Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

ट्रकची ऑटोला धडक; ५ ठार
चांदूरबाजार, २८ एप्रिल / वार्ताहर

कोंडवर्धा फाटय़ावर भीषण अपघात
मृतात दोन बहिणी व मायलेकींचा समावेश
चांदूरबाजारवरून परतवाडय़ाकडे वेगाने जाणाऱ्या दहाचाकी ट्रकने कोंडवर्धा फाटय़ावर ऑटोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ऑटोमधील एक शाळकरी मुलगी व चार महिला घटनास्थळीच ठार झाल्या तर एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. ऑटोचालकासह दोघांना गंभीर अवस्थेत अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मूर्तीजापुरात महाराष्ट्रदिनी पहिल्या ‘हायटेक’ शाळेचे लोकार्पण
मूर्तीजापूर, २८ एप्रिल/ वार्ताहर

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय सोप्या पद्धतीने समजावून देण्यासाठी डिजिटल पद्धतीच्या खोल्या असलेली ‘हायटेक’ शाळा मूर्तीजापुरात प्रथमच सुरू होत असून तिचा या महाराष्ट्र दिनी लोकार्पण सोहोळा आयोजित करण्यात आला आहे.
रामदेव बहुउद्देशीय प्रतिष्ठानद्वारा संचालित सरला राम काकाणी एज्युकेशन अ‍ॅकेडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला संस्थाचालकांनी डिजिटल स्वरूपात प्रयत्न केला असून नर्सरीपासून सहावी पर्यंत असलेल्या या शाळेची प्रत्येक खोली अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज करण्यात आली आहे.

कटकवार शाळेला ‘पर्यावरण मित्र व संरक्षक’ पुरस्कार
साकोली, २८ एप्रिल / वार्ताहर

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्यावतीने कृष्णमुरारी कटकवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला संत तुकाराम महाराज ‘पर्यावरण संरक्षण’ पुरस्कार देण्यात आला. यानिमित्त राज्यपातळीवर रंगभरण, चित्रकला व निबंधस्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत नेचरक्लबचे तीनही गटाचे १६० पेक्षा जास्त सदस्य सहभागी झाले. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती व कृतिशीलता निर्माण केल्याबद्दल राष्ट्रीय हरित सेना, ग्लोबल नेचर व इको क्लबचे संघटक प्रा. अशोक गायधने, प्राचार्य के.ए. नागलवाडे व व्ही.ए. सुकारे यांना श्री संत तुकाराम महाराज पर्यावरण संरक्षक पुरस्कार प्रमाणपत्र व चषकासह प्रदान करण्यात आला.

सराफा व्यावसायिकांना फसवणारी टोळी जाळ्यात
अमरावती, २८ एप्रिल / प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील सराफा व्यावसायिकांकडे सोन्याचे दागिणे गहाण ठेवून व्यापाऱ्यांना लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंध्र प्रदेशातील लुटारूंच्या टोळीला बडनेरा पोलिसांनी सोमवारी अटक केली. ही टोळी बडनेरा येथील एका सराफा व्यावसायिकाला फसविण्याच्या तयारीत होती. आरोपींकडून १२०८ ग्रॅम वजनाचे बनावट व काही सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बिरला व्यंकट आप्पा जेडीपल्ली (४५), धनराज रामास्वामी जेडीपल्ली (२५, दोघेही रा. कंदीअलापल्ली, हैदराबाद), सीनू चिन्ना अलपाटी (२७), लक्ष्मी विरण्णा जेरीपल्ली (४५), तिरुमाला बालकिसन जेडीपल्ली (३५) व मंगा विरल्ला जेडीपल्ली (१९, सर्व राहणार तारीपल्ली, हैदराबाद) यांचा समावेश आहे.

ट्रकने दोन महिलांना चिरडले; भामराजा येथे तणाव, रास्ता रोको
यवतमाळ, २८ एप्रिल / वार्ताहर

मागाहून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला चिरडून जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी भामराजा येथे घडली. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण होऊन गावकऱ्यांनी दोन तासपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर तणाव निवळला. या संबंधीची माहिती अशी की, यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भामराजा येथील पुष्पा ऊर्फ कमला श्यामराव जगताप (४८) आणि शकुंतला श्यामराव काकडे (४२) या दोन महिला मंगळवारी पहाटे ५ वाजता रस्त्याच्या कडेने शौचासाठी पायी जात असताना मागाहून येणाऱ्या अज्ञात ट्रकने दिलेल्या जबर धडकेत या दोघीही ट्रकखाली चिरडल्या गेल्या आणि जागीच ठार झाल्या.
दरम्यान, ट्रक चालक ट्रकसह फरार झाला. हा ट्रक यवतमाळहून आर्णीकडे जात होता. घटनेचे वृत्त समजताच गावात असंतोष निर्माण होऊन गावकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको केले. त्यामुळे दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. यवतमाळहून मांडवा येथे जाणाऱ्या मनीष देव यांनी रास्ता रोको घटनेची माहिती पोलीस अधीक्षक शिवाजी बोडखे यांना भ्रमणध्वनी करून कळविली तेव्हा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी.वाय. बेंद्रे आणि त्यांचा पोलीस ताफा घटनास्थळी गेल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. दोन्ही मृतदेहांची यवतमाळात उत्तरीय तपासणी करण्यात आली. ट्रक चालकाचा शोध पोलीस घेत आहे.

मेळघाटातील बासपाणी गावाला वणव्यापासून धोका
धारणी, २८ एप्रिल/ वार्ताहर

मेळघाटातील बासपाणी गावाजवळील जंगलात मंगळवार सकाळपासून वणव्याने पेट घेतला आहे. या आगीपासून बासपाणी या आदिवासी गावाला धोका निर्माण झाला आहे. सकाळपासून असलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी बासपाणीच्या जंगलात पोहोचलेले नसल्यामुळे बासपाणी येथील आदिवासी संतप्त झालेले आहेत. बासपाणीच्या जंगलात सर्वाधिक तेंदूपानाचे उत्पादन होते. मंगळवारी अचानक लागलेल्या या वणव्यामुळे तेंदूपाने तोडण्याचा हंगाम समोर आहे. मोहफुले वेचण्याचा हंगाम संपल्याने वनविभाग आता आदिवासींवर आगी लावण्याचे आरोप करू शकत नाही. आगडोंब बासपाणी गावाकडे उसळत असल्यामुळे आदिवासी हवालदिल झाले आहेत. बासपाणी हे गाव धारणीपासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर असून वाऱ्याचा झोका आल्यास बासपाणी मांडवा आणि दिया या गावांनाही ही आग कवेत घेऊ शकते. आदिवासींनी सकाळपासून वनविभागाला सूचना दिली. अक्षय तृतीया सणामुळे वनविभागाच्या कार्यालयात कोणीही उपस्थित नाही. बासपाणी गावाजवळून लागलेल्या आगीत संपूर्ण जंगलच जळून खाक होण्याच्या मार्गावर आहे.

रानडुकराचा महिलेवर हल्ला
चंद्रपूर, २८ एप्रिल / प्रतिनिधी

कोठारी वनपरिक्षेत्र अंतर्गत चेकफुटाना परिसरातील जंगलात तेंदूपाने संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर काल सकाळी ८ वाजताच्या सुमारास रानडुकराने हल्ला करून जखमी केले. प्रमिला चरणदास चांदेकर(४५) रा. चेकफुटाना असे जखमी महिलेचे नाव आहे. तेंदूपाने गोळा करीत असताना रानडुकराने हल्ला केला. यात ती जखमी झाली. तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

भाऊसाहेब देशमुखांची माहिती संकेतस्थळावर
अकोला २८ एप्रिल / प्रतिनिधी

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची दुर्मिळ छायाचित्रे व माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पद्मर्षी डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते या ब्लॉगचे उदघाटन श्री शिवाजी महाविद्यालयात नुकतेच करण्यात आले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संकेत राऊत यांनी भाऊसाहेबांची माहिती संके तस्थळावर देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाऊसाहेब डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम या संकेत स्थळावर तसेच शिवाजी अकोला डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर भाऊसाहेबांच्या फोटोवर क्लिक केल्यास हा ब्लॉग पाहता येतो. या कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके, रमेश हिंगणकर, अरविंद तिडके, दिनकर गायगोले, ह.बा. ठाकरे, प्राचार्य सुभाष भडांगे, आशीष राऊत, श्रीकृष्ण राऊत, एम.आर. इंगळे, विनय पैकीने, दिनकर पाटील, राहुल माहुरे, मनोहर वासनिक आदी उपस्थित होते.

महिला होमगार्डस्ने आदर्श प्रस्थापित करावा -अ‍ॅड. खोब्रागडे
भंडारा, २८ एप्रिल / वार्ताहर

व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचा प्रयत्न करीत समाजसेवीची कास महिला होमगार्डस्नी सोडू नये, यातूनच समाजासमोर त्या एक आदर्श प्रस्थापित करू शकतील, असे विचार मारेगाव (शहापूर) येथील पुनर्वसन केंद्राच्या पटांगणावर आयोजित भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ाच्या महिलांच्या होमगार्ड शिबिराच्या समारोप प्रसंगी जिल्हा समादेशक अ‍ॅड. धनराज खोब्रागडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महिला होमगार्डस्ची प्रात्यक्षिके झालीत. प्रास्ताविक सहायक शिबीर प्रमुख राऊत यांनी केले. आभार निदेशक रूपेश दिवटे यांनी मानले.

वर्धा नदीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या
चंद्रपूर, २८ एप्रिल / प्रतिनिधी

बल्लारपूर येथील साईबाबा नगरात राहणाऱ्या २६ वर्षीय युवकाने वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. शैलेश दिलीप खेकारे असे मृताचे नाव आहे. मृत शैलेश हा ऑटोचालक होता. काही दिवसांपूर्वीच त्याचे लग्न जुळले. मात्र त्यास त्याचा विरोध होता, असे पोलिसांकडून समजते. त्यामुळे त्याने राजुरा-बल्लारपूर मार्गावरील पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. बल्लारपूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. १.२६ लाखाचा माल लंपास भद्रावती येथील भोजवॉर्डातील निवासी महमद फिराज महमद नसीर यांच्या घरी चोरी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यात सोने चांदीचे दागिने व रोख असा एकूण एक लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबवला. भद्रावती पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार तामगाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. भद्रावती शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे.

एका आरोपीला जन्मठेप, दुसऱ्याला दोन वर्षे कारावास डोमा मसराम खून प्रकरण
वर्धा, २८ एप्रिल / प्रतिनिधी

हिवरा येथील गाजलेल्या खूनप्रकरणी आरोपी मारुती नागतोडे यास जन्मठेप तर दुसरा आरोपी रामू दौलत कोटनाके यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांनी हा निकाल दिला. हिवरा (साखरा) येथील डोमा मसराम याचा दारूच्या वादातून ११ जून २००६ ला खून करण्यात आला. खून केल्यानंतर मृताचे कपडे काढून मृतदेह धामनदीच्या पात्रात सोडण्यात आला. हे प्रकरण सिंदी पोलीस ठाण्याकडे चौकशीसाठी आले. यात आरोपी मारुती नागतोडे (पिंपळगाव) याला साक्षीदार व श्वानपथकाने केलेल्या तपासात दोषी मानून जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून राजू क ोटनाके यास मुक्त करीत केवळ पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली दोन वर्ष्ेा सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली. आरोपी राजू कोटनाके याच्यावतीने अ‍ॅड. भाऊसाहेब लांबट तर आरोपी मारुती नागतोडे याच्यावतीने अ‍ॅड. जे.बी. तिनघसे तर शासनाच्यावतीने अ‍ॅड. एस.आर. दुबे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

बुरकोणीत साईमूर्ती प्रतिष्ठापना सोहोळा
हिंगणघाट, २८ एप्रिल / वार्ताहर

हिंगणघाट तालुक्यातील बुरकोणी येथे संत साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात साईमूर्ती प्रतिष्ठापना सोहोळा उत्साहात पार पडला. सर्वप्रथम स्थानिक गावकरी व विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या गजरात दिंडी व पालखी काढली. चित्रपटातील साईबाबांच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध पावलेले सिने कलावंत सुधीर दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत नामवंत कलावंतांचा ‘सुरमयी शाम साई के नाम’ हा साई गीतांचा कार्यक्रम मूर्ती स्थापनेच्या पर्वावर घेण्यात आला. नरेंद्र नासिरकर यांनी कार्यक्रमात दळवी यांच्यासोबत सुरेख संवाद साधून कार्यक्रमाचा आनंद वाढविला.या कार्यक्रमात सुधीर दळवी यांचा मानपत्र तसेच शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. साई मूर्ती स्थापना सोहोळ्याला नागपूर येथील स्वामी बलदेव भारती, गडचिरोलीचे गायक नरेंद्र लोंढे, विजयबाबा आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आमदार राजू तिमांडे, प्राचार्य हेमंत तिमांडे यांनी परिश्रम घेतले.

वत्सगुल्म काण्व परिषद अध्यक्षपदी बालाजी शास्त्री देव
वाशीम, २८ एप्रिल / वार्ताहर

येथील वत्सगुल्म काण्व परिषदेच्या अध्यक्षपदी बालाजी शास्त्री देव, उपाध्यक्षपदी जगदीश कुळकर्णी अमानकर तर सचिवपदी अनिल घुमकेकार यांची निवड करण्यात आली.
येथील वत्सगुल्म काण्व परिषदेची सर्वसाधारण सभा येथील करुणेश्वर मंदिरामध्ये अखिल भारतीय काण्व परिषदेचे अध्यक्ष राजाभाऊ साकलगावकर (जालना) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये वत्सगुल्म काण्व परिषदेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये कोषाध्यक्षपदी अनंत देशमुख, सदस्यपदी श्याम देव, गजानन बावणे, अभिजित संगवई, जयंत अनसिंगकर, प्रशांत ढोले, श्रीपाद लक्रस, गणेश देशमुख यांची तर सल्लागारपदी श्याम देशपांडे, पुरुषोत्तम लक्रस, गोविंद बावणे, अशोक संगवई, मधुकर ढोले, ज्योती चंद्रकांत देशमुख, मिनल सात्वीक देशपांडे, सोनी जयंत देव यांची निवड करण्यात आली. या सभेस अखिल भारतीय काण्व परिषदेचे महासचिव श्याम काण्णव (नाशिक), डॉ. चौकुले (जालना), कोषाध्यक्ष- भगूरकर (औरंगाबाद), विनायकराव देशपांडे (अकोला), श्याम देशपांडे, चंद्रकांत देशमुख आणि वाशीम शहरातील काण्व शाखीय बांधव उपस्थित होते. यावेळी श्याम काण्णव व पुरुषोत्तम लक्रस यांची भाषणे झाली.

वृषाली महालेचे सुयश
बेला, २८ एप्रिल/ वार्ताहर

येथील विमलाबाई तिडके विद्यालयाची विद्यार्थिनी वृषाली महेंद्र महाल्ले हिने तालुकास्तरीय लोकसेवा आयोग पूर्व तयारी शालेय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय सुयश मिळविल्याने, तिची जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड झाली आहे. यामुळे तिचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांत सर्वत्र कौतुक होत आहे. उमरेड तालुक्यात यशस्वी करण्यात आलेल्या स्पर्धकात तिची निवड झाली आहे. ती शिक्षक महेंद्र के महाल्ले यांची कन्या आहे. ती यशाचे श्रेय मुख्याध्यापिका नैय्या मून व आई वडिलांना देते.

ट्रकखाली आल्याने एक ठार; एक जखमी
आकोट, २८ एप्रिल / वार्ताहर

आकोट-हिवरखेड मार्गावर ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. आकोटवरून हिवरखेडकडे जाणाऱ्या ट्रकच्या (क्र. ७३४५) मागील चाकाखाली मोटारसायकल आली. या अपघातात दुचाकीवर बसलेला हिराभाई जागीच ठार झाला तर दुचाकी चालक शेख रहमान हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले. मृत तेल्हारा तालुक्यातील बारूखेडा येथील रहिवासी होता. ट्रक चालक गजानन पालवे याने स्वत: अटक करवून घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आगीत तीन घरांचे नुकसान
भंडारा, २८ एप्रिल/ वार्ताहर

राष्ट्रीय महमार्गाला लागून असलेल्या कस्तुरबा गांधी वॉर्डातील तीन घरांना दुपारी अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. कस्तुरबा गांधी वॉर्डात राहणाऱ्या कार्तिक ढोमणे, भैयालाल सूर्यवंशी आणि देवाजी कोहळे यांच्या घराला दुपारी अचानक आग लागली. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. मात्र, अग्निशामक दलाच्या गाडय़ा घटनास्थळावर उशिरा पोहोचल्या. तिन्ही घरांना लागलेल्या आगीची झळ जवळच्या वसंता शेंडे यांचा घराला पोहोचल्याने त्यांच्या घराचेही काही प्रमाणात नुकसान झाले. आगीत तीनही घरातील र्व साहित्य जळून खाक झाले. विशेष म्हणजे या आगीत ज्या कार्तिक ढोमणे यांच्या घराचे पूर्ण नुकसान झाले. त्यांच्या घरी तीन दिवसानंतर लग्न होणार आहे. या आगीत लग्नाच्या तयारीचे सर्व साहित्यही जळून कोळसा झाले आहे. ढोमणे कुटुंबीय देवपूजेसाठी लाखनी येथे गेले असताना हा प्रकार घडल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण कळू शकले, नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

आयपर महाविद्यालयाचे ‘गेट’ परीक्षेत सुयश
वर्धा, २८ एप्रिल / प्रतिनिधी

‘आयपर’ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘गेट’ परीक्षेत देशपातळीवर गुणवंत ठरतानाच एकूण निकालात उच्चांक स्थापित केला आहे. राष्ट्रीयपातळीवरील अभियांत्रिकी व फोर्मसी विद्याशाखेत ‘गेट’ ही सर्वोच्च परीक्षा समजली जाते. विदर्भ युथ वेलफे अर सोसायटीद्वारा संचालित बोरगावच्या ‘आयपर’ महाविद्यालयाचा विकास अग्रवाल हा ९९.७४ टक्के गुण मिळवून राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ५८ व्या क्रमांकावर झळकला. याच महाविद्यालयाचे राहुल मुठाल, आशिष बाकरे, प्रशांत पटेल, अमित दुधेकर, राहुल ठाकूर, उमेश बिहाडे, पंकजा चीलकर, निलेश ठाकरे, के दार पेंढारकर, अमोल काकडे, आशिष पडोलिया, योगेश विरखडे, पंकज कुंभारे, प्रशांत देशमुख, शितल राऊत, मंदार वाशीमकर, आशिष अळसपुरे, रुचिता निबड्र, अमित साखरकर, अखतल शेख, राकेश ठमके, भगवान गवळी, सचिन शेटे, संतोष चट्टानी, गौरव पांडे, खशान कांबळे, विशाल जिले व संदीप जाधव हे विद्यार्थी चांगले गुण घेऊन झळकले आहे. प्राचार्य डॉ. प्र. गो. येवले व सहकारी प्राध्यापकांनी गुणवंताचे अभिनंदन केले.