Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

भास्करराव पाटील हल्लाप्रकरणी सहा जणांना अटक व सुटका
बिलोली, २९ एप्रिल/वार्ताहर

 

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भास्करराव पाटील खतगावकर यांना धक्काबुक्की करून त्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याच्या आरोपावरून कुंडलवाडीतील सहा जणांना अटक करण्यात आली. या आरोपींची बिलोलीच्या न्यायालयाने जामिनावर सोडले.
कुंडलवाडी उपसा जलसिंचन प्रकल्प रखडल्यामुळे शहरातील अनेक शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या प्रकल्पामुळे पाणी तर मिळालेच नाही. उलट या शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढू लागला. शेती विकणे अशक्य झाले. मुलाबाळांचे लग्न, शिक्षणही या शेतकऱ्यांना करताना नाकीनऊ येऊ लागले. शेतकऱ्यांची ही दुरवस्था होण्यास, हा प्रकल्प रखडण्यास तत्कालीन गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भास्करराव पाटील खतगावकरच कारणीभूत आहेत, ही शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्यांविषयी प्रचंड असंतोष खदखदत होता.
लोकसभेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी सायंकाळी खतगावकर कुंडलवाडी येथे काँग्रेसचे कार्यकर्ते राजेश्वर उत्तरवार यांच्या निवासस्थानी आले होते. त्या वेळी असंतुष्ट शेतकऱ्यांनी त्यांना घेरले. उपसा जलसिंचन योजना व शेतकऱ्यांचे अंधकारमय भवितव्य या बाबत जाब विचारू लागले. त्यावरून बाचाबाची झाली व जमावाने खतगावकर यांना धक्काबुक्की केली. यानंतर खतगावकर यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यात म्हटले होते की, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपणास धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली व आपल्या वाहनावर दगडफेक केली. त्यावरून शहरातील ५० ते ६० अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन सहा जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व बिलोली येथील न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. या प्रकरणातील अन्य आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी. टी. आंबेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन करीत आहेत.