Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

चला, ठाणे-मुंबईकरांनो मतदान करूया!
आज ३० एप्रिल. याच तारखेला हिटलर नावाची हुकुमशाही संपली. त्याच तारखेला लोकशाहीला आपल्या एका मताचं खत घालण्याचा योग जुळून आला आहे. अघोषित हुकुमशाही वा अप्रत्यक्ष लष्करशाही अशा शेजाऱ्यांनी वेढलेल्या आपल्या देशात लोकशाही पाय घट्ट रोवून उभी आहे. ही लोकशाही कलम होऊ नये असे वाटत असेल तर एक उपाय आहे. साधा-सरळ अगदी सोपा.. बोटाला शाई लावून घेण्याचा. शाईचा हा एक थेंब तुमच्या-आमच्या भवितव्यासाठी अमृतासमान आहे. भविष्याचे दान आम आदमीच्या बाजूने पडण्यासाठी आपल्याकडून देशालाही हवे आहे एक दान.. तुमचं मतदान. राग-लोभ,
हर्ष-खेद, आशा-निराशा किंवा समाधान व्यक्त करण्याचा मार्ग एका पेटीतून जातो. पहिली पेटी मताची पेटी. आपल्या एका मताने फरक पडू शकतो यावर एकमत व्हायला हवे इतकचं. स्वस्थ बसेल तो फसेल; असे होऊ नये यासाठी आपल्या हातात एकच गोष्ट आहे ती म्हणजे मतदान. कारण तुमचं बोट धरूनच तर लोकशाही वाटचाल करणार आहे. तर मग चला मुंबई आणि ठाणेकरांनो, मतदान करू या!

एक दिवस असा येतो,
जेव्हा जाणवतं,
खरंच, बोटानं गोवर्धन उचलता येतो.
खरंच, बोटावर सुदर्शन चक्र असतं,
जे ठरवतं आपल्या जगण्याची दिशा

एक दिवस असा येतो,
जेव्हा वाटतं,
हा, तो, तो आणि तो
सगळे सारखेच
उडदामाजी काळे गोरे
काय निवडणार?
पण मग कळतं
निवडण्याची कला
आलीच पाहिजे
आपल्या बोटाला,
नाहीतर ते बोट कसले?

कुणाकडे तरी बोट दाखवून
परिस्थितीची जबाबदारी
कुणाच्यातरी खांद्यावर टाकणे
सर्वात सोपे!

पण, ‘बोट उचलून’ जबाबदारी
स्वीकारणं खरं हिमतीचं काम,
बोट उचला, कर्तव्याला जागा
आज दिवस तुमचा समजा!

मुंबई, ठाण्यासह १०७ मतदारसंघात आज मतदान
सोनिया, अडवाणी आदींचे भवितव्य ठरणार
नवी दिल्ली २९ एप्रिल/पीटीआय

देशातील १०७ मतदारसंघात उद्या (गुरूवारी) तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असून एकूण १५६७ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांचे भवितव्य उद्या मतदानयंत्रात बंद होणार आहे. या फेरीत एकूण १४.४ कोटी मतदार असून नऊ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशात मतदानासाठी १.६५ लाख केंद्रे ठेवण्यात आली आहेत. सिक्कीम विधानसभेच्या ३२ जागांसाठीही उद्या मतदान होत आहे. महाराष्ट्रात मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर या दहा मतदारसंघात गुरूवारी मतदान होत असून १९६ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्यावेळी अमेठीतून निवडणूक लढविली होती. यावेळी त्या रायबरेलीतून निवडणूक लढवित आहेत. त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघात गेल्या फेरीतच मतदान झाले आहे. अमेठीत मतदान कमी झाल्याने प्रियांका गांधी यांना धक्का बसला. त्यामुळे त्यांनी रायबरेलीत जास्तीत जास्त परिश्रम घेऊन लोकांशी संपर्क साधला. १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी रायबरेलीतून प्रतिनिधित्व केले होते. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगरमधून निवडणूक लढवित असून १९९१ पासून ते याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. अडवाणी यांचे मताधिक्य किती राहील याकडे सर्वाचे लक्ष आहे. तिसऱ्या फेरीत माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा हे कर्नाटकातील हासन मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.बंगारप्पा, जनता दल युनायटेडचे प्रमुख शरद यादव, केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल व ज्योतिरादित्य शिंदे यांचेही भवितव्य ठरणार आहे. गुजरातेत २६, मध्य प्रदेशात १६, उत्तर प्रदेशात १५, पश्चिम बंगालमध्ये १४, बिहार व कर्नाटकात प्रत्येकी ११, महाराष्ट्रात १०, काश्मीर, सिक्कीम, दादरा नगर हवेली व दमण, दीव येथे प्रत्येकी एका मतदारसंघात निवडणूक होत आहे. आतापर्यंत २६५ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले आहे. मतदानाच्या आणखी दोन फेऱ्या बाकी असून १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

खेळण्यातील हेलिकॉप्टरची संसद संकुलामध्ये घुसखोरी
नवी दिल्ली, २९ एप्रिल/पीटीआय

रिमोट कंट्रोलने चालविता येणाऱ्या खेळण्यातील एका हेलिकॉप्टरने संसद भवन संकुलामध्ये आज ‘घुसखोरी’ केली. संसदेभोवती उभारलेल्या कडक सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत हे या घटनेने स्पष्ट झाले. सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना आहे.ही घटना केवळ एक अपघात आहे की संसदेच्या सुरक्षा व्यवस्था किती सजग आहे हे पाहाण्यासाठी काही समाजकंटकानी हा प्रकार मुद्दाम घडविला आहे याची चौकशी आता सुरक्षा यंत्रणा करीत आहेत. खेळण्यातील हे हेलिकॉप्टर एक फूट लांबीचे आहे. हे हेलिकॉप्टर संसद भवनामध्ये पश्चिम दिशेने म्हणजे तालकटोरा मार्गाच्या बाजूने उडत आले. हेलिकॉप्टरच्या घुसखोरीचा हा प्रकार आज सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी घडला. २००१ साली संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संसद भवन व त्या भोवतालचा ३ कि.मी. चा परिसर हा नो फ्लाईंग झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
संसद भवन संकुलात असलेल्या माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या पुतळ्याजवळ हे हेलिकॉप्टर उडत आले. तेथे बंदोबस्ताला असलेल्या सीआरपीएफ जवानाने तत्काळ ही गोष्ट संसद भवनातील नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर तत्काळ या परिसराला सुरक्षा जवानांनी घेरले. रिमोट कंट्रोलव्दारे चालविल्या जाणारे हे हेलिकॉप्टर खेळण्यातील हेलिकॉप्टरपेक्षा अत्याधुनिक आहे. या घटनेमागे एखाद्या तंत्रकुशल व्यक्तीचा हात असण्याची दाट शक्यता आहे असे सूत्रांनी सांगितले. संसद इमारत व तेथील सुरक्षा व्यवस्थेला ‘लक्ष्य’ करण्याचा या घटनेमागे उद्देश होता का याचीही सुरक्षा यंत्रणा चौकशी करीत आहेत. खेळण्यातील हेलिकॉप्टरने केलेल्या घुसखोरीबाबत संसद भवनाच्या सुरक्षा प्रमुखांनी आपल्या वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी असे या अहवालात म्हटले आहे. दहशतवादी हल्ले चढविण्याच्या देण्यात येत असलेल्या धमक्यांच्या पाश्र्वभूमीवर संसद भवनात खेळण्यातील हेलिकॉप्टरने केलेल्या घुसखोरीचा प्रकार गंभीर आहे. हेलिकॉप्टरची घुसखोरी हा कदाचित एक अपघातही असू शकेल परंतू आम्हाला कोणताही धोका पत्करायची इच्छा नाही असे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. भविष्यात घडणाऱ्या अशा कोणत्याही प्रसंगाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहाण्याच्या सूचना संसदेतील सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या.

‘रेड कॉर्नर नोटीस’ मागे घेतल्याने क्वात्रोचीचा काळा पैसा ‘मोकळा’
भाजपचा काँग्रेसवर तिखट हल्ला
नवी दिल्ली, २९ एप्रिल/पी.टी.आय.
बोफोर्स लाच घोटाळ्यातील आरोपी ऑट्टोव्हियो क्वात्रोची याला मोकळा करण्यास केंद्र सरकारच उतावीळ झाले होते. त्याच्याविरुद्ध जारी करण्यात आलेली ‘रेड कॉर्नर नोटीस’ मागे घेण्यात आल्याने आता तो कुठेही मुक्तपणे फिरून आपला बँकेत ठेवलेला काळा पैसा वापरण्यास स्वतंत्र झाला आहे, असा तिखट हल्ला आज भाजपने चढविला.
क्वात्रोचीच्या विरुद्धची रेड कॉर्नर नोटीस मागे घेतल्याने त्याला आता जगात कुठेही प्रवास करण्यास मोकळीक मिळाली आहे. परिणामी इतके दिवस त्याला आपल्या बँक खात्यांना हात लावता येत नव्हता ते या मोकळीकीमुळे त्या खात्यातील काळा पैसा तो वापरू शकणार आहे. हे खाते वापरण्यासाठी त्याला प्रत्यक्ष बँकेत जाणे गरजेचे होते. ती गरज आता भागणार आहे, अशी टीका भाजपचे सरचिटणीस अरुण जेटली यांनी केली. क्वात्रोचीचा प्रवास हा त्याच्या बँक खात्यांशी थेट निगडित आहे. याच कारणासाठी त्याला बंधनातून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार उतावीळ झाले होते, असा आरोप जेटली यांनी केला.
टॉम अँड जेरी
वॉल्ट डिस्नेचा ‘टॉम अँड जेरी शो’ लहानांइतकाच मोठय़ांमध्येही लोकप्रिय आहे. पण देशाची सर्वोच्च गुप्तचर संस्था ‘सीबीआय’च्या संचालकांनाही या शोचा मोह पडतो. एवढेच नव्हे तर आपली स्थिती या शोमधील टॉम या मांजरीसारखी झाली आहे, अशी तुलनाही त्यांना करावीशी वाटते. ही वेळ आली, बोफोर्स घोटाळ्यातील आरोपी क्वात्रोचीच्या विरुद्धची रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यामुळे. सीबीआयचे संचालक अश्विनीकुमार यांना यासंदर्भात पत्रकारांनी घेरले असताना त्यांनी टॉम अँड जेरीचे उदाहरण दिले. या कथानकातील जेरी टॉमच्या हातून नेहमी सुटत असतो. आणि टॉम पुन:पुन्हा त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असतो, असा दाखला देत त्यांनी क्वात्रोचीचा शोध अद्याप संपलेला नसल्याची (तोंडदेखली तरी) ग्वाही दिली. अर्थात जोपर्यंत क्वात्रोचीवर रेड कॉर्नर नोटीस होती तोपर्यंत त्याला पकडण्याची सीबीआयला आशा तरी होती. पण आता ती नोटीसच मागे घेतली गेल्याने ती आशाही संपुष्टात आली आहे, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी त्याच ओघात दिली.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
प्रत्येक शुक्रवारी