Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
अग्रलेख

तिसरा कोन !

 

भारतीय राजकारणात तिसऱ्या कोनाला नेहमीच महत्त्व लाभले आहे. या जागेवर नेहमीच पक्ष बदलते राहिले आहेत. पंधराव्या लोकसभेसाठी आज (गुरुवारी) होणाऱ्या मतदानातही हा तिसरा कोन उरलेल्या दोघांची मनोराज्ये उद्ध्वस्त तर करणार नाही ना, अशी शंका आहे. आजच्या मतदानात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि कर्नाटक या राज्यांचा प्रामुख्याने सहभाग असेल. मुंबई आणि ठाण्यासह महामुंबईच्या दहा जागांसाठीही आजच मतदान होत आहे. पहिल्या दोन फेऱ्या पार पडल्यानंतरची महाराष्ट्रातली ही तिसरी आणि अखेरची फेरी असली तरी इतर अनेक राज्यांमध्ये १३ मेपर्यंत मतदानाच्या अजूनही दोन फेऱ्या पार पडायच्या आहेत. मात्र या तिसऱ्या फेरीबरोबर लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन तृतीयांशहून अधिक जागांसाठी निवडणुका पार पडलेल्या असतील. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जरी आघाडी केली असली तरी राष्ट्रवादीने आपले सर्व पत्ते कधीच उघड केलेले नाहीत. पुण्यासारख्या मतदारसंघात तर राष्ट्रवादीचे काही नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या भगव्या टोप्या वापरून खुलेआम गर्दीत तोंड लपवताना दिसत होते. राष्ट्रीय पक्षाध्यक्षांच्या जिल्ह्य़ात ही अवस्था, तर इतरत्र ती काय असेल, ते सांगता येणे अवघड आहे. अतिविश्वास आणि विश्वासघात यातल्या सीमारेषा पुसट झाल्या की काय होते, ते अर्थातच निकालामध्ये स्पष्ट होईल. अशा तऱ्हेच्या राजकारणाने यंदा भारतीय लोकशाहीचा चेहरामोहराच बदलून टाकायचे निश्चयपूर्वक ठरवून टाकले असावे. महाराष्ट्राप्रमाणे इतरत्रही पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती. आज ती तेवढीच राहील, असे दिसते. कडक उन्हाळा आणि आपण ज्यांना यापूर्वी निवडून दिले, त्यांनी केलेला भ्रमनिरास या दोन गोष्टी घसरलेल्या आकडेवारीला कारणीभूत आहेतच, पण इतर असंख्य कारणांमध्ये भारतीय राजकारणाचा विटलेला पोत हेही एक आहे. उन्हाळ्यात निवडणुका यापूर्वीही पार पडलेल्या असल्या तरी पराभूतांना तेवढाच एक आधार निकालानंतर मिळू शकेल. निवडणुकांच्या काळात मोठमोठी आश्वासने द्यायची आणि ती पार पडताच मतदारांना तोंडही न दाखवता स्वहिताचे राजकारण करत राहायचे, ही बहुतेकांची खेळी मतदारांनी झिडकारली आहे, हे त्यातले वास्तव आहे. आजच्या लढतींमध्ये उत्तर प्रदेशातले जरी पंधरा मतदारसंघ असले तरी या खेपेला उत्तर प्रदेशाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती काय करतात, याविषयी देशभर चर्चा आहे. त्रिकोणाचा हा तिसरा कोन त्यामुळे सर्वात महत्त्वाची जागा बळकावून बसला आहे. उत्तर प्रदेशात आज रायबरेलीतून सोनिया गांधी, कानपूरमधून श्रीप्रकाश जयस्वाल, लखनौतून भाजपचे लालजी टंडन यांचे भवितव्य ठरणार आहे. लखनौत अटलबिहारी वाजपेयी उभे नाहीत, पण तिथे समाजवादी पक्षातर्फे संजय दत्तला उभे करायचे होते. मतदारांचे सुदैव की हा ‘मुन्नाभाई’ निवडणूक लढवायलाच अपात्र ठरला. गुजरातमध्ये गांधीनगरमधून पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची मते मान्य करण्याचा प्रश्नच नाही, पण तरीही त्यांचा ब्याऐंशी वर्षे वयातला उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. निवडणूक अंगात संचारते ती कशी, हे त्यांच्याकडे पाहून लक्षात येते. देशातल्या या तिसऱ्या फेरीत गुजरातेत सर्वच्या सर्व म्हणजे २६ जागांवर आज मतदान होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी होणारी चर्चा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडूनच केली जात असल्याने अडवाणींची पंचाईत होत असली तरी या प्रश्नावर त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही उद्या पंतप्रधान बनू शकतात, असा निर्वाळा देऊन मोदींनाही उद्या पर्याय उभा राहू शकतो, याचे सूतोवाच केले आहे. मध्य प्रदेशात आज होणाऱ्या १६ जागांच्या लढतीही अतिशय चुरशीच्या ठरणार आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेस, भाजप आणि बहुजन समाज पक्ष या तिघांमध्येच प्रामुख्याने संघर्ष आहे. मध्य प्रदेशात गुणा हा मतदार संघ सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. माधवराव शिंदे यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य हे या मतदार संघातून लढत आहेत. माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर २००१ मध्ये राजकारणात उतरलेले ज्योतिरादित्य पराभूत व्हावेत, यासाठी शिवराजसिंह चौहान यांनी या एकाच मतदार संघाचा सात वेळा प्रचार दौरा केला. या लोकसभा मतदार संघातल्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहांमध्ये भाजप उमेदवारांचा विजय यापूर्वी झालेला असल्याने त्यांना ही आशा वाटत असायची शक्यता आहे. मध्य प्रदेशात अनेकांची राजकीय गणिते उलटीपालटी होऊ शकतात, कारण उत्तर प्रदेशप्रमाणे तिथेही बहुजन समाज पक्ष सर्व ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात आहे. गुणाप्रमाणेच इंदूर, उज्जन, देवास, दामोह, खरगोण, ग्वाल्हेर आदी मतदारसंघांमध्ये लढणाऱ्या उमेदवारांचेही भवितव्य आजच निश्चित व्हायचे आहे. बिहारमध्ये ११ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे, त्यापैकी दहा तर नक्षलवादग्रस्त म्हणून परिचित आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत या राज्याच्या ज्या भागात, तसेच झारखंडमध्ये असणाऱ्या मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांनी हल्ले करून मतदान उधळून लावायचा प्रयत्न केला, तिथे फेरमतदानात मात्र ६० टक्क्य़ांवर मतदारांनी भाग घेऊन नक्षलवाद्यांच्या मनसुब्यावरच पाणी ओतले आहे. आज होणाऱ्या मतदानात आधीच्या फेऱ्यांप्रमाणे हिंसाचार होऊ शकतो, म्हणून तिथे आधीपासूनच काळजी घेण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार हे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असले तरी निवडणुकीनंतरच्या समीकरणात ते कुठे असतील, असा प्रश्न आतापासूनच विचारण्यात येत आहे. या राज्यात पुढल्या वर्षी विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत. नीतिशकुमारांचे विरोधक आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव हे काँग्रेसविषयी आता वेगळी भाषा वापरू लागल्यानेच नीतिशकुमार बदलतील, असे भाकित केले जात आहे, असे नाही. भाजपच्या धर्माध भूमिकेपासून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठीही नीतिशकुमारांना निमित्त हवे आहे, हेही त्यांच्याविषयीच्या शंकेचे एक कारण आहे. बिहारइतकेच लक्ष पश्चिम बंगालनेही वेधून घेतले आहे. तिथेही लोकसभेच्या दहा मतदारसंघात लढत होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या डाव्या आघाडीचे वर्चस्व असले तरी तिथे काही लढती लक्षवेधक ठरतील. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रितरीत्या डाव्या आघाडीशी दोन हात करत आहेत. डाव्या पक्षांच्या, विशेषत: मार्क्‍सवाद्यांच्या शिस्तबद्ध यंत्रणेने नेहमीप्रमाणेच आक्रमक प्रचार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये होणारी ही पहिलीच फेरी आहे. आपल्याविरुद्ध रिंगणात कुणीही असले तरी प्रचारात गलथानपणा येऊ द्यायचा नाही, हा नियम त्या पक्षाने नेहमीच पाळला आहे. या खेपेला सिंगूरमधला टाटांचा ‘नॅनो’ प्रकल्प ममता बॅनर्जीच्या दुराग्रहामुळे गुजरातेत गेल्याने मार्क्‍सवाद्यांना ममताविरोधात आयतेच साधन मिळाले होते. ममता बॅनर्जीबरोबर राहून काँग्रेसची निदान या प्रश्नापुरती का होईना चांगलीच कोंडी झाली आहे. निवडणुकीनंतर त्या कुठे जातील ते सांगता येणे अवघड आहे. कर्नाटकातही अकरा जागांसाठी आज मतदान होत आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचेही भवितव्य आजच ठरणार आहे. त्यांचा पक्ष हा कर्नाटकातल्या ‘तिसऱ्यां’सह तिसरा आहे. हसन मतदारसंघाला त्यांच्या लढतीमुळे अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. देवेगौडा हे मतदारांमध्ये पैसे वाटत असल्याचे चित्रीकरण असलेली सीडी निवडणूक आयोगाकडे देण्यात आल्याने या लढतीत नेमके काय होणार याविषयी उत्कंठा लागून राहिली होती. काहीही असले, तरी या सर्व संघर्षांचे चित्र मतदारांच्या उत्साहावर आणि अर्थातच निरुत्साहावर अवलंबून आहे. कर्नाटकच्या राजकारणात वक्कलिग आणि लिंगायत यांच्या वरचष्म्याविषयी नेहमीच चर्चा होत असते. म्हणजे तिथेही जातीपातीच्या संसर्गाची लागण आहेच. आजच्या लढतींपैकी बऱ्याच मतदारसंघांत वर्षांनुवर्षे अनेक प्रश्न कुचंबत पडले आहेत. मूलभूत सोयीसुविधांच्या नावाने बऱ्याच ठिकाणी शिमगा आहे. पाण्याचे, स्वच्छतेचे, आरोग्याचे, असे अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे होते तिथेच आहेत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण पूर्वीच झाले आहे, पण आता त्याकडे पदसिद्ध अधिकाराच्या रूपाने पाहिले जात आहे, ते अधिक धोकादायक आहे. जनता सहनशील आहे, म्हणूनच नेत्यांचा आजवरचा विकास नेमका कोणत्या अंगाने झाला, ते विचारले गेले नाही. आताही जर या चित्रात काही बदल होणार नसेल, तर मात्र हा प्रश्न जागोजाग विचारला जाईल, अशी शक्यता आहे. स्वार्थापलीकडचा हा तिसरा कोनही म्हणूनच तितका महत्त्वाचा आहे.