Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
विविध

१२ वर्षांपासूनची इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्याचा सीबीआयचा वादग्रस्त निर्णय
क्वात्रोची प्रकरणामुळे राजकीय पारा चढला
नवी दिल्ली, २८ एप्रिल/खास प्रतिनिधी
केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारचा कार्यकाळ संपायला तीन आठवडे उरले असतानाच सीबीआयने बोफोर्स दलाली प्रकरणातील एकमेव हयात संशयित इटालियन व्यावसायिक ओतावियो क्वात्रोचीला ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगारांच्या यादीतून वगळले. क्वात्रोचीविरुद्ध १२ वर्षांंपासून असलेला इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस ऐन लोकसभा निवडणुकांदरम्यान मागे घेण्यात आल्यामुळे आज दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले. सीबीआयच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

श्रीलंका लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत नऊ तामिळी बंडखोर ठार
कोलंबो, २८ एप्रिल/पीटीआय

श्रीलंका लष्कराने एलटीटीईच्या तळांवर धडक देऊन तामिळी बंडखोरांवरील दबाव आणखी वाढविला. यादरम्यान झालेल्या चकमकीत नऊ तामिळी बंडखोर ठार झाले. दरम्यान एलटीटीईचा प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन याचा अद्याप शोध लागलेला नाही. तामिळी बंडखोरांशी शस्त्रसंधी करणार नाही असे श्रीलंका सरकारच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले होते. त्यानंतर आज श्रीलंका लष्कराने एलटीटीई भोवतालचा फास आणखी आवळला.

सगळी व्यवस्थाच कोलमडल्याने पाकला कुणी आर्थिक मदत करू नये-फातिमा भुत्तो
इस्लामाबाद २८ एप्रिल/पीटीआय
माझ्या देशातील सगळी व्यवस्थाच कोलमडली आहे त्यामुळे जागतिक समुदायाने कुठलीही आर्थिक मदत करू नये असे मत पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची पुतणी फातिमा भुत्तो यांनी व्यक्त केले आहे. फातिमा ही तिच्या आगखाऊ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. फातिमा यांनी ‘स्टॉप फंडिंग माय फेलिंग स्टेट’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे की, पाकिस्तानला आतापर्यंत अब्जावधी डॉलरची मदत मिळाली आहे पण तरीही आमचा देश सुरक्षित झालेला नाही. आता आमच्याकडे तालिबान्यांची स्वतंत्र आवृत्ती तयार झाली असून ते व्यापारी मार्ग उडवून देणे, तरुण मुलींना फटके मारणे यासारखी कृत्ये करीत आहेत.

सोनिया अतिरेकी असल्याचा तामिळी समर्थकांचा आरोप
लंडन, २८ एप्रिल/वृत्तसंस्था

काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या अतिरेकी असल्याचा आरोप लंडनमध्ये स्थायिक झालेल्या श्रीलंका तामिळी समर्थकांनी केला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या एलटीटीईने घडवून आणल्याचा आरोप आहे. या हत्येचा बदला घेण्यासाठीच श्रीलंकेतील तामिळींना संपविण्याचा सोनिया गांधी यांचा डाव असल्याचा आरोपही तामिळी समर्थकांनी केला.
लंडनच्या अ‍ॅल्डविच भागातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर शेकडो तामिळींनी सोमवारी निदर्शने केली व त्यांनी केलेल्या दगडफेकीत या कार्यालयाची तावदाने फुटली होती. त्यानंतर एक दिवसाने म्हणजे आज लंडनमधील तामिळी समर्थकांनी सोनिया गांधी यांच्यावर आरोप केले आहेत. श्रीलंकेतील तामिळींना स्वसंरक्षणाचा हक्क आहे असा या मंडळींचा दावा आहे. लंडन येथील हाईड पार्क कॉर्नर येथील श्रीलंका उच्चायुक्त कार्यालयावरही तामिळी समर्थकांनी सोमवारी हल्ला चढविला होता. श्रीलंका तामिळी समर्थकांनी या भागात केलेली निदर्शने बेकायदेशीर होती असे स्कॉडलंड यार्ड पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पाच निदर्शकांना अटक करण्यात आली.