Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

मुख्यमंत्र्यांचे धोरण मान्य करण्याचा प्रश्नच नाही
जनसुराज्य शक्तीचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार- कोरे
कोल्हापूर, २९ एप्रिल / विशेष प्रतिनिधी
गतविधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती या पक्षाने स्वतंत्र विचारधारा घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढविली आहे. आपल्या पक्षाने सरकार निर्माण करताना राष्ट्रवादीला समर्थन दिले आणि त्यांच्या कोटय़ातून आपणाला मंत्रिपद मिळाले आहे. तेव्हा आपल्या मंत्रिपदाविषयी काही वक्तव्य करावयाचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याशी जरूर चर्चा करावी. त्यांनी निर्णय दिल्यास आपण मंत्रिपदावरही पाणी सोडावयास तयार आहोत.

सोलापुरात भर बाजारपेठेत गुंडावर हल्ला
सोलापूर, २९ एप्रिल/प्रतिनिधी

शहरातील नव्या पेठेसारख्या मध्यवर्ती ठिकाणी भर बाजारपेठेत लग्नसराईत खरेदीची धामधूम चाललेली असताना एका सराईत गुंडासह त्याच्या साथीदारावर शस्त्रांनी खुनीहल्ला करण्यात आला. याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किरण पवार यांच्यासह सहाजणांविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.
अरुण प्रभाकर रोडगे (वय ४६, रा. मंगळवेढेकर चाळ, नवी पेठ) व त्याचा साथीदार महेंद्र खैरमोडे (वय २२, रा. भोई गल्ली, शुक्रवार पेठ) अशी जखमींची नावे आहेत.

डॉ. गो. मा. पवार यांना फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार
सातारा, २९ एप्रिल/प्रतिनिधी

ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. गो. मा. पवार यांची या वर्षीच्या फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कारासाठी तर भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे कार्यकर्ते शाम शिवमूर्ती जाधव यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. फुले-आंबेडकर साहित्य पंचायत व भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १६ वर्षांपासून परिवर्तनाच्या चळवळीमध्ये योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कार्यकर्त्यांना फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पुरस्काराची रोख रक्कम १० हजारापासून २५ हजार रुपयांपर्यंत या वर्षांपासून वाढविण्यात आली आहे.

कलावंतांसाठी अभिनव पध्दतीची जगातील पहिलीच वेबसाईट तयार
सोलापूर, २९ एप्रिल/प्रतिनिधी

जगातील सर्व क्षेत्रातील कलाकारांना वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या कलेचे प्रदर्शन करण्याच्या हेतूने सोलापुरात शेखर हेमाजी दुस्सल या तरुण संगणक अभियंत्याने अभिनव पध्दतीने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रथमच वेबसाईट विकसित केली आहे. जगातील पहिलीच असलेल्या या वेबसाईटचे नाव www.artskill.net .ल्ली३ असे आहे. या वेबसाईटची जागतिक पातळीवरील सर्व कला, उपकला, कलेचा प्रकार तसेच कोणत्याही भाषांचा समावेश होऊ शकतो, कलावंत स्वतची पूर्ण माहिती (प्रोफाईल) तसेच स्वतच्या कलेची-चित्रकला, छायाचित्रे, ऑडिओ-व्हिडिओ फाईल्स स्वत या वेबसाईटवर अपलोड करु शकतो. या सर्व माहितीच्या आधारे डायनामिकली कलाकारांचे स्वतचे वेबपेज तयार होईल, अशी वैशिष्टय़े आहेत. निर्माता,दिग्दर्शक, विविध जाहिरात तसेच तत्सम एजन्सीज यांना आवश्यक असलेल्या कलाकारांना शोधण्यासाठी आपला अमूल्य वेळ वाया न घालविता कमीत कमी वेळेत कला ऐकता व पाहता येईल. तसेच त्या कलाकारांशी थेट संपर्कही साधता येईल. या वेबसाईटवरुन वेगवेगळ्या कलांची व कलाकारांची माहिती विनामोबदला व सहज उपलब्ध होत आहे.

मनीषा शेटे यांचा जामीन उच्च न्यायालयात मंजूर
कराड, २९ एप्रिल/वार्ताहर

स्वयंरोजगार देण्याच्या नावाखाली हजारो महिलांची फसवणूक झाल्याप्रकरणातील प्रमुख संशयित इस्लामपूरच्या अ‍ॅड. मनीषा शेटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला. जीवनशांती महिला गृहउद्योग समूह (सागाव, ता.शिराळा, जि.सांगली) या संस्थेच्या वतीने सोनपरी डॉल बनविण्याचा या महिलांना स्वयंरोजगार देण्याच्या नावाखाली सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्य़ातील हजारो महिलांच्या झालेल्या कोटय़ावधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी आनंदराव तुकाराम मलगुंडे, अभिजीत सुरेश शिंदे व अ‍ॅड. मनीषा शेटे यांच्यासह दहाजणांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्य़ातील विविध दहा पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद झाले आहेत. याप्रकरणी आनंदराव मलगुंडे व अभिजीत शिंदे यांच्यासह संशयितांना अटक झाली. मात्र येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेल्या अ‍ॅड. मनीषा शेटे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तेथे प्राथमिक सुनावणीनंतर काही अटींवर अ‍ॅड. शेटे यांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता. या जामीन अर्जावर आज अंतिम सुनावणी होऊन अ‍ॅड. मनीषा शेटे यांचा जामीन कायम करण्यात आला.

सोलापूरच्या प्रीतम दोशी यांनी उत्तर ध्रुवावर तिरंगा फडकावला
सोलापूर, २९ एप्रिल/प्रतिनिधी
येथील उद्योगपती अरविंद रावजी दोशी यांचे सुपुत्र प्रीतम दोशी यांनी गेल्या ६ एप्रिल रोजी उत्तर ध्रुवावर जाऊन भारतीय ध्वज फडकाविला. ६ एप्रिल १९०९ रोजी हेन्सेन यांनी उत्तर ध्रुवावर पहिले मानवी पाऊल ठेवले होते. बरोबर शंभर वर्षांनंतर त्या घटनेचा शताब्दी उत्सव प्रीतम यांनी तेथेच जाऊन साजरा केला. जगभरातून वीस जणांपैकी प्रीतम यांच्यासमवेत आणखी तीन भारतीय होते. महाराष्ट्रातून ते एकमेव होते. प्रीतम व अन्य दोन भारतीयांनी या दुर्गम प्रवासातही आपले शाकाहाराचे व्रत कसोशीने सांभाळले. ही यात्रा ऑस्लो, नॉर्वे येथून गेल्या १ एप्रिल रोजी सुरू झाली. विमान व त्यानंतर बर्फावरील वाहनांवर स्वार होऊन त्यांनी उत्तर ध्रुव गाठले. त्यांना तीन रात्री तंबूमध्ये काढाव्या लागल्या. वजा तीस अंश तापमान व बोचऱ्या थंडीच्या प्रतिकूल हवामानातही त्यांनी ही यात्रा सफल केली. सोलापूरचीच नव्हे तर महाराष्ट्राची शान वाढविणाऱ्या प्रीतम यांच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण देशातून त्यांचे कौतुक होत आहे. येथील शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय व रुग्णालय ट्रस्टतर्फे अध्यक्ष अरविंद दोशी, मानद सचिव दीपक आहेरकर, प्राचार्य डॉ. प्रदीप नांदगावकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव केला.

खूनप्रकरणी जन्मठेप
सातारा, २९ एप्रिल/प्रतिनिधी
भवानी पेठ (ता.खटाव) येथील संजय नथू जाधव (वय ३६) यास शंकर नामदेव पाटोळे (वय ३८) यांच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा येथील तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यू. डी. लव्हाटे यांनी ठोठावली. २६ फेब्रुवारी २००९ रोजी मयत शंकर नामदेव पाटोळे यांचा कुऱ्हाडीने वार करून आरोपी संजय नथू जाधव यांनी खून केला होता. आरोपी संजय याची एक गुंठा जमीन मृत शंकरने तीन हजार रुपयांत खरेदी केली होती. त्या व्यवहारातील ६०० रुपये देणे बाकी होते. त्या कारणावरून दोघांत वारंवार वादावादी झाली होती. २६ फेब्रुवारीला बाचाबाचीचे रुपांतर मारामारीत झाल्यानंतर खून झाला होता. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. एम. एम. मुजावर यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद व साक्षीपुरावे ग्राह्य़ धरून न्या. लव्हाटे यांनी आरोपी संजय जाधवला जन्मठेप व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न दिल्यास एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयाने मुलाकडून आईचा खून
पंढरपूर, २९ एप्रिल/वार्ताहर
अनैतिक संबंधाचा संशय घेऊन संतोष बळीराम घळके (अनवली, ता. पंढरपूर)याने बुधवारी पहाटे धारधार शस्त्राने वार करून आईचाच खून केला. या प्रकाराने पंढरपूर व अनवली येथे खळबळ उडाली आहे. रेखा बळीराम घळके हिचा मुलगा संतोष याच्या मनात आईविषयी संशय होता. त्याबाबतचा राग बऱ्याच वेळा तो व्यक्त करीत असे. संतोष याने हातातील धारदार चाकूसारख्या शस्त्राने पोटावर, छातीवर वार करून आईचा खून केला.

बालाजी पतसंस्थेस यंदा विक्रमी ८६ लाखांचा नफा
इचलकरंजी, २९ एप्रिल / वार्ताहर

शहरातील अग्रेसर पतसंस्था म्हणून लौकीक असलेल्या श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेला ८६ लाख रुपयांचा विक्रमी नफा झाला आहे. संस्थेचे संस्थापक मदन कारंडे व अध्यक्ष शिरीष कांबळे यांनी ही माहिती दिली. १९९३ साली सुरू झालेल्या या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयासह पाच स्वमालकीच्या शाखा आहेत. ठेवींमध्ये ९२ लाखांची वाढ होवून त्या १६.३९ कोटी रुपये झाल्या आहेत. कर्जवाटप १०.८८ कोटी, गुंतवणूक ८.९० कोटी, खेळते भांडवल २३ कोटी, भागभांडवल ८३ लाख, राखीव निधी २ कोटी अशी आर्थिक स्थिती आहे. यावर्षी संस्थेचा एन.पी.ए. शून्य आहे. वीज बिलाबरोबरच आता सर्व शाखांमध्ये टेलिफोन बिले भरून घेण्याची सोय केली जाणार आहे. संस्थेची सदरची शाखा डेक्कन परिसरात पुढील महिन्यात सुरू होणार आहे. कर्जवसुलीकडे विशेष लक्ष दिले असून १५० खातेदारांवर वसुलीदावा दाखल केला आहे.

शिवाई यात्रेची सांगता उत्साहात
जुन्नर, २९ एप्रिल/वार्ताहर

जुन्नर शहराचे श्रद्धास्थान आणि किल्ले शिवनेरीची गडदेवता असलेल्या शिवाई यात्रेची सांगता मोठय़ा उत्साहात जुन्नरमध्ये झाली. शिवाई यात्रा ही यात्रा हंगामातील सर्वात शेवटी होणारी जुन्नर परिसरातील यात्रा. या यात्रेच्या निमित्ताने पाळणे, खेळणी अशी आबालवृद्धांचे आकर्षण असणारी दुकाने, जुन्नर शहरात थाटतात. जुन्नरवासीय नागरिकांच्या लोकवर्गणीतून ही यात्रा भरवली जाते. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या या यात्रोत्सवाचा प्रारंभ जुन्नर शहरातील सर्व देवींच्या मंदिरामध्ये मांडवडहाळे मिरवणूक नेऊन आणि देवीची चोळी-पातळाने ओटी भरून केली जाते. अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मोटारसायकल रॅली, शिवाईदेवीची जुन्नर शहरातून पालखी मिरवणूक मोठय़ा उत्साहात काढण्यात आली.

शेतक ऱ्यांना कृषी दिंडीमार्फत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणार
सोलापूर, २९ एप्रिल/वार्ताहर

शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम २००९-१० वर्षांच्या पूर्वनियोजनासाठी येत्या १ ते ३१ मे या कालावधीत कृषी िदडी जिल्ह्य़ामार्फत तालुक्यातील प्रत्येक आठवडा बाजाराच्या ठिकाणी जाऊन सर्व कृषी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या चित्ररथामार्फत बीज प्रक्रिया, सुधारित वाणांची ओळख, खतांचा वापर, कृषी अवजारांची माहिती, खरीप हंगामातील मुख्य पिकांच्या उत्पादनवाढीची सूत्रे, जलसंधारण, ठिबकसिंचन या सर्व अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व्हिडिओ चित्रणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितले. या कृषी दिंडीसमवेत त्या विभागातील पाच अधिकारी, कर्मचारी व कृषी शास्त्रज्ञ उपस्थित राहून फळबाग लागवडीचे फॉर्म, माती परीक्षण नमुना घेण्याची पद्धती, बीजप्रक्रिया याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. या उपक्रमाद्वारे कमी श्रमाच्या, कमी खर्चाच्या व अधिक उत्पादनाच्या कोरडवाहू शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

तापमान वाढीने पंढरपूरकर हैराण
पंढरपूर, २९ एप्रिल/वार्ताहर

पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील तापमानात गेल्या दोन दिवसांपासून कमालीची वाढ झाली असल्याने आबालवृद्ध हैराण झाले आहेत. पंढरीचे नेहमीचे गजबजलेले रस्ते दुपारच्या वेळी ओस पडलेले असतात. दुपारच्या वेळेस विठ्ठल मंदिर परिसराभोवती अगदी तुरळक गर्दी असते. यंदा प्रथमच पंढरपूरकरांना उन्हाळ्याच्या झळा मोठय़ा प्रमाणात जाणवत असून सूर्यनारायण आगीसारख्या झळा सोडत असून दमेकरी, वृद्ध, बालके हैराण झाली आहेत. बारा ते तीन या दरम्यान अंगाची लाहीलाही होऊन घामाच्या धारा लागत आहेत. उन्हाळ्याने यंदा आपले रौद्र रूप दाखवून दिल्याने सर्वजण हैराण झाले आहेत. उन्हामुळे पंढरीत येणाऱ्या भाविकांतही घट झाली असून नेहमी गर्दी असलेला स्टेशन रोड, शिवाजी चौक, विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसर, नाथ चौक, नवी पेठ हे परिसर दुपारच्या वेळी ओस पडलेले असतात. पंढरीत तर सर्वजण सायं. ५ च्या नंतरच बाहेर पडणे पसंद करतात. त्यामुळे पंढरीत दुपारी १२ ते ४ शुकशुकाट जाणवत असतो. यंदा प्रथमच मोठय़ा प्रमाणात उन्हाळा जाणवत आहे. पंढरपूरचे अन् सोलापूरचे तापमान जवळजवळ सारखेच जाणवत आहे. उन्हामुळे पंढरपूरकर हैराण झाले आहेत.

इचलकरंजी पालिकेच्या अंदाजपत्रकास मान्यता
इचलकरंजी, २९ एप्रिल / वार्ताहर
इचलकरंजी नगरपरिषदेच्या १४६ कोटी रुपयांच्या वार्षिक अंदाजपत्रकास बुधवारी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी मान्यता दिली. त्याकरिता १६ अटी लागू केल्या आहेत. इचलकरंजी नगरपरिषदेचे सन २००८-०९ सालचे दुरुस्त व २००९-१० सालचे वार्षिक अंदाजपत्रक २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत मंजूर करण्यात आले. त्यास मंजुरी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले होते. जिल्हाधिकाऱ्यानंी त्यास मंजुरी देताना अटी घातल्या आहेत. कर्जाची मुद्दल व व्याजाच्या रक्कमा वेळेत भराव्यात. मागासवर्गीय कल्याण निधी अनुशेषासह पूर्णपणे वापरावी, महिला व बालकल्याणासाठी ठोस कार्यक्रम राबवावेत, पाणीपट्टी, संयुक्त कराची पूर्ण वसुली करावी, शासकीय अनुदानाचा पूर्ण वापर व्हावा, खर्चात काटकसर करावी आदी अटींचा त्यामध्ये समावेश आहे. ही माहिती मुख्याधिकारी त्रिंबक डेंगळे पाटील यांनी दिली.

सोलापुरात ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे सामूहिक उपनयन संस्कार
सोलापूर, २९ एप्रिल/प्रतिनिधी
येथील देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्यावतीने दहा बटूंवर सामूहिक उपनयन संस्कार करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून संस्थेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्ञाती बांधवांचा वेळ आणि खर्च वाचावा आणि उपनयन संस्कारही व्हावेत म्हणून आयोजित या सोहळ्यात सर्व बटूंवर वेदशास्त्र संपन्न हरिहर दीक्षित (पुणे) यांनी पौरहित्य केले. त्यांना मिलिंद केंदूरकर, उमेश कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, श्रीकृष्ण दीक्षित, सुनदवा दीक्षित यांनी सहकार्य केले संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, ज्येष्ठ सदस्य शंकरराव चिंचोळकर, उपाध्यक्ष हरिभाऊ जतकर, कार्यवाह श्रीनिवास कुमठेकर, मेघा भोसेकर, हेमा चिंचोळकर, रेवती चाफळकर, सदाशिव घोत्रे, पद्माकर कुलकर्णी, ब. गो. अहंकारी आदींची उपस्थिती होती.