Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा ‘टार्गेट रिटर्न फंड’
व्यापार प्रतिनिधी:
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल टार्गेट रिटर्न फंड’ या ओपन एण्डेड तसेच विविध प्रकारच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नव्या फंडाची घोषणा केली आहे. या योजनेतील निधी प्रामुख्याने मुंबई शेअर बाजारातील मोठे बाजारमूल्य असणाऱ्या अव्वल १०० समभागात गुंतवणूक करून गुंतवणूकदाराला लाभ मिळवून देण्यासाठी गुंतविण्यात

 

येणार आहे.
या योजनेत गुंतवणूकदारांना एक तर संपूर्ण भांडवल वृद्धी किंवा आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाच्या डेट स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. परंतु योजनेच्या नावाप्रमाणे परताव्याबाबत कोणत्याही प्रकारची हमी किंवा आश्वासन ही योजना देत नाही, याची गुंतवणूकदारांनी दखल घ्यावी.
गुंतवणूकदाराच्या जोखीम क्षमतेनुसार पूर्वनियोजित गुंतवणूक युक्त्यांचे आयोजन केले जाते. गुंतवणूकदारांनी आधीच निवडलेल्या ध्येयानुसार जेव्हा युनिट्सच्या नक्त मालमत्ता मूल्यात वृद्धी प्राप्त केली जाते तेव्हा ती वृद्धी गुंतवणूकदाराकडून निवड झालेल्या डेट फंडमध्ये हस्तांतरित केली जाते. ज्यायोगे लाभवृद्धीची शक्यता वाढते व जोखीम घटते.
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक निमेश शाह यानिमित्त म्हणाले, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलमध्ये आम्ही गुंतवणूकदारांच्या पोटफोलिओ मूल्यांत वाढ करणारीच गुंतवणूक व वैशिष्टय़े गुंतवणूकदारांना देण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. शेअरबाजारातील गुंतवणुकीचा अनुभव आणि आमचे अंतर्गत विश्लेषण यातून स्वीकारल्या गेलेल्या या धोरणामुळे गुंतवणूकदारांना अपेक्षित लाभ मिळवून देणारी गुंतवणूक होऊ शकते.
याच फंडात गुंतवणूक का?
बाजारातील सर्व प्रकारच्या परिस्थितीत पद्धतशीर गुंतवणूक करण्यासाठी हा फंड सुयोग्य आहे. या फंडात गुंतवणूकदाराला तेजीच्या काळातील अधाशी लाभ टाळता येतो. त्यामुळे शेअरबाजारातील अंगभूत चढउतारांत मिळालेला लाभ गमावण्याची जोखीम कमी होते.