Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पाण्यासाठी हंडय़ा-घागरींसह अधिकाऱ्यांना घेराव
सिल्लोड, २९ एप्रिल/वार्ताहर

 

गावात पाणीटंचाईने कळस गाठल्याने तालुक्यातील पिरोळा येथील पन्नासपेक्षा अधिक महिलांसह गावकऱ्यांनी काल तहसील कचेरी गाठली. रिकामे हंडे घेऊन आलेल्या या महिलांची नायब तहसीलदार अशोक कोकाटे यांनी भेट घेतली. तातडीने टँकर सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
‘आपलं पाणी’ या योजनेतून गावाची पाणीपुरवठा झाली. बोरगाव बाजारलगत पूर्णा नदीच्या काठावर विहीर खोदून वाहिनीद्वारे टाकीत पाणी आणले गेले. ही योजना केल्याने गावाची पाणीटंचाई संपेल, असे गावकऱ्यांना वाटलेही. पण ते फोल ठरले. आठवडय़ापूर्वी ही योजना सुरू झाली. दोन-तीन दिवसच त्या विहिरीने टाकी भरली. त्या विहिरीत बहुधा ते साचलेले पाणी असावे. नंतर विहीर लगेच कोरडीठाक झाली.
गावाच्या लगतच्या विहिरींचीही तीच गत झाल्याने गावातील महिलाच एकत्र आल्या. रिकाम्या हंडय़ा-घागरींसह त्या तहसील कचेरीत आल्या. त्यांनी श्री. कोकाटे यांची भेट घेतली. या महिलांमध्ये संगीता काळे, विमल गायकवाड, पार्वताबाई काळे, गिरजाबाई काळे, चंद्रकला काळे, राधा काळे, जयश्री काळे, कौसाबाई काळे, तान्हाबाई गायकवाड, सकुबाई काळे, सोनाबाई काळे, लक्ष्मी काळे, शोभा काळे, मीना गायकवाड, अंजना काळे, निर्मला काळे, सुमित्रा काळे, राजकन्या गायकवाड, लक्ष्मी नवटे, जनाबाई काळे, अंबिका काळे आदी उपस्थित होत्या.