Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
व्यक्तिवेध

बॉक्स ऑफिसवर हुकमी गर्दी खेचणारा लोकप्रिय स्टार म्हणून, पुरस्कारांची परंपरा निर्माण करणारा अभिनेता म्हणून फिरोजखान हा अगदी पहिल्या फळीतला कधी ठरला नसेल, पण अपार जिद्द, स्वत:च्या शर्तीवर बादशाही थाटात जगणारा राजा माणूस आणि तरीही सहवासात येणाऱ्या सर्वाना लोभस अनुभव देणारा दोस्त माणूस म्हणून तो चित्रपटसृष्टीला प्रिय होता. बंगलोरजवळच्या त्याच्या आवडत्या फार्म हाऊसवर त्याचा अंत्यसंस्कार झाला त्यावेळी त्याला निरोप देणाऱ्यांची आणि मुंबईतूनही ‘अलविदा दोस्त’ म्हणत त्याच्या दिलदार आठवणी जागवणाऱ्यांची संख्या हा त्याच्या व्यक्तिमत्वाच्या या किमयेचाच पुरावा होय.

 

फिरोजखानचे वडील सादिक अली हे वंशाने पठाण. मूळचे अफगाणिस्तानातल्या गझनीचे. बंगलोरमध्ये येऊन स्थिरावलेले. आई इराणी वंशाची. त्यामुळे बंगलोर हेच फिरोजखानचे गाव झाले. पठाणी देखणेपण आणि वागण्या-राहण्याचा पाष्टिद्धr(२२४)चमात्य रुबाब अंगी मुरलेल्या फिरोजखानने १९५९मध्ये मुंबईला प्रस्थान ठेवले ते चित्रपटसृष्टीत अभिनेता बनण्याच्या उद्देशानेच. १९६० साली ‘दीदी’ नावाच्या चित्रपटात त्याला छोटीशी भूमिका मिळाली. फिरोजखानने बरीच वर्षे संघर्ष केला, लहान लहान भूमिका केल्या, दुय्यम स्थानावर रहावे लागले. दुसरा एखादा कलावंत आपले होतकरूपण वैफल्यात बुडवून बसला असता. तसे अनेकांनी केले. पण फिरोजखान वेगळा होता. त्याचा उपजत आब कधी कोमेजला नाही. आणि मग १९६५मध्ये ‘ऊंचे लोग’ आला. कथेच्या साच्याला चिकटून राहण्याच्या त्या काळात ‘ऊंचे लोग’ने वेगळेपणाचे धाडस केल. त्यात फिरोजखान नायक होता, पण नायक-नायिकेची नेहमीची गोष्ट नव्हती. मुळात नायिका ‘हाये रे तेरे चंचल नैनवा’ या फ्लॅशबॅकमधल्या गाण्यात दिसली-न-दिसली एवढीच असते. प्रेम करून,जबाबदारीपासून पळ काढणारा, प्रेयसीच्या आत्महत्येला आपण जबाबदार असल्याच्या अपराध भावनेने कुरतडला जाणारा आणि लपू पाहणारा नायक फिरोजखानने यात साकार केला होता. शिवाय तो एकटाच नायक नव्हताच. त्याच्या मोठय़ा भावांच्या भूमिका करणारे अशोककुमार आणि राजकुमार हे दिग्गजही ‘ऊंचे लोग’चे नायक होते. या धाडसी चित्रपटाने प्रेक्षकांना फिरोजखानची दखल घ्यायला लावली. म्हणून तो फार मोठा स्टार गणला जाऊ लागला असेही नव्हे. ‘आरजू’, ‘आदमी और इनसान, ‘सफर’ अशा ‘ए’ ग्रेड चित्रपटांतून त्याला सहनायकाच्या दुय्यम भूमिका मिळत गेल्या. ‘मेला’मध्ये तर त्याच्यानंतर चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या भावाबरोबर- संजयखानबरोबर- त्याला सहनायक व्हावे लागले. मात्र तो तिथेच थांबला नाही. निर्माता-दिग्दर्शक बनला आणि त्याने आपले वैशिष्टय़ सिद्ध करून दाखवले. कोपोलाच्या ‘गॉडफादर’ वरून प्रेरणा घेत त्याने ‘धर्मात्मा’ बनवताना काश्मीर-हॉलंड-स्वित्र्झलडच्या लोकेशन्सचा पायंडा मोडत चक्क अफगाणिस्तानच्या लोकेशनची अनवट वाट चोखाळली. ‘धर्मात्मा’ आणि ‘कुर्बानी’ हे चित्रपट म्हणजे फिरोजखानच्या यशाची अत्युच्च शिखरे होती. ‘कुर्बानी’मध्ये त्याने कॅबरे गायिकेला कथेची नायिका बनवले. नाझिया हसनचे ‘आप जैसा कोई’ त्याने ‘कुर्बानी’मध्ये सादर केले आणि त्या गाण्याची क्रेझ निर्माण झाली. बिद्दू या नव्या संगीतकाराच्या वेग़ळ्या बाजाचेही परिमाण त्याने ‘कुर्बानी’ला दिले. पुढच्या काळात आपला मुलगा फरदीन याला पेश करण्यासाठी त्याने ‘जाँनशीन’ बनवला. हॉलीवूडच्या वेस्टर्नपटातल्या काऊबॉयच्या व्यक्तिरेखांचे त्याला आकर्षण होते आणि हिंदी चित्रपटांतून तशा भूमिका करताना त्या त्याला शोभूनही दिसत. त्याला हिंदी सिनेमाचा क्लिंट ईस्टवूडही म्हटले जाई. त्याच्या पुरुषी सौंदर्याची, त्याच्या रुबाबाची, स्टाइलची तारीफ करायला त्याच्या नायिकांना त्याच्या प्रेमात पडावे लागत नव्हते. आणि मुंबईच्या चित्रपटसृष्टीत रमला तरी त्याची बंगलोर आणि तिथल्या फार्म हाऊसची, रेसच्या त्याच्या घोडय़ांची ओढ कधी कमी होत नव्हती. विविध मॉडेलच्या मोटरगाडय़ा, काररेस, प्राणी, घोडय़ांच्या शर्यती, उंची मद्य यांचा तो भोक्ता होता आणि एकूण रुबाबातून रुजून आलेले उद्दामपण आणि वागण्यातले सहज सौजन्य, स्त्रीदाक्षिण्य यांचा अजब मेळ त्याच्या व्यक्तिमत्वात होता. म्हणूनच त्याच्या मृत्यूने आपला दोस्त, राजा माणूस गेल्याची भावना साऱ्या चित्रपटसृष्टीची झाली.