Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पाचही मृतदेह सापडले
खोपटी तांडा दु:खात बुडाला
गेवराई, २९ एप्रिल/वार्ताहर

 

तलवाडा येथील त्वरितापुरी देवीचे दर्शन घेऊन परतत असताना जातेगावनजीक कालव्यात अ‍ॅपे रिक्षा पडून काल सायंकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा बुडून मृत्यू झाला.
तालुक्यातील खंोपटी तांडा येथील ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दामोदर पवार यांनी तलवाडा येथे कंदुरीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्या बहिणीलाही बोलावले होते. अ‍ॅपेरिक्षामध्ये (क्रमांक एमएच २३ सी ७८९२) बसून सारे तलवाडय़ास गेले. धार्मिक विधी आटोपून खोपटी तांडा या आपल्या गावाकडे सायंकाळी सातच्या सुमारास जातेगावपासून काही अंतरावर रिक्षा जायकवाडीच्या उजव्या कालव्यात गेली. कालव्यात नाथसागरातून पाणी सोडण्यात आलेले असल्याने ज्यांना पोहता येत होते अशी माणसे पोहून बाहेर पडली.ु लहान मुले व महिला मात्र बुडाल्या. या दुर्घटनेतील १४ व्यक्तींपैकी ९ बचावले. तीन मुले व २ महिला बुडून मृत्युमुखी पडल्या.
काल रात्री युवराज विष्णू चव्हाण (वय ९) याचा मृतदेह सापडला. बेपत्ता असलेल्या चौघांचा गावकऱ्यांनी आज सकाळीच शोध कार्य सुरू केली. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर गंगूबाई रामेश्वर पवार (वय २७), संकेत विष्णू चव्हाण (वय ७) यांचे मृतदेह शोधून काढण्यास यश आले. आशा विष्णू चव्हाण (वय ३५) यांचा मृतदेह सायंकाळी ४ वाजता आढळून आला. मीरा गोविंद राठोड (वय १२) हिचा मृतदेह सायंकाळी ५ वाजता सापडला.
या दुर्घटनेतून ९ जण बचावले. यातील बबन भानुदास राठोड (पाचेगाव) उत्तम पोहणारे असल्याने त्यांनी पोहत जाऊन सर्वाना बाहेर काढण्यात मदत केली. जखमी रिक्षाचालक राजू जनार्दन पवार याला बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी कुंडलिक बबन राठोड, शुभम रामेश्वर पवार, किरण रामेश्वर पवार, दामोधर लिंबा पवार, भागूबाई दामोधर पवार, अंकुश मगन पवार व सुनीता सुखदेव पवार यांच्यावर डॉ. राठोड यांच्या खासगी रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचार करण्यात येत आहेत.
या दुर्घटनेचे वृत्त समजताच माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती विजयसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य सुरेश हात्ते, प्रा. पी. टी. चव्हाण तालखेड, पंचायत समिती सदस्य प्रशांत मोरे, हरकी निमगावचे सरपंच राधाकिशन कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास माने, बंजारा नेते बी. एम. पवार, जातेगावचे शिवाजी चव्हाण आदींनी खोपटी तांडा व रुग्णालयात भेट दिली.
या दुर्घटनेने खोपटी तांडय़ाचा परिसर व्याकुळ झाला आहे. जवळच्या नातेवाईक असलेल्या दोन कुटुंबांतील नातेवाईकांना जलसमाधी मिळाल्याने या कुटुंबांवर दु:खांचा डोंगर कोसळला आहे.
रामेश्वर पवार खोपटी तांडय़ावरील कर्ता. बरे दिवस आले ही देवीची कृपा असे समजून रामेश्वरने देवीला बोकड कापण्याचा नवस पूर्ण करण्याचे ठरविले. तो नवसही पूर्ण केला. या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी बहीण, मेहुणे व तिच्या मुलांना अगत्याने बोलाविले होते. त्याची पाठची बहीण आशा विष्णू चव्हाण संकेत व युवराज या दोन मुलांना घेऊन आली होती. सर्वात लहान असलेली पाच वर्षांची दिव्या मात्र घरीच होती. देवीचे दर्शन घेऊन दीर्घायुष्याची केलेली मागणी या कुटुंबीयांच्या फळाला आली नाही. रिक्षा पाण्यात जाताच ज्यांना पोहता येते ते जिवाच्या आकांताने पोहून बाहेर येत होते. परंतु काखेत असलेली मुले वाचविण्याच्या प्रयत्नात त्या दोघीही खोल व वाहत्या पाण्यात गेल्या. पाण्याने त्यांना पुन्हा वर येण्याची संधीही दिली नाही.
विष्णू यांच्या बहिणीची मुलगी मीरा गोविंद राठोड मामाकडे आली होती. तीही वाचली नाही. संपूर्ण खोपटी तांडा जातेगावच्या रुग्णालयाच्या आवारात शोकाकूल होऊन बसला आहे. इतर गावाहून आलेले नातेवाईक त्यांना धीर देत आहेत. काल संध्याकाळी आणि आजही तांडय़ावरील चुली पेटल्या नाहीत. तांडय़ावरील सर्व पुरुष कालव्याच्या दुतर्फा थांबून मृतदेह शोधत होता. दुर्घटनेतील रिक्षा कालव्याच्या मुख्य सेवा रस्त्यावर काढून ठेवली होती. या रिक्षात लहान मुलांची पिशवी होती. या पिशवीतच खरेदी केलेल्या नव्या चपला, खेळण्या व बांगडय़ा होत्या. त्यांचे मालक मात्र जगात नव्हते!