Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
लोकमानस

आजार मानसिक की शारीरिक?

 

१८ एप्रिलच्या ‘त्रिकालवेध’मधील लेखावर आलेली अवधूत परळकर यांची प्रतिक्रिया वाचून सखेद आश्चर्य वाटले. त्यांनी डॉ. बापट यांची ‘स्वास्थ्य वेध’ आणि ‘वॉर्ड नं. पाच केईएम’ ही किंवा यासारखी पुस्तके ‘मेंदू’ म्हणजे ‘मन’ शाबूत ठेवून वाचली असतील तर या प्रकारची टीका त्यांनी केली नसती.
कुमार केतकर यांनी त्यांच्या लेखातील ‘बरेचसे शारीरिक आजार खरे तर मानसिक असतात, असे मानसशास्त्रज्ञ मानू लागले’ या वाक्यात ‘शरीरविज्ञानशास्त्रज्ञ’ व डॉक्टर हा शब्दही वापरायला हवा होता. कारण तसे मत असंख्य डॉक्टरांचे आहे. विशेषत: जे डॉक्टर अजूनही क्लिनिकल तपासणी आणि लक्षणे पाहून आजाराचं निदान करतात, त्यांच्या मते ६० टक्के रुग्णांचे शारीरिक वाटणारे आजार हे मानसिक असतात.
सध्या मात्र व्यापारीकरणाच्या जमान्यात क्लिनिकल आणि सिम्प्टमॅटिक तपासण्यांच्या भानगडीत न पडता आपल्यावर कसलंही बालंट यायला नको, म्हणून रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशल, सुपर स्पेशल चाचण्या लावून मग निदान करणाऱ्या डॉक्टरांची संख्या वेगानं वाढते आहे. (यालाच अलीकडे ‘डिफेन्सिव्ह मेडिसिन’ म्हटलं जातं.) त्यामुळे रुग्णांनाही अशा प्रकारच्या चाचण्या करून घेतल्याशिवाय चैन पडेनासे झाले आहे.
एक्स-रेपासून एमआरआयपर्यंतच्या सर्व प्रकारच्या किरणोत्सर्गी व रक्त, मलमूत्राच्या अनंत प्रकारच्या चाचण्या केल्यानंतरही आजाराचे कारण न सापडल्यामुळे निराश झालेले अनेक रुग्ण बहुतेकदा मानसिकदृष्टय़ा किंवा सायकोसोमॅटिक असल्याचे सिद्ध होते. अगदी खेडय़ातल्या लोकांनासुद्धा आजार बरा होण्यासाठी नुसता सल्ला देणाऱ्या डागदरपेक्षा सुई टोचणारा डागदर बरा वाटतो. बऱ्याच वेळा आपला नेहमीचा डॉक्टर बाहेरगावी गेला असेल तर तो येईपर्यंत रुग्ण आपला ‘आजार’ तसाच बाळगून राहतो. हे कशाचे लक्षण आहे? याबाबतीत अनुभवी डॉक्टरांशी बोलल्यावर सहज कळते की तो आजार शारीरिक नसून मानसिक असतो!
या शारीरिक/ मानसिक आजाराबाबतचा एक घडलेला किस्सा सांगितल्याशिवाय राहवत नाही. आमच्या नाटकाच्या दौऱ्यात आमच्या निवासापासून नाटय़गृहाकडे जायचा शॉर्टकट रस्ता एका तारेच्या कुंपणाखालून होता. थोडा अंधार होता तरी आम्ही बाकी सगळे सुखरूप पार झालो. पण एका अभिनेत्रीच्या केसात तार अडकली. त्याबरोबर त्या बाई कमालीच्या घाबऱ्या झाल्या. आपल्याला काहीतरी भयंकर होणार या कल्पनेने त्या कासावीस झाल्या. आमच्याबरोबर एक डॉक्टर नट होते. त्यांनी बाईंना, काही झालेले नाही; घाबरायचं काहीच कारण नाही; असे समजावयाचा खूप प्रयत्न केला. तरी बाईंची कासाविशी कमी होईना. तेव्हा डॉक्टरांनी बाईंच्या नकळत साध्या अ‍ॅनासीनची अर्धी गोळी दिली आणि दहा मिनिटे पडून राहायला सांगितले. बाई पाच मिनिटांच्या आत टुणटुणीत झाल्या! असा असतो मानसिक असणारा शारीरिक आजार.
श्रीकांत लागू, दादर, मुंबई

प्रेमळ गुरुवर्य, व्यासंगी पत्रकार डॉ. सुधाकर पवार
ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुधाकर पवार यांच्यावरील ‘व्यक्तिवेध’(२१ एप्रिल) वाचला. त्याबरोबर सरांविषयीच्या जुन्या आठवणी उचंबळून आल्या. सरांचा माझा परिचय १९६९ मध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात झाला. त्या वेळी ते ‘शिवांजली’ अंकाचे काम पाहत असत. ‘शिवांजली’साठी मी एक लेख लिहिला होता. त्या वेळी लेखाची मांडणी कशी करावी, याबद्दल मला न दुखवता मृदू भाषेत त्यांनी जे मार्गदर्शन केले, ते पुढेही उपयोगी पडले. लेख प्रसिद्ध झाल्यावर सरांनी अभिनंदनपर पत्र पाठविले, ते आजही प्रमाणपत्रासारखे जपून ठेवले आहे. १९७१-७२ मध्ये मी सरांचा वृत्तपत्रविद्येचा विद्यार्थी झालो.
या काळातील भयंकर दुष्काळामुळे आम्ही विद्यार्थी होरपळून निघालो होतो. पवार सरांनी मला चांगला आधार दिला. सर त्या वेळी ह. कि. तोडमल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करीत होते. त्यांचा लेखनिक म्हणून काम करताना सरांची अभ्यासाची चिकाटी, संशोधक वृत्ती, मजकुराची मांडणी यातून शिकण्यासारखे बरेच मिळाले. सर अधूनमधून १५-२० रुपये द्यायचे. कधी चांगला सिनेमा, नाटक पाहायला घेऊन जायचे. एखाद्या विषयावर लेख लिहायला सांगायचे. ‘डोन्ट वेट फॉर इन्स्पिरेशन’ असे म्हणायचे.
पत्रकारांना अनेक विषयांवर व तातडीने लिहावे लागते. त्यामुळे पत्रकारांचे वाचन चौफेर असावे, असा त्यांचा आग्रह असे. त्यांच्या संग्रहात पुष्कळ पुस्तके असत. कोणत्याही ग्रंथालयात जाऊन नेमके हवे ते पुस्तक शोधण्याचे तंत्र त्यांना अवगत होते. आम्हाला ते संदर्भग्रंथांची माहिती देत.
शुद्धलेखनाच्या बाबतीत त्यांची तडजोड नसायची. शब्दांची व्युत्पत्ती सांगून ते तसेच लिहिण्याबद्दल त्यांचा आग्रह असे. ते विद्यापीठाच्या छापखान्यातील मुद्रितशोधन, कार्यक्रमांचे वृत्तसंकलन या कामांबरोबरच लेख व अग्रलेख लिहिण्याचे काम प्रभावीपणे करीत. ते ओजस्वी शैलीत लिहायचे. बातमीचा आशय अल्पशिक्षितांनाही उमगला पाहिजे, अशी त्यांची मांडणी असे. नाशिकच्या ‘गावकरी’त त्यांनी सुरुवातीला काम केले आणि एम.ए., बी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पवार सरांनी संपादन, समीक्षा याशिवाय वृत्तपत्र विद्येवरही विपुल ग्रंथलेखन केले.
सर्वच विद्यार्थी त्यांचे आवडते होते. त्यांच्या घरी प्रत्येकाचे अगत्याने स्वागत व्हायचे. सर शाकाहारी आणि निव्र्यसनी होते. चहा हे त्यांचे आवडते पेय होते. साधी राहणी त्यांनी अखेपर्यंत जपली. सर धार्मिक वृत्तीचे होते, पण दैववादी नव्हते. दादासाहेब पोतनीस, श्री. रा. टिकेकर, वि. वा. शिरवाडकर, ग. वि. अकोलकर प्रभृतींवर त्यांची परमेश्वराइतकीच श्रद्धा होती. डॉ. सुधाकर पवार सरांच्या विद्यार्थीवर्गाच्या वतीने त्यांना माझी आदरांजली!
प्रा. डॉ. अर्जुन बावळे, भडगाव, जळगाव

निवडणूक कर्मचाऱ्यांवरील अनावश्यक तणावावर उपायही शोधता येतील
‘निवडणुकीचे काम टाळणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई’ ही बातमी वाचून शासनाची कीव कराविशी वाटली. निवडणुकीचे काम करण्यास शासकीय कर्मचाऱ्यांचा विरोध असल्याची ठळक कारणे व त्यावर काही उपायही सुचवावेसे वाटतात. निवडणुकांचे काम नावडते ठरण्यामागे आचारसंहिता हे एक कारण आहे. ती साधारण एक ते दीड महिना लागू असते व या काळात शासकीय कर्मचाऱ्यांना रजा देत नाहीत. उन्हाळ्याच्या, हिवाळ्याच्या, गणपतीच्या सुट्टय़ांतच मतदान असते व त्यासाठी कर्मचाऱ्यांना पूर्वनियोजित कार्यक्रमही रद्द करणे भाग पाडते. या कामाच्या प्रशिक्षणात पुस्तकी ज्ञानावरच भर आहे. प्रत्यक्ष मशीनवर रंगीत तालीम न दिल्याने आत्मविश्वासाचा अभाव व त्यामुळे तणाव निर्माण होतो व हे काम नकोसे वाटते. हे काम पुढे येऊन करण्यासाठी काही प्रोत्साहनात्मक योजनाही नाहीत. शिवाय अधिकारी मतदानाच्या आधीच्या दिवशी पतपेटय़ा / मशीन ताब्यात घेऊन, रात्रीच्या निवासाची व्यवस्था नसतानाही ती सांभाळण्याची जबाबदारी निवडणूक कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने देतात. अयोग्य अधिकाऱ्यांना कामाचे वाटप हेही अनास्थेचे कारण ठरते. डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक हे समाजव्यवस्थेचे आधारस्तंभ असून, ते साधारणत: मितभाषी, सौम्य स्वभावाचे व बुद्धिजीवी असणे समाजाला अपेक्षित आहे. हे डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक केवळ शासकीय कर्मचारी आहेत म्हणून त्यांना निवडणुकीसारखे प्रशासकीय काम देण्यात येते, व म्हणावे तसे काम होत नाही.
यावर उपाय म्हणजे निवडणुकांची संबंधित कामे ही शासकीय सेवेतील व खासगी संस्थांतील प्रशासकीय, व्यवस्थापकीय विभागातील अधिकाऱ्यांना द्यावीत. इतरांना ही कामे त्यांच्या इच्छेप्रमाणे व अपेक्षा पूर्ण करूनच द्यावीत.
या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मानाची वागणूक व योग्य सुरक्षेची हमी मिळावी तसेच निवास, खाणे व वाहनाची सोय उपलब्ध झाली तर कर्मचारी या कामास नाके मुरडणार नाहीत. भारतासारख्या खंडप्राय राष्ट्रामध्ये लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदा, शासकीय सहकारी सोसायटय़ांच्या अशा निवडणुका सतत होतच असतात. त्यासाठी शासनाने कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करावी. शाळा सुरू असताना, परीक्षा नसलेल्या काळातच विशेषत: थंडीच्या दिवसातच निवडणुका घेतल्या तर मतदानही वाढेल व सर्वाची सोयही होईल. त्यासाठी मतदान काही महिने मागेपुढे करण्याची कायद्यात तरतूद करावी.
अरुण रंजलकर, ठाणे