Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्राध्यापक महासंघाचा संपाबाबत कृतिकार्यक्रम जाहीर
औरंगाबाद, २९ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

सहावा वेतन आयोग आणि प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने कृतिकार्यक्रम जाहीर केला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या २३ जुलैपासून बेमुदत संप पुकारले जाईल, असा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची (एमफुक्टो) बैठक आमदार व्ही. टी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत राज्य शासनाच्या उदासीन भूमिकेबद्दल या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. केंद्रीय अनुदान आयोगाच्या शिफारशीनुसार मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे २० डिसेंबरला विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी सहावा वेतन आयोग लागू करण्याचा अध्यादेश जारी केला होता.
एक रुपयाचेही अर्थसहाय्य नसताना हकीम समितीच्या अहवालानुसार १७ लाख राज्य कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग राज्य सरकार लागू करते. राज्य शासन आपला निर्णय आपला निर्णय लांबणीवर टाकत आहे, अशी भावना प्राध्यापकांमध्ये निर्माण झाली आहे. १९९१ ते डिसेंबर १९९९ दरम्यान नियुक्त झालेल्या प्राध्यापकांना नेटसेट लागू होत नसल्याने नियुक्तीच्या तारखेपासून पदोन्नतीसाठी सेवा ग्राह्य़ धरून थकबाकी रक्कम अदा करावी, अशी मागणीही प्राध्यापक महासंघाने केली आहे. पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम द्यावी, एम. फील व पीएच.डी.धारक प्राध्यापकांच्या नियुक्तीस मान्यता मिळावी, विनाअनुदानित धोरण बंद करा, महाविद्यालयीन पातळीवर संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी योजना जाहीर करा आदी मागण्या प्राध्यापकांच्या प्रलंबित आहेत. प्राध्यापकांना सहावा वेतन आयोग आणि प्राध्यापक भरती होताना धारण करावयाच्या नेटसेटच्या पात्रता अटीविषयी निर्णय शासनाने लवकर न घेतल्यास राज्यातील प्राध्यापक नाईलाजाने बेमुदत संपावर जातील, यासाठी आंदोलनाचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला.
या आंदोलनामध्ये प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी सहसंचालकांना निवेदन, निदर्शने, धरणे आंदोलन, सामूहिक रजा अशा टप्प्यांचा समावेश आहे. शेवटी बेमुदत संप करण्यात येईल, अशी माहिती महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. विठ्ठल मोरे आणि उपाध्यक्ष डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.