिस्तानात होणारे १४ सामने भारत, श्रीलंका व बांगलादेशात खेळविण्यात येणार असून भारतात ४९पैकी एकूण २९ सामने होतील. त्याशिवाय, या स्पर्धेच्या संयोजन समितीचे मुख्यालयही मुंबईत हलविण्यात येणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या पुनर्रचित संयोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या स्पर्धेची उद्घाटनाची लढत बांगलादेशात १९ फेब्रुवारी २०११रोजी होणार असून अंतिम सामना भारतात होईल.

क्लार्कगिरी चालली
कर्णधार मायकेल क्लार्क ठरला सामनावीर
तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाची मालिकेत आघाडी

अबुधाबी, २८ एप्रिल, वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात २७ धावांनी पराभव करुन पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळविली. कर्णधार मायकेल क्लार्क याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा विजय संपादन केला. या मालिकेतील चौथा सामना १ मे रोजी तर पाचवा सामना ३ मे रोजी खेळविण्यात येईल. क्लार्कच्या ६६ धावांच्या झुंजार खेळीमुळेच ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ७ बाद १९८ अशी मजल मारता आली.क्लार्कने पाकिस्तानचे तीन गडी अवघ्या पंधरा धावात बाद करुन पाकिस्तानचा डाव १७१ धावांत गुंडाळण्यात मोठा वाटा उचलला.

आयपीएलनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनातही यशस्वी होऊ
दक्षिण आफ्रिकेला आत्मविश्वास
वॉशिंग्टन, २८ एप्रिल, वृत्तसंस्था
अत्यंत कमी मुदतीत इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्यामुळे २०१० साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे अशाच रीतीने यशस्वीरीत्या आयोजन करण्याचा विश्वास दक्षिण आफ्रिकेला वाटू लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचे अमेरिकेतील राजदूत वेली नॅपो यांनी सांगितले की, इंडियन प्रीमियर लीगसारख्या स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे सर्व तऱ्हेच्या परिस्थितीशी मुकाबला करण्याचा अनुभव आमच्या गाठीशी जमा होईल.आता क्रीडा स्पर्धासाठीची सुरक्षा हा जागतिक मुद्दा बनला आहे. आम्हाला ‘आयपीएल’ च्या आयोजनासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला होता.

‘बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स’चे कर्णधारपद पुन्हा द्रविडकडे?
दरबान, २८ एप्रिल/वृत्तसंस्था
केविन पीटर्सनच्या अनुपस्थितीत बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या कर्णधारपदाची सूत्रे कोणाकडे सोपवायची, असा पेच संघ व्यवस्थापनापुढे पडला आहे. फॉर्मात नसलेल्या जॅक कॅलिसऐवजी राहुल द्रविड याच्याकडेच कर्णधारपद सोपवावे, असा मतप्रवाह व्यवस्थापनात आढळून येतो आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पहिलाच सामना जिंकून बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाने चांगली सुरुवात केली होती.

डॉ. के. एम. मुन्शी स्मृती ट्वेण्टी-२० क्रिकेट : युनायटेड स्पोर्ट्सच्या विजयात शेख, मन्सुरीची चमक
मुंबई, २८ एप्रिल / क्री. प्र.
मुनिफ शेख (९/४ बळी) व इम्तियाझ मन्सुरी (१४/३ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे युनायटेड स्पोर्ट्स क्लबने के. एम. मुन्शी स्मृती (१४ वर्षांखालील) ट्वेण्टी-२० क्रिकेट स्पर्धेत रायझिंग स्टार क्रिकेट अ‍ॅकॅडमीला ७६ धावांतच गुंडाळले. नंतर सैफ खानने २९ चेंडूत नऊ चौकारांसह नाबाद ४५ धावा करून ८.३ षटकांतच संघाला विजयी केले.

मुंबई इंडियन्स प्रगतीपथावर - सचिन
पोर्ट एलिझाबेथ, २८ एप्रिल / वृत्तसंस्था

प्रत्येक सामन्यागणिक आमच्या संघाची प्रगती होत आहे, असे मत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले.सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ९२ धावांनी दणदणीत पराभव केल्यानंतर सचिन पत्रकारांशी बोलत होता. या सामन्यात सचिन आणि सनथ जयसूर्या यांनी दणकेबाज फलंदाजी करुन आपल्या संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. सचिनने ४५ चेंडूत ६८ धावांची दणकेबाज खेळी केली. या कामगिरीबद्दल सचिनला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तो म्हणाला की, सनथ आणि माझ्या भागीदारीमुळे आम्ही दोनशेपेक्षा अधिक धावा करु शकू असे वाटत होते.पण तसे झाले नाही. आमच्या कामगिरीत प्रत्येक सामन्यागणिक सुधारणा होते आहे याचे मला समाधान आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार ब्रेंडन मॅक्कुलम म्हणाला की, आम्हाला आमच्या कामगिरीबद्दल एकत्र येऊन विचार करावा लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज झहीर खान म्हणाला की, तेंडुलकर आणि जयसूर्या यांच्या दणकेबाद भागीदारीने आमचा विजय पक्का झाला.

पेस-भूपती यांना पहिल्या फेरीत ‘बाय’
रोम, २८ एप्रिल/ पीटीआय

भारताचे स्टार टेनिसपटू लिएंडर पेस आणि महेश भूपती यांना २७, ५०, ००० युरो रोख रक्कमेच्या आंतरराष्ट्रीय बी.एन. एल. डी’ईटालिया एटीपी टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाय मिळाला आहे. पेस आणि त्याचा झेक प्रजासत्ताकचा सहकारी लुकास ड्लॉही या तिसऱ्या मानांकित जोडीचा दुसऱ्या फेरीत निकोलस अलमाग्रो-डेव्हिड फेरर आणि स्टीफन हस-फ्रॅन्टीसेक सेरमार्क यांच्यातील विजेत्याशी त्यांचा सामना होणार आहे. चौथ्या मानांकित महेश भूपती आणि त्याचा बहामाचा साथीदार मार्क नोएल्स यांचा सामना मारत साफिन-ईगोर अ‍ॅन्ड्रीव्ह आणि फेलिसिअ‍ॅन्हो-फर्नाडो वरदासेको यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

ट्वेन्टी २० विश्वचषक स्पर्धा: झुलन गोस्वामीकडे भारताचे नेतृत्व
नवी दिल्ली, २८ एप्रिल/प्रतिनिधी

इंग्लंडमध्ये जून महिन्यात होणाऱ्या महिलांच्या आयसीसी ट्वेन्टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू झुलन गोस्वामीकडे सोपविण्यात आले आहे.महिलांच्या राष्ट्रीय निवड समितीने आज येथे हा संघ जाहीर केला. एक दिवसाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या संघातील थिरुश कामिनी, स्नेहल प्रधान व श्रावंती नायडू यांच्याऐवजी बबिता मंडलिक, लतिका कुमारी व डायना डेव्हिड यांना संधी देण्यात आली आहे. ही स्पर्धा पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेबरोबरच आयोजित केली जाणार आहे. भारतीय संघ- झुलन गोस्वामी (कर्णधार), अमिता शर्मा (उपकर्णधार), मिताली राज, अंजुम चोप्रा, रुमेली धर, सुलक्षणा नाईक (यष्टीरक्षक), अनघा देशपांडे (यष्टीरक्षक), प्रियांका रॉय, रिमा मल्होत्रा,गोहर सुलताना, हरमान प्रीत कौर, पूनम राऊत, बबिता मंडलिक, लतिका कुमारी, डायना डेव्हिड.

वेरॉक कप क्रिकेट : बडोद्याचा मुंबईवर सनसनाटी विजय
पुणे, २८ एप्रिल / क्री. प्र.

बडोदा संघाने मुंबईवर दोन विकेट्सनी विजय मिळवून वेरॉक कप (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळविला. येथील वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या अंतिम लढतीत मुंबईने दुसऱ्या दिवसाअखेर १२७ धावांची आघाडी मिळवत घट्ट पकड बसविली होती. मात्र आज बडोद्याचा डावखुरा फिरकी गोलंदाज कृणाल पंडय़ा (३०/६) व ऑफस्पिनर रौनक पटेल (१०/३) यांनी ९४ धावांतच मुंबईचा दुसरा डाव गुंडाळला. केवळ ५० धावांतच मुंबईचे आठ फलंदाज बाद झाल्याने बडोदा संघासमोर विजयासाठी १७८ धावांचे आव्हान होते. त्यांनी आठ बळी गमावून हे लक्ष्य पार केले आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या विजयासह वेरॉक कपवर आपले नाव कोरले. मुंबईच्या जावेद खान (४३/३), आकीब शेख (३१/२) व प्रतीक दाभोळकर (४९/२) या गोलंदाजांनी प्रयत्नांची शर्थ केली; पण संघाला विजयी करण्यात मात्र ते अपयशी ठरले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.संक्षिप्त धावफलक- मुंबई- २२४ व ९४ (सिद्धार्थ परब ३४, कृणाल पंडय़ा ३०/६, रौनक पटेल १०/३) पराभूत वि. बडोदा १४१ व ८ बाद १८० (सागर मंगलोकर नाबाद ३९, परमजीत सिंग ३८, जावेद खान ४३/३)