Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लातूरमध्ये शनिवारपासून आंबेडकरवादी साहित्य संमेलन
लातूर, २९ एप्रिल/वार्ताहर

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ११८व्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने शनिवार (दि.२) व रविवार (दि.३) आंबेडकरवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत चिकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी हे संमेलन आयोजित केले आहे.
पत्रकार परिषदेस प्रा. अनंत लांडगे, केशव कांबळे, राजेंद्र लातूरकर, प्रा. अशोक ननावरे उपस्थित होते. नगरपालिकेच्या सांस्कृतिक सभागृहात हे संमेलनपार पडणार आहे.
ज्येष्ठ कवी अर्जुन डांगळे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. उद्घाटक अस्मितादर्शकार डॉ. गंगाधर पानतावणे आहेत. या संमेलनात राज्यातील ५० आंबेडकरवादी साहित्यिक सहभागी होणार आहेत. चार परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, आंबेडकरी शाहिरी दर्शन, शोधनिबंध वाचन व डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या विश्व मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणावरील परिचर्चा या संमेलनात होतील.
न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ मे रोजी संमेलनाची सांगता होणार आहे. २ मे रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. चंद्रकांत चिकटे, खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, आमदार चंद्रकांत हंडोरे, आमदार दिलीपराव देशमुख, राणा जगजीतसिंह पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान आणि साहित्यनिर्मिती’, ‘दलित आत्मकथनातील स्त्रीजीवन आणि वास्तव’ हे दोन परिसंवाद होतील.
आंबेडकरी शाहिरीचे पूर्वरंग आणि उत्तररंग यावर चर्चा होईल व रात्री ९ वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. ३ मे रोजी ‘आमची सांस्कृतिक चळवळ थांबली आहे काय’ व ‘संविधानातील मूळ आरक्षण तत्त्व आणि आजचा विपर्यास’ या दोन विषयांवरील परिसंवाद रंगतील.