Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ग्रामपंचायत सदस्य - गावकऱ्यांमध्ये पाणीप्रश्नावरून बाचाबाची
बोरी, २९ एप्रिल/वार्ताहर

 

सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी काही ग्रामपंचायत सदस्यांच्या मध्यस्थीने ठराविक भागात जात आहे. त्यामुळे बऱ्याच भागात पाण्याचा थेंबही येत नसल्याने गावकऱ्यांनीमंगळवारी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन प्रशासक ग्रामसेवक सदाशिव धरणे यांच्यासमोर संबंधित सदस्यांना धारेवर धरले. काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.
बोरीत दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते. हा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत सोळा गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या पाण्याचे वितरण योग्यप्रमाणे होत नसल्याने ठराविक भागातच पाणी जास्त सोडण्यात येत आहे. त्यामुळे गावकरी वैतागले होते. या योजनेचे पाणी सर्वाना मिळावे यासाठी चौकाचौकात सिमेंट रस्ते फोडून ‘व्हॉल्व्ह’ बसविण्यात येत आहेत. पाण्याचे नियोजन नसल्याने निर्जळीला तोंड देण्याची वेळ आलेल्या भागातील नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायतीकडे धाव घेतली.
प्रशासक व ग्रामसेवक सदाशिव धरणे यांच्यासमोर गावकऱ्यांनी व्यथा मांडली.त्यातच ग्रामपंचायत सदस्य मनोहर शिंपले हे मनमानी करीत असून नागरिकांना दमदाटी करीत असल्याचे काहींनी सांगितल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य शिंपले, तस्लीम कुरेशी, काशिनाथ स्वामी यांच्याशी गावकरीांची बऱ्याचदा शाब्दिक चकमक झाली. सर्वचजण हमरी-तुमरीवर आले होते.
कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याने पाणी सोडण्यासाठी जाऊ नये, ज्या भागात पाणी जात नाही तिथे पाण्याची व्यवस्था येत्या दोन दिवसांत करावी अन्यथा पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. श्री. धरणे यांनी पाणी जात नसलेल्या भागाची पाहणी करून तेथील नागरिकांना पाणी कशा पद्धतीने मिळेल याची आखणी केली.
दरम्यान, आम्ही गावातील जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात पाणी कसे मिळेल यासाठी पुढाकार घेऊन नियोजन करीत असल्याचे शिंपले व चौधरी यांनी स्पष्ट केले. पाण्याचे राजकारण न करता हा प्रश्न सुटण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घ्यावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.