Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नांदेडमध्ये पाणीविक्रीचा धंदा तेजीत
नांदेड, २९ एप्रिल/वार्ताहर

 

जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांत पाण्याची पातळी झपाटय़ाने खाली जात असल्याने; तसेच पाणीटंचाई निवारणार्थ सरकारी उपाययोजना तोकडय़ा पडत असल्याने शहरालगत पाणीविक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. या व्यवहारातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाण्याचे स्रोत आटले. बेसुमार उपशामुळे पाण्याच्या पातळीतही मोठी घट झाली. नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातील पाण्याची पातळी अपेक्षेपेक्षा जास्त घटल्याने निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असलेली सरकारी यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना सुरू असल्या तरी त्याला मर्यादा असल्याने पाणीविक्रीचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.
शहरालगत चोहोबाजूंनी झपाटय़ाने वाढणाऱ्या नव्या वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. बहुतांश नव्या भागांत ग्रामपंचायत अथवा महानगरपालिकेकडून पिण्याचे पाणी पुरविले जात नाही. असलेल्या वामननगर, लोकमित्रनगर, नवी वाडी, सांगवी, तथागत नगर, आदर्शनगर, कौठा आदी भागांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. स्वत:च्या मालकीच्या कूपनलिकांना ४००-४०० फूट खोदूनही पाणी लागत नाही.
पाण्याची गरज ओळखून पाणीविक्रीच्या व्यसायात अनेक जण उतरले आहेत. खासगी पाणीपुरवठा करणाऱ्यांची संख्या आता लक्षणीय झाली आहे. दीड-दोन हजार लिटर पाणी ३०० ते ३५० रुपये मोजल्यानंतर मिळते. याच किमतीवरून वेगवेगळ्या भागात दिवस-रात्र एक करून हजारो लिटर पाण्याची विक्री होत आहे. कधी तरी येणाऱ्या सरकारी टँकरची वाट पाहण्यापेक्षा खासगी टँकरद्वारे पाणी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असल्याने या क्षेत्रातील व्यापाऱ्यांचा फायदा होत आहे.
तरोडा नाका व परिसरात छोटी-मोठी तब्बल ३० ते ४० टँकर पाणीपुरवठा करतात, असे सांगण्यात आले. वेगवेगळ्या भागातील विहिरीतून उपसा करून किंवा महापालिकेकडून शुल्क भरून विकत घेतले जाणारे हे पाणी सर्वसामान्यांना दुप्पट किंमतीने विकले जात आहे, असे सांगण्यात आले.