Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

मनसेची सुप्त लाट चमत्कार घडविणार?
संदीप आचार्य
मुंबई, २९ एप्रिल

लक्षावधी मराठी बेरोजगारांच्या नोकऱ्यांचा प्रश्न, पोलिसांच्या घरांच्या समस्या, महाराष्ट्राची अस्मिता आणि मुंबईत परप्रांतीयांकडून दाखविण्यात येणारी ताकद असे अनेक मुद्दे घेऊन महाराष्ट्रभर तुफान निर्माण करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आपल्या आक्रमक भाषणांनी निर्माण केलेला झंझावात व त्यांच्या सभांना लाभलेला सर्व वयोगटांतील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता मुंबई - ठाण्यासह राज्यात मनसेची एक सुप्त लाट आल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. मनसेची हीच लाट काही जागांवर चमत्कारही घडवू शकेल, अशी शक्यता राज्य गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांपासून ते अनेक मान्यवर ज्योतिषांनी वर्तवली आहे.

काँग्रेसची कसोटी!
डावखरे, कामत, राम नाईक, रावले यांचे भवितव्य ठरणार
मुंबई, २९ एप्रिल / खास प्रतिनिधी
मुंबई आणि ठाण्यात गेल्या वेळी सहा जागाजिंकलेल्या काँग्रेसपुढे या वेळी वर्चस्व कायम राखण्याचे उद्या होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीत आव्हान आहे. गुरुदास कामत, वसंत डावखरे, किरीट सोमय्या, राम नाईक, मोहन रावले या मातब्बरांसह एकूण १९६ उमेदवारांचे भवितव्य ही निवडणूक ठरवणार आहे. शेवटच्या टप्प्यात दहा मतदारसंघात मतदान होत आहे. उद्याच्या निवडणुकीसाठी १५,८७२ मतदान केंद्रे असून, एक कोटी, ५९ लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. मुंबई व ठाण्यात गेल्या निवडणुकीच्या वेळी आठ मतदारसंघ होते. पुनर्रचनेनंतर ठाण्यात दोन मतदारसंघ वाढले आहेत. गेल्या वेळी आठपैकी मुंबईतील पाच आणि डहाणू अशा सहा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले होते.

काँग्रेस किंवा भाजपची आघाडी पुढील सरकारचे नेतृत्व करेल-अडवाणी
उलुबेरिया, २९ एप्रिल/पी.टी.आय.

तिसरी आघाडी जर सत्तेवर येईल असा विश्वास दोनही साम्यवादी पक्षांना वाटत असेल तर ते चूक असून तसा विश्वास कधीही बाळगणे योग्य होणार नाही, असे मत भाजपप्रणित रालोआचे नेते व पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी येथील एका प्रचार सभेत व्यक्त केले. जेव्हा भावी सरकार स्थापन होईल तेव्हा त्याचे नेतृत्व एकतर भाजपआघाडी किंवा काँग्रेसप्रणित यूपीए करेल, असेही ते म्हणाले. जेथे लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील ७ मे रोजी मतदान होणार आहे तेथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

काँग्रेसमधील बंडखोरीमुळे पत राखण्याची भाजपला संधी
राजस्थान

येत्या ७ मे रोजी मतदानाला सामोरे जाणाऱ्या राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की गहलोत यांच्या नेतृत्वाचा प्रभाव राज्यातील लोकसभेच्या २५ जागांवर दिसणार आहे, तर वसुंधराराजेंचा प्रभाव पुत्र दुष्यंतच्या विजयापुरताच मर्यादित होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये यंदा कोणाचे पारडे जड आहे याचा अंदाज यावरून येत असला तरी पक्षांतर्गत बंडखोरीमुळे या बदललेल्या परिस्थितीचा काँग्रेस फायदा घेण्याची शक्यता वाटत नाही.

बारामुल्लातील निवडणूक काश्मीरच्या राजकारणाला कलाटणी देणार?
जम्मू आणि काश्मीर

यंदा जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकांमध्ये बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात काय घडणार याची सर्वांना उत्सुकता आहे. आझाद काश्मीरसाठी लढणाऱ्या फुटीरवादी गटापासून फारकत घेत पीपल्स कॉन्फरन्सचे दिवंगत अध्यक्ष अब्दुल गनी लोन यांचे पुत्र, ४२ वर्षीय सज्जाद लोन यांनी निवडणूक िरगणात झेप घेतली आहे. काश्मीर खोऱ्यातील स्थैर्यासाठी सज्जाद यांचा निर्णय सकारात्मक ठरणार आहे. सज्जाद लोन पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवारांमुळे तिरंगी लढतीत अडकले आहेत. काश्मीरमधील फुटीरवादी गटांचा रोष संपविण्यासाठी सज्जाद लोन यांचा विजय उपयुक्त ठरणार आहे.

कारवाईचा इशारा देताच शिवसेनेची पत्रकार परिषद रद्द
ठाणे, २९ एप्रिल/प्रतिनिधी

निवडणूक प्रचाराची समाप्ती झाल्यानंतरही आयोजित केलेली पत्रकार परिषद पोलिसांनी कारवाईचा इशारा देताच शिवसेनेला ऐनवेळी रद्द करावी लागली. सोमवारी सायंकाळी प्रचाराची रणधुमाळीसंपल्याानंतर राजकीय पक्षांना पत्रकार परिषद घेण्यास यापूर्वीच मनाई करण्यात आली आहे. मात्र एका संघटनेच्या पाठिंब्याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी शिवसेनेने आज तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हजर झाले, पण शिवसेनेची नेतेमंडळी हजर नव्हती. साहेब येताहेत, असे सांगण्यात आल्यावर सुमारे अर्धा तास पत्रकार वाट पाहत होते. मात्र प्रचाराची मुदत संपल्याने पत्रकार परिषद घेतल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा निवडणूक आयोग आणि पोलिसांनी देताच ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती सेनेच्या एका नेत्याने दिली.