Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सुरक्षा रक्षकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न
औरंगाबाद, २९ एप्रिल/प्रतिनिधी

 

अवैधरीत्या मांसविक्री करणाऱ्या दोघांनी महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. टीव्ही सेंटर येथील संजय गांधी मटन मार्केटमध्ये आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुरक्षा रक्षकांनी पळ काढल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही.
याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असल्याचे सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयाचे संचालक आणि या विभागाचे प्रमुख डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.
उमेश संपत पाहुरे आणि अनिल कंठाळे अशी या हल्ला करू पाहणाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे परवाना नाही. या भागात परवान्याशिवाय मांस विक्री करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. याला कायमचा पायबंद बसावा यासाठी पालिकेच्या वतीने तेथे कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. आज तेथे सहा सुरक्षा रक्षक तैनात होते. पाहुरे आणि कंठाळे यांनी मांस विक्री सुरू केल्याचे दिसताच त्यांची दुकाने बंद करण्यासाठी सुरक्षा रक्षक सरसावले असता दोघांनीही त्यांना शिवीगाळ केली आणि मांस कापण्याचा सुरा तसेच भाला घेऊन सुरक्षा रक्षकांच्या अंगावर धावून आले.
सुरक्षा रक्षकांकडे साधे दंडही नव्हते. त्यामुळे घाबरून त्यांनी तेथून पळ काढला. या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. चौकशी अहवालानंतर सायंकाळी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असल्याचे डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले.