Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘पूर्वाचलातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करावेत’
लातूर, २९ एप्रिल/वार्ताहर

 

पूर्वाचलातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पूर्वाचल विकास समितीचे प्रांत कार्यवाह पूनम मेहता यांनी केले.
पूर्वाचलातील विद्यार्थी गेल्या तेरा वर्षांपासून शिक्षणासाठी लातूरमध्ये आहेत. पूर्वाचल विकास समिती आपल्या प्रयत्नातून अशांत सीमा राज्यात भारत जोडोचे काम करत आहे. हे प्रयत्न जनतेपर्यंत पोहोचावेत म्हणून पूर्णानंद मंगल कार्यालयात अलीकडेच वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्या कार्यक्रमात श्रीमती मेहता बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उद्योजक रवींद्र अग्रवाल होते. प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुजा कुलकर्णी उपस्थित होत्या.
पूर्वाचलातील अनेक समस्या मांडून श्रीमती मेहता म्हणाल्या की, तेथील जनतेमध्ये सौहार्द निर्माण करण्याचा संकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोडला आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रमाने पूर्वाचल व उर्वरित भारत यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा सेतू बांधला आहे.
लातूरमधील दानशूर व्यक्तींनी या सेतू बांधण्याच्या कामात खारीचा वाटा उचलावा. मिझोराम, मेघालय व नागालँड या तीन प्रांतांमधील विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्रात आणून त्यांची वसतिगृहे चालविली जातात. पुणे, चिंचवड, सांगली, डोंबिवली, रत्नागिरी, नाशिक, परभणी, लातूर, औरंगाबाद, नांदेड व अंबाजोगाई अशा ११ वसतिगृहात ३६ मुली व १०० मुले शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी १८ हजार रुपये खर्च होतो.
श्री. अग्रवाल यांनी लातूरमधील वसतिगृहातील एका विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्याचे जाहीर केले. डॉ. अनुजा कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविकात मेघालय विद्यार्थी वसतिगृह समितीचे अध्यक्ष अतुल ठोंबरे यांनी वसतिगृहाची माहिती दिली. दानशूर व्यक्तींनी विद्यार्थी दत्तक पालक योजनेत आणि अन्नदानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
मेघालय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मनोरे, सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वसतिगृहाच्या व्यवस्थापिका मनीषा दशरथ, पूर्वाचल विकास समितीच्या कार्यवाह सीमा अयाचित यांच्या कार्याचा पूनम मेहता यांनी या वेळी गौरव केला. श्रीपाद देशपांडे यांनी आभार मानले.