Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

मुंबईचा विकास आणि लेणी!
पोर्तुगीज येथे येण्यापूर्वी मुंबई अस्तित्वात नव्हती, असा एक समज मुंबईशी संबंधित विद्वानांमध्ये अनेक वर्षे रूढ होता. त्याला महत्त्वाचा तडा दिला तो महिकावतीच्या बखरीबाबत झालेल्या संशोधनाने. तोपर्यंत ही बखर म्हणजे एक थोतांडच आहे, असे म्हटले जात असे. त्यामुळे कोणत्याही ऐतिहासिक दुव्यासाठी त्याचा वापर केला जावू शकत नाही, असे समजले जात होते. या महिकावतीच्या बखरीवर पहिल्यांदा प्रकाशझोत टाकला तो इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी. त्यानंतर रा. चिं. ढेरे आणि प्रिन्सिपल सी. बी. जोशी. यांनी त्यावर अधिक संशोधन केले. प्रि. जोशी यांनी तर हिस्टॉरिकल जिओग्राफी ऑफ मुंबई असा लेखच त्यांनी लिहिला. या बखरीतील अनेक गावे राजवाडय़ांनी प्रत्यक्ष शोधून काढली होती. त्यानंतर त्याचे मॅपिंग करण्याचा प्रयत्न झाला. अलीकडच्या काळात प्रा. बी. अरुणाचलम यांनी अशाच प्रकारचा प्रयत्न केला. मात्र आजवर कोणत्याही प्रशिक्षित पुरातत्व संशोधकाने किंवा इतिहासकाराने महिकावतीच्या बखरीचा पाठपुरावा केलेला दिसत नाही. अशा प्रकारचे काम झाल्यास त्याची ऐतिहासिकताही सिद्ध होवू शकेल. पोर्तुगीज येण्यापूर्वीपासूनही मुंबई होती, अगदी सातवाहनांच्या काळापासून म्हणजेच दोन हजार वर्षांंपासून याचे पुरावे आपल्याकडे सापडलेले आहे. कान्हेरी, जोगेश्वरी आणि महाकाली या सर्व लेण्यांचा इतिहास हा मुंबईशी आणि मुंबईच्या विकासाशी जोडलेला आहे. आणि म्हणूनच तो समजून घेताना किंवा त्याच्याशी संबंधित प्रश्न समजून घेताना आपल्याला मुंबईचा उदय आणि येथील ऐतिहासिकता समजून घ्यावीच लागते. मुंबईच्या संदर्भातील पहिला पुरावा सापडला तो कांदिवलीमध्ये. तिथे अश्मयुगीन हत्यारे सापडली. इसवीसन पूर्व पाचव्या शतकापासून साष्टीबेटांवर माणसाचा वावर होता, याचा ही दगडी हत्यारे हा महत्त्वाचा पुरावा आहे. खंबातच्या आखातामध्ये, त्याचप्रमाणे सिंधू खोऱ्यामध्ये सापडलेल्या दगडी हत्यारांमध्ये व या कांदिवलीच्या दगडी हत्यारांच्या शैलीत साम्य आहे. त्यामुळे त्याही काळी सिंध आणि खंबातशी या ठिकाणाचा असलेला संबंध स्पष्ट होतो. हा संबंध प्रामुख्याने व्यापारी बाबींशी संबंधित होता. कोकण किनारपट्टीवर २१ ठिकाणी अशाप्रकारचे पुरावे सापडल्याचा संदर्भ आपल्याला पुरातत्व तज्ज्ञ डॉ. सूरज पंडित देतात. हे त्या काळातील एक प्रकारचे स्थलांतरणच होते. नंतर हळूहळू मुंबईच्या नागरिकरणास सुरुवातही झाली त्याचे पहिले केंद्र होते सोपारा. सारेजण उत्तरेकडून यायचे. सागवानी लाकूड, हस्तीदंत, चंदन, शिंपले या गोष्टी इथून निर्यात केल्या जायच्या. उज्जन, मथुरा, सिंध या दिशेने पुढे सारा प्रवास सुरू व्हायचा..

स्पर्धक मांडणार लग्नाचा प्रस्ताव
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरून दर गुरुवार ते शनिवारी रात्री १० वाजता प्रक्षेपीत करण्यात येणाऱ्या ‘जोडी जमली रे’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये गुरुवारच्या भागात प्रथमच स्पर्धक आपल्या जोडीदाराला लग्नाची मागणी घालणार आहेत. तसेच आपल्या प्रत्येक जोडीतील स्पर्धक आपल्या जोडीदाराबद्दलचे आपले मत व्यक्त करणार आहेत. अभिनव पद्धतीने लग्न करण्यासाठी ‘जोडी जमली रे’मध्ये गुरुवारच्या भागात स्पर्धक लग्नासाठी खोटाखोटा प्रस्ताव मांडतील. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रस्ताव मांडणार असून यातील एक मुलगी ज्या पद्धतीने प्रस्ताव मांडणार आहे ती पद्धत सूत्रसंचालक कविता मेढेकरला खूप भावली आहे. तसेच या भागात ‘आधुनिकता’ या विषयावर सर्व स्पर्धक आणि त्यांचे पालक आपापले मत मांडून सविस्तर चर्चा करणार आहेत. सूत्रधार अतुल परचुरे व कविता मेढेकर यांच्या संयत सूत्रसंचालनामुळे ‘जोडी जमली रे’चा गुरुवारचा भाग रंगणार आहे. मागच्या आठवडय़ात ‘जोडी जमली रे’मध्ये सेलिब्रिटी जोडी म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या अरुण नलावडे-अंजली नलावडे या दाम्पत्याने स्पर्धकांना विवाहामुळे उभयतांमध्ये निर्माण होणारे नाते कसे जपायचे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना अरुण नलावडे म्हणाले की, आमच्या कन्येला सांभाळण्याचे, तिच्यावर चांगले संस्कार करण्याचे काम माझी पत्नी अंजलीनेच १०० टक्के केले. पण मला माझ्या कन्येच्या बारशाला उपस्थित राहता आले नाही, अशी खंत अरुण नलावडे यांनी व्यक्त केली, तेव्हा स्पर्धक, पालक, सूत्रसंचालक हेलावून गेले. प्रत्येक स्पर्धकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे काही बाबतीत आपण प्रत्येकजण अजिबात तडजोड करू इच्छित नाही. कारण तडजोड करण्यासारखा तो मुद्दाच नसतो, पण म्हणून प्रत्येक गोष्टीत आडमुठेपणा करू नये. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीनुसार प्रत्येकानेच थोडीफार तडजोड करणे आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला अंजली नलावडे यांनी स्पर्धकांना दिला आणि स्पर्धक जोडय़ांनाही तो मनापासून पटला. मी माझ्या मुलीचा जोडीदार निवडताना जो सल्ला दिला असता तोच आजच्या स्पर्धकांना देत आहे, असेही अंजली नलावडे यांनी सांगितले. त्यामुळे ‘जोडी जमली रे’चा शनिवारीचा एपिसोड चांगलाच रंगला.
प्रतिनिधी