Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
व्यापार - उद्योग

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा ‘टार्गेट रिटर्न फंड’
व्यापार प्रतिनिधी:
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल टार्गेट रिटर्न फंड’ या ओपन एण्डेड तसेच विविध प्रकारच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नव्या फंडाची घोषणा केली आहे. या योजनेतील निधी प्रामुख्याने मुंबई शेअर बाजारातील मोठे बाजारमूल्य असणाऱ्या अव्वल १०० समभागात गुंतवणूक करून गुंतवणूकदाराला लाभ मिळवून देण्यासाठी गुंतविण्यात येणार आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना एक तर संपूर्ण भांडवल वृद्धी किंवा आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाच्या डेट स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. परंतु योजनेच्या नावाप्रमाणे परताव्याबाबत कोणत्याही प्रकारची हमी किंवा आश्वासन ही योजना देत नाही, याची गुंतवणूकदारांनी दखल घ्यावी.

व्यापार संक्षिप्त
एलआयसीची नवीन ‘हेल्थ प्रोटेक्शन प्लस’ युलिप योजना

व्यापार प्रतिनिधी:
अकस्मात येणाऱ्या आजारपणामुळे आखलेले वित्तीय नियोजन बिघडणार नाही, याची हमी देणारी नवीन योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने प्रस्तुत केली आहे. ‘हेल्थ प्रोटेक्शन प्लस’ नावाची ही योजना ‘युलिप’ धाटणीची असून, दीघरेद्देशी गुंतवणूक अधिक आरोग्यविमा असा दुहेरी लाभ ती प्रदान करते. संपूर्ण कुटुंबाला (पती, पत्नी आणि मुले) यांना आजारपणाच्या काळात पॉलिसीधारकाला प्रति दिन रु. २५० ते रु. २५००, तर अन्य कुटुंबियांना प्रति दिन कमाल रु. १५०० इतका रोख लाभ देणारे ‘हॉस्पिटल कॅश बेनिफिट’ त्याचप्रमाणे महत्वाच्या शस्त्रक्रियेत एकरकमी रु. ५०,००० ते रु. ५,००,००० इतका लाभ प्रारंभीच्या वर्षांपासून देणारे ‘मेजर सर्जिकल बेनिफिट’ ही या ‘हेल्थ प्रोटेक्शन प्लस’ पॉलिसीची प्रमुख वैशिष्टय़े आहेत.

मिटकॉनचा ‘आयएपीएस’बरोबर सामंजस्य करार
व्यापार प्रतिनिधी:
फार्मास्युटिकल उद्योग आर्थिक महामंदीपासून अद्याप अबाधित राहिलेला आहे. पेटंट (सुधारित) कायदा २००५ लागू झाल्यापासून भारतामध्ये फार्मास्युटिकल उद्योगाची भरभराट झाली आहे. भारतातील मोठय़ा कंपन्यांबरोबर परदेशी कंपन्यांनी सी. आर. ए. एम. एस. (कंत्राटी संशोधन आणि उत्पादन व्यवसाय) मध्ये भरीव गुंतवणूक केलेली आहे. यामुळेच फार्माउद्योगामद्ये कुशल आणि अति विशिष्ट ज्ञान असणाऱ्या मनुष्यबळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याचाच विचार करून मिटकॉनने आय.ए.पी.एस.बरोबर सामंजस्य करार करून फार्मा उद्योगानिगडीत विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर प्रसंगी मिटकॉनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप बावडेकर म्हणाले की, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, गोवा आणि वापी परिसरातील सुमारे ४५० हून अधिक लघु आणि मध्यम उद्योगांना या प्रशिक्षण कार्यक्रमांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या फायदा होणार आहे. सदर प्रशिक्षण कोर्सेसची आणि उद्योगांना लागणाऱ्या विविध विषयानुरुप करण्यात आली असून सुरुवातीला Regulatory Affairs, GMP आणि मार्केटिंगवर आधारित प्रशिक्षण देण्यात येईल.

अ‍ॅपेक्स होम अप्लायन्सेसकडून ‘मॅरिनेक्स’ची बाजारात प्रस्तुती
व्यापार प्रतिनिधी:
काचेच्या वस्तूंच्या उत्पादन क्षेत्रात ३५० वर्षांपेक्षा अधिक जुना इतिहास असलेल्या सेंट- गोबेन या जागतिक ब्रॅण्डची सहयोगी कंपनी सँटा मरिनचे बेकवेअरचे सुप्रसिद्ध ब्राझीलियन ब्रॅण्ड ‘मॅरिनेक्स’ आता भारतीय बाजारात पदार्पण करीत आहे. मुंबईस्थित गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादन व वितरण क्षेत्रातील अग्रेसर कंपनी अ‍ॅपेक्स होम अप्लायन्सेस विशेष सामंजस्याचा करार त्यासाठी करार करण्यात आला असून, अ‍ॅपेक्सच्या वितरण जाळ्यातून आता मॅरिनेक्स ब्रॅण्डची उत्पादने बाजारात उपलब्ध केली जाणार आहेत. अत्यंत तीव्र तापमानालाही प्रतिबंध करणाऱ्या बोरोसिलिकेट ग्लासपासून मॅरिनेक्सची बेकवेअर उत्पादने तयार केली गेली असून, ती फ्रीजरपासून, ओव्हन ते मायक्रोवेव्ह अशी कुठेही वापरता येतील तशीच ती डिशवॉशरमध्ये धुण्यासही सुलभ असल्याचा कंपनीने दावा केला आहे. सध्या अ‍ॅपेक्सच्या वितरण जाळ्यात ५००० डिलर्सचे जाळे असून, पुढील तीन वर्षांत ही संख्या ५०,००० वर नेली जाईल, असा दावा अ‍ॅपेक्सचे संचालक (विपणन) अर्निश रुपारेल यांनी केला.

‘डी. लाइट’ची घरगुती वापराचे सौर दिवे
व्यापार प्रतिनिधी:
विजेच्या उपलब्धतेची वानवा असलेल्या ग्रामीण भागाला घासलेटच्या दिव्यापेक्षा आठ ते १० पट अधिक प्रकाश देणारे आणि अत्यंत अल्पखर्चिक असा पर्याय सौर ऊर्जेवर आधारीत पर्याय डी. लाइट डिझाइन या कंपनीने उपलब्ध केला आहे. देशाच्या अनेक खेडय़ांपर्यंत मोबाइल फोन पोहचला पण अद्यप वीज पोहचलेली नाही, हे वास्तव लक्षात घेऊन कंपनीने या दिव्यांमध्ये मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी सुविधा दिली आहे. प्रकाशासाठी केरोसीनच्या चिमणी वा बत्तीला पर्याय देणारा अत्यंत सुरक्षित, गुणात्मक व किफायतशीर पर्याय म्हणून डी. लाइटने नोव्हा एस १५० (किंमत रु. १२५०), मोबाइल चार्जिगची सुविधा असलेला नोव्हा एस-२०० (किंमत रु. १६००), नोव्हा ए १७५ (किंमत रु. १०००) अशी एक वर्षांची रिप्लेसमेंट वॉरन्टी असलेली प्रकाशीय उपकरणे बाजारात आणली आहेत. त्याचप्रमाणे जगातील सर्वात स्वस्त दिवा म्हणून केवळ ६०० रु. किमतीचा सोलाटा सोलर लॅम्प प्रस्तुत केला आहे. या दिव्यांसोबत एक सोलर पॅनेल कंपनीकडून दिले जाते, जे दिवसा सूर्यप्रकाशात चार्ज करून दिव्याला जोडल्यास तब्बल सलग ३२ तासांपर्यंत घासलेटच्या दिव्यापेक्षा अधिक प्रखर प्रकाश मिळविता येऊ शकतो, असा कंनपीचा दावा आहे. कंपनीने आपल्या उत्पादनांसाठी महाराष्ट्रात आठ वितरक नेमले असून, फ्युचर समूहातील बिग बझार व अन्य विक्रीकेंद्रे येथे ती उपलब्ध आहेत. अधिक तपशील www.dlightdesign.com या वेबसाइटवरून मिळेल.

अलिबागच्या रॅडिसन रिसॉर्टला प्रतिष्ठेचा ‘एशिया स्पा इंडिया’ पुरस्कार
व्यापार प्रतिनिधी:
अलिबागच्या रॅडिसन रिसॉर्ट अ‍ॅण्ड स्पाला नुकत्याच हॉटेल गुरगांव केम्पेन्स्की, लीला येथे झालेल्या समारंभात दुसऱ्या पेवोनिया एशिया स्पा ‘इंडिया वार्षिक पुरस्कार सोहळा २००९’ मध्ये आपल्या मंदारा सिग्नेचर मसाजकरिता सर्वोत्तम स्पा उपचारपद्धतीचा पुरस्कार मिळाला. एशिया स्पा (इंडिया) पुरस्कार हा स्पा आणि एकूणच चांगल्या सुविधांकरिता दिला जाणारा सर्वाधिक प्रतिष्ठित पुरस्कार आहे. अलिबागच्या रॅडिसन रिसॉर्ट अ‍ॅण्ड स्पा यांचा मंदारा स्पा हा आंतरराष्ट्रीय एम स्पा साखळीचा एक भाग असून या स्पाला सर्वोत्तम नवीन स्पा, सर्वोत्तम रिसॉर्ट स्पा आणि सर्वोत्तम स्पा उपचारपद्धती या तीन श्रेणींमध्ये नामांकन मिळालेले आहे. या तीन श्रेणींमध्ये या स्पाने आपल्या र्सवकष मंदारा सिग्नेचर मसाजकरिता सर्वोत्तम स्पा उपचारपद्धतीचा पुरस्कार पटकावला आहे. प्रख्यात सिनेदिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या पत्नी करुणा धवन यांच्या हस्ते साहील समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विनय फडणीस (रॅडिसन रिसॉर्ट अ‍ॅण्ड स्पा, अलिबाग यांचे प्रवर्तक) आणि महाव्यवस्थापक शलील सुवर्णा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अलिबागच्या रॅडिसन रिसॉर्ट अ‍ॅण्ड स्पामध्ये देण्यात येणारा मंदारा सिग्नेचर मसाज हा येथे येणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट आणि अविस्मरणीय अनुभव असतो. या तंत्रामध्ये जपानी शियास्तु, थाई मसाज, हवाईयन लोमी लोनी, स्वीडिश आणि बालिनीज अशा पाच विविध प्रकारच्या मसाज पद्धतींचा समावेश आहे. मसाज करणाऱ्या थेरपिस्ट्सच्या सौम्य आणि आल्हाददायक हस्तस्पर्शाने शरीरातील नसांनसांत चैतन्य येऊन शरीरातील स्नायूंना ऊर्जा मिळून ते मोकळे होतात आणि याद्वारे शरीरात आरोग्यदायी, नवीन त्वचेच्या पेशी निर्माण होऊन संपूर्ण त्वचा जणू कात टाकल्यागत होऊन जाते.

सेंट्रल बँकेचा वार्षिक नफा ५७१ कोटींवर
व्यापार प्रतिनिधी:
सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ३१ मार्च २००९ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत एकंदर ५७१.२४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. आधीच्या आर्थिक वर्षांतील रु. ५५०.१६ कोटींच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत यंदा त्यात ३.८ टक्क्यांची किंचित वाढ झाली आहे. तर आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा प्रत्यक्षात मागील रु. १२७.२० कोटींच्या तुलनेत तब्बल ५१ टक्क्यांनी घटून रु. ६२.५१ कोटी झाला आहे. आर्थिक वर्षांत बँकेचा एकंदर व्यवसाय रु. १,८४,६०७ कोटींवरून ३१ मार्च २००९ अखेर रु. २,१८०१२ कोटीपर्यंत वाढला (१८.१ टक्के वाढ) आहे. चौथ्या तिमाहीत एकंदर उत्पन्न २१ टक्क्यांनी वाढले म्हणजे रु. २,५९८ कोटींवरून रु. ३,१५० कोटी रु. झाले, अशी माहिती सेंट्रल बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. श्रीधर यांनी दिली. मात्र याच तिमाहीत एनपीएसाठी तरतूद तब्बल १३२ टक्क्यांनी वाढली, म्हणजे मागील वर्षांच्या याच तिमाहीतील १३२ कोटी रुपयांवरून रु. २६८ कोटींवर गेली. तसेच एकंदर तरतूदही १८३ कोटी रुपयांवरून ३४७ कोटी रुपयांवर गेल्याने चौथ्या तिमाहीतील निव्वळ नफा घटल्याचे दिसत असल्याचे श्रीधर यांनी स्पष्ट केले. बँकेच्या संचालक मंडळाने भागधारकांना २० टक्के अंतिम लाभांश (प्रति समभाग दोन रुपये) देण्याची शिफारस केली आहे.

आदित्य बिर्ला नुवोच्या तिमाही तोटय़ात वाढ
व्यापार प्रतिनिधी:
विविधांगी व्यावसायिक स्वारस्य असलेल्या आदित्य बिर्ला नुवो लिमिटेडने आधीच्या वर्षांच्या तुलनेत ३१ मार्च २००९ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत एकंदर तोटय़ात भरीव वाढ दर्शविली आहे. आयुर्विमा व्यवसायात नव्याने पदार्पणाचा ताण आणि बीपीओ व गार्मेन्टसारख्या नव्या व्यवसायातील वाढलेल्या तोटय़ाचा विपरीत परिणाम कंपनीच्या एकत्रित कामगिरीवर झाला असल्याचे कंपनीने स्पष्टीकरण केले आहे. मात्र एकल स्तरावर कंपनीने सरलेल्या आर्थिक तिमाहीत नफ्यात वाढ नोंदविली आहे. एकत्रित स्तरावर कंपनीने तब्बल १४१.१५ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे, जो आधीच्या वर्षांतील याच तिमाहीत रु. २१.८४ कोटींच्या तोटय़ाच्या तुलनेत खूपच वाढला आहे. याच तिमाहीतील कंपनीचे एकत्रित महसुली उत्पन्न मात्र ११ टक्क्यांनी वाढून रु. ४,०९६.९१ कोटींवर गेलेआहे.