Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

पाचही मृतदेह सापडले
खोपटी तांडा दु:खात बुडाला
गेवराई, २९ एप्रिल/वार्ताहर
तलवाडा येथील त्वरितापुरी देवीचे दर्शन घेऊन परतत असताना जातेगावनजीक कालव्यात अ‍ॅपे रिक्षा पडून काल सायंकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा बुडून मृत्यू झाला.
तालुक्यातील खोंपटी तांडा येथील ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दामोदर पवार यांनी तलवाडा येथे कंदुरीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्या बहिणीलाही बोलावले होते. अ‍ॅपेरिक्षामध्ये (क्रमांक एमएच २३ सी ७८९२) बसून सारे तलवाडय़ास गेले. धार्मिक विधी आटोपून खोपटी तांडा या आपल्या गावाकडे सायंकाळी सातच्या सुमारास जातेगावपासून काही अंतरावर रिक्षा जायकवाडीच्या उजव्या कालव्यात गेली.

नांदेडमध्ये पाणीविक्रीचा धंदा तेजीत
नांदेड, २९ एप्रिल/वार्ताहर

जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांत पाण्याची पातळी झपाटय़ाने खाली जात असल्याने; तसेच पाणीटंचाई निवारणार्थ सरकारी उपाययोजना तोकडय़ा पडत असल्याने शहरालगत पाणीविक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. या व्यवहारातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाण्याचे स्रोत आटले. बेसुमार उपशामुळे पाण्याच्या पातळीतही मोठी घट झाली. नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातील पाण्याची पातळी अपेक्षेपेक्षा जास्त घटल्याने निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असलेली सरकारी यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे.

‘दिवाळी’ आणि ‘शिमगा’
सहावी वेतन- श्रेणी जाहीर झाली आणि पगारदारांनी फटाके उडवून आनंद व्यक्त केला. याच्या फोटोसह बातम्याही प्रसिद्ध झाल्या. प्रत्येक कार्यालयात चर्चेला ऊत आला. आकडेमोड होऊ लागली. कॅलक्युलेटरच्या साह्य़ाने गणितं मांडली जाऊ लागली. इनक्रीमेंट, प्रॉव्हिडंट फंड इत्यादी शब्द बसता-उठता त्यांच्या बायका-पोरांच्या तोंडून निघू लागले. एचआरए, महागाईभत्ता, प्रवासभत्ता या संबंधीची चर्चा वरच्या आवाजात होऊ लागली. नोकरदारांचा वर्ग निवडणुकीच्या तोंडावर खूष ठेवला. तशी ‘कर्जमाफी’ देऊन शेतकरीवर्गही चुचकारण्याचा शासनाने प्रयत्न केला.

वस्तुनिष्ठ अंदाजपत्रक सादर होणार
औरंगाबाद महापालिकेला सरकारकडून ४० कोटी रुपये येणे
औरंगाबाद, २९ एप्रिल/प्रतिनिधी
आकडय़ांची फुगवाफुगवी नाही, पैसा कसा येणार आणि तो कोठे खर्च होणार याचा लेखाजोखा. खर्चामुळे कोणता फायदा होणार याची माहिती म्हणजेच फलनिष्पत्ती दर्शविणारे ‘वस्तुनिष्ठ’ अंदाजपत्रक तयार करण्याचा आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षांचे सुमारे अडीच अब्ज रुपयांचे अंदाजपत्रक जूनच्या पहिल्या आठवडय़ात स्थायी समितीसमोर सादर होणार आहे. महापालिकेला आजही सरकारकडून ४० कोटी रुपये येणे बाकी आहे.

खतविक्रेता संघटना आंदोलनाच्या तयारीत
मालवाहतूक खर्चावर चर्चा

हिंगोली, २९ एप्रिल/वार्ताहर

खत उत्पादक कंपन्यांनी ‘लिकिंग’ची बंधने उठविली नाही तर राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय खतविक्रेत्यांनी बैठकीत घेतला. या बैठकीत खतविक्रेता संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. खतविक्रेता संघटनेची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत खतविक्रेत्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली.

३५ गावांना अशुद्ध पाणीपुरवठा
उस्मानाबादमध्ये पाणीटंचाई
उस्मानाबाद, २९ एप्रिल/वार्ताहर
जिल्ह्य़ात पाणीटंचाई तीव्रतेने भासू लागली आहे. सहा टँकरने पाच गावांत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्य़ातील ३५ गावांत पाणीपुरवठा शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये वीस टक्क्य़ांपेक्षा कमी क्लोरिनचे प्रमाण आढळल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचेही प्रशासनाच्या लक्षात आले आहे. या ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य यंत्रणेने नोटिसा दिल्या आहेत.

बीड जिल्हा कारागृहातून तीन आरोपींचे पलायन
तुरुंगाच्या भिंतीला छिद्र पाडून पळ काढला
बीड, २९ एप्रिल/वार्ताहर

चोरीच्या गुन्ह्य़ात जिल्हा कारागृहात असलेल्या तीन आरोपींनी भिंतीला छिद्र पाडून आज भर दुपारी पलायन केले. कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चोरीच्या गुन्ह्य़ात अटक झालेले शेख रिजवान शेख सिकंदर (बालेपीर, बीड), महेश मसुदेव धारकर (पिंपळनेर) व विजय संतोष जाधव (ईटकूर, जिल्हा उस्मानाबाद) काही दिवसांपासून जिल्हा कारागृहात होते. आज दुपारी बाराच्या सुमारास कारागृहाच्या उत्तरेला असलेल्या भिंतीला छिद्र पाडून तीनही आरोपींनी पलायन केले. काही वेळातच ही घटना कारागृह प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांना एकही आरोपी सापडला नाही. कारागृह अधीक्षक दत्तात्रेय सोनवणे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भरदिवसा पळून गेल्यामुळे कारागृहातील एकूण सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही कारागृहातील कैद्यांचे आत्महत्येचे प्रयत्न, इतर घटना घडल्याने कारागृह नेहमीच चर्चेत असते.

आगीत पाच घरे भस्मसात
हिंगोली, २९ एप्रिल/वार्ताहर
तालुक्यातील कन्हेरगाव नाका येथे पैनगंगा नदीच्या परिसरातील अत्यंत गरीब पाच कुटुंबीयांची घरे आज लागलेल्या आगीत भस्मसात झाली. ही सर्व कुटुंबे उघडय़ावर पडली आहेत. कान्हेरगाव नाका येथे आज दुपारी तीनच्या सुमारास पैनगंगा नदीच्या परिसरातील रहिवासी शेख शहानूर, शेख चाँदबी शेख कादर, दत्ता सुदामा वैद्य, शे. सलिमाळी शे. बाबू, शेख शकिलाबी यांच्या घरांना आग लागली. पाचही घरांतील संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले. सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच मंडल अधिकारी दत्तराव मुटकुळे घटनास्थळी पोहोचले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आगीत नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीची मदत तात्काळ वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पैनगंगा नदीला २००६मध्ये आलेल्या पुरामध्ये या कुटुंबीयांचे नुकसान झाले होते. आता तीन वर्षांत परत या पाच कुटुंबीयांवर नैसर्गिक आपत्ती आली. त्यांच्या मदतीसाठी कन्हेरगाव नाका येथे उद्या (गुरुवारी) मदतफेरी काढण्यात येणार असल्याचे मधुकर सोळंके, बबन सोळंके, अशोककुमार सेठी, बालाजी गलंडे यांनी सांगितले.

दूषित पाणीपुरवठा; ८ ग्रामपंचायतींना नोटीस
तुळजापूर, २९ एप्रिल/वार्ताहर
ब्लिचिंग पावडरचा पुरेसा वापर न केल्यामुळे दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेने तालुक्यातील खडकी, माळुंजा, सांगवी, गंदोरा, वडगाव, दहिटना, बोरनदीवाडी, शहापूर आदी ग्रामपंचायतींना नोटिसा दिल्याचे वृत्त आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येक ग्रामपंचायतीस ब्लिचिंग पावडरचा पुरवठा केला जातो. पण पाण्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण कमी असल्याने काविळ, गॅस्ट्रो या रोगाच्या फैलावाची शक्यता वाढल्याने प्रशासनाने जिल्ह्य़ातील ३५ ग्रामपंचायतींना नोटिसा दिल्याचे समजते. जिल्ह्य़ातील ६२२ गावांच्या पाण्याच्या नमुन्याची तपासणी केली. त्यामध्ये ३५ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठय़ात २० टक्क्य़ांपेक्षा कमी क्लोरिनचे प्रमाण आढळल्याने आरोग्य खात्याने कारवाई केली. त्यात तुळजापूर तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

‘सिद्धार्थ’मध्ये प्राण्यांसाठी कूलर
औरंगाबाद, २९ एप्रिल/प्रतिनिधी
उन्हाचा वाढता कडाका आणि भरदुपारी होणारी वीजकपात यामुळे औरंगाबादकर सिद्धार्थ उद्यानाकडे पाय वळवतात. पण तेथेही त्यांना तेच चित्र पाहायला मिळते - उन्हामुळे तेथील प्राणीही त्रस्त झाल्याचे त्यांना पाहायला मिळते. प्राण्यांना उष्म्याचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली असून वाघ आणि सिंहासाठी कूलर लावण्यात आले आहेत. वाघांबरोबरच हत्तींना दिवसातून दोन वेळा गार पाण्याने अंघोळ घालण्यात येत आहे. सापांच्या विभागात ओले पोते ठेवून त्यावर तीन ते चार वेळा पाणी शिंपडण्यात येत आहे. हरिणांना झाडांची सावली असलेल्या भागात हलविण्यात आले आहे तर सांबर आणि नीलगायींसाठी सावलीचे शेड बांधण्यात येत असल्याचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.हरणांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना पाण्यातून गूळ तसेच टॉनिकही देण्यात येत आहे. अन्य प्राण्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून त्यांना वेगवेगळी औषधे देण्यात येत आहे. जोरदार पाऊस होईपर्यंत येथील प्राण्यांची अशीच काळजी घेण्यात येणार आहे.

शहरात पारा ४३ अंशांच्या पुढे
औरंगाबाद, २९ एप्रिल/प्रतिनिधी

शहराच्या तापमानात गेल्या दोन दिवसांत कमालीची वाढ झाली आहे. काल पारा ४३ अंशावर पोहोचला होता आज त्याने त्याही पुढे मजल मारली. त्यामुळे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजण्यापर्यंत घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. सायंकाळी सहा वाजता उन्हाची तीव्रता कमी होत असली तरी जमीन मात्र रात्री ९ वाजण्यापर्यंत गरमच राहते. दिवसा अंगाला चटके बसतात तर रात्री उशिरापर्यंत जमिनीवर अंग ठेवता येत नाही, असे चित्र आहे. काही दिवस शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअस इतके झाले होते. नंतर त्यात पुन्हा घसरण झाली. त्यामुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही. काल अचानक तापमानात वाढ झाली आणि दुसऱ्या दिवशीही ही वाढ कायम राहिली. सकाळी दहा वाजताच अंगाला चटके बसण्यास सुरू होतात. दुपारी घराबाहेर पडणे अशक्य असल्यामुळे मुख्य रस्ते वगळता अन्य रस्त्यांवर अघोषित संचारबंदीचे चित्र दिसते. घरातही वीजकपात राहत असल्यामुळे अनेक जण नजीकच्या उद्यानांमध्ये आसरा घेत असल्याचे दिसते.

सरस्वती भुवन प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
औरंगाबाद, २८ एप्रिल/खास प्रतिनिधी
येथील सरस्वती भुवन प्रशालेतील १९८३ मध्ये दहावी पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा चांगलाच रंगला. या शाळेत शिस्त लागली, संस्कार घडले. शिस्त, संस्कार हे किती महत्त्वाचे आहे याची प्रचिती आज समाजात वावरताना येत आहे, असे एका विद्यार्थ्यांने म्हणताच अन्य विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला. तत्कालीन विद्यार्थी, शिक्षक हे त्या काळच्या रम्य आठवणीत हरवून गेले होते. तत्कालीन मुख्याध्यापक द. रा. मेढेकर यांचे भाषण ऐकताना सर्वजण भारावून गेले होते. विद्यार्थ्यांतर्फे द. रा. मेढेकर यांच्यासह सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांतर्फे शाळेला संगणक आणि प्रिंटर आदी भेटवस्तू देण्यात आले. प्रत्येक शिक्षकाला भेटून नव्याने ओळख करून द्यायची, काय करतो आहोत हे सांगायचे आणि त्यांच्या संदर्भातील आपली आठवण सांगायची, असे तत्कालीन विद्यार्थी करताना दिसत होते. पराग पांडे, अभय डोंगरे, राहुल गानू आदींनी या सोहळ्याचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला होता.

उपाहारगृहांमध्ये व चहाच्या गाडय़ांवर शुद्ध पाणी वापरण्याची प्रशासनाची सूचना
लोहा, २९ एप्रिल/वार्ताहर

शहरातील काही उपाहारगृहांमध्ये व चहाच्या हातगाडय़ांवर तळ्यातील अशुद्ध पाणी वापरीत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता- मराठवाडा वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपालिकेच्या प्रशासनाने त्याची दखल घेतली. शहरातील उपाहारगृहे, चहाटपरीधारक, ज्यूसचालक, आईसक्रीमवाल्यांना शुद्ध पाणी वापरण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. दूषित पाण्यामुळे शेवडी, शेवडी तांडा येथे दोन बालके दगावली. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या, तर दुसरीकडे शहरातील ग्राहकांना अशुद्ध पाणी दिले जात आहे. त्यामुळे गॅस्ट्रो व पोटदुखी, अन्य रोग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पाश्र्वभूमीवर पालिका प्रशासनाने सर्व हॉटेल, चहा टपरीवाल्यांच्या पाणीनमुने घेतले आहेत. मुख्याधिकारी सरवदे यांनी तळ्यातील पाण्यात जलशुद्धीकरण औषध टाकण्याच्या आज सूचना दिल्या आहेत. पाण्यामुळे कोणत्याही रोगाची समस्या उद्भवू नये यासाठी प्रशासन पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत, असे श्री. सरवदे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांकडून सक्तीने शंभर रुपयांची वसुली
उस्मानाबाद, २९ एप्रिल/वार्ताहर
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त विद्यार्थ्यांकडून सक्तीने शंभर रुपयांची वसुली केली जात आहे. या रकमेची पावती न देताच मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांनाही यातून वगळण्यात न आल्याने संताप व्यक्त होत आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मुक्त विद्यापीठामार्फत शिक्षण घेणारे नऊशे विद्यार्थी आहेत. कला, वाणिज्य व इतर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांकडूनही सक्तीने पैसे वसूल केले जात आहेत. येत्या काही दिवसांत मुक्त विद्यापीठामार्फत परीक्षा होणार आहेत. या परीक्षेचे प्रवेशपत्र देताना शंभर रुपये विद्यार्थ्यांकडून घेतले जातात. औपचारिक शिक्षणासाठी लागणारा खर्च आवाक्याबाहेर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठाचा पर्याय निवडला होता. तथापि ऐन परीक्षेच्या वेळी अतिरिक्त शंभर रुपये द्यावे लागत असल्याने विद्यार्थी वैतागले आहेत.

उष्णतेमुळे बैलाचा मृत्यू; पशू-पक्षी सैरभैर
सोयगाव, २९ एप्रिल/वार्ताहर

चार दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असल्याने उन्हाची तीव्रता सहन न झाल्याने एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तालुक्यात यंदाचा उन्हाळा सर्वासाठी त्रासदायक ठरू लागला आहे. गेल्या चार दिवसांत तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सियसवरून ४४ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हामुळे पशुपक्षांवर विपरित परिणाम झाला आहे. मंगळवारी एका शेतकऱ्याचा बैल शेतात उभा असताना अचानक चक्कर येऊन खाली पडला. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही या बैलाचे प्राण वाचू शकले नाही. जंगलात चरण्यासाठी जाणाऱ्या गाय, म्हशी, बकऱ्या या दिवसभर उन्हात असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. चारा कमी खाणे, चक्कर येणे या समस्यांनी जनावरांची गर्दी पशु दवाखान्यात होऊ लागली आहे. नाशिक, नांदगावकडील धनगर मंडळी मोठय़ा संख्येने बकऱ्या व मेंढय़ा घेऊन अजिंठय़ाच्या डोंगरात विखुरली आहे. या कडक उन्हामुळे त्याच्या पशुधनावर संकट कोसळले आहे. जंगलातील जलसाठे कमी झाल्याने माकडांनी गाव वस्तीकडे धाव घेतली आहे. मागील वर्षी उन्हामुळे अनेक माकडे आजारी पडली होती.