Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या कृतिआराखडय़ावर शिक्कामोर्तब
परभणी, २९ एप्रिल/वार्ताहर

 

परभणी जिल्ह्य़ातील पाणीटंचाई कृतिआराखडय़ाची जिल्हा प्रशासनाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भयावह स्थितीत पोहोचला आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी जिल्हा प्रशासनाने आगामी पावसाळ्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आज नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या कृतिआराखडय़ावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
जिल्ह्य़ात गोदावरी, दुधना, पूर्णा, कसुरा, बोरणा, मासोळी, वाण या प्रमुख नद्या व पिंपळगड व इंद्रायणी हे दोन नाले आहेत. जिल्ह्य़ातील २४१ गावांना अतिवृष्टी व पुराची झळ पोहोचण्याची शक्यता गृहीत धरून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्य़ातील २३ गावांचे पूर्णत: तर ७४ गावांचे अंशत: पुनर्वसन करण्याची गरज आहे. त्यापैकी मांगणगाव, कलारीतांडा व निळा या तीन गावांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे.
जिल्ह्य़ात १ जूनपासून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित होत आहे. तसेच चार पथक कार्यान्वित करण्यात येत आहेत. कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प विभागाच्या वतीने ११७ गावांचे पूर रेषेचे नकाशे तयार करण्यात आले आहे.
या बैठकीत लाईफ जॅकेट, बोट दुरुस्ती, कलईची उपलब्धता, प्लास्टिक रिंग, नायलॉन दोऱ्या, दळणवळण यंत्रणा, कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण, जिल्ह्य़ातील पोहणकाराची अद्यावत यादी, तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठका, ग्रामीण व शहरी भागातील गटाराची साफसफाई, पाणी शुद्धीकरण, साथरोग नियंत्रण आरोग्य केंद्रात औषधाचा पुरवठा, गरज भासल्यास तात्पुरता निवाऱ्यासाठी छावण्याच्या जागा निश्चित करणे आदीबाबत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस पोलीस अधीक्षक रघुनाथ खैरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. डी. तडवी, जिल्हा कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रेणुकादास चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. भार्गोदेव, शिक्षणाधिकारी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.