Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

खतविक्रेता संघटना आंदोलनाच्या तयारीत
मालवाहतूक खर्चावर चर्चा
हिंगोली, २९ एप्रिल/वार्ताहर

 

खत उत्पादक कंपन्यांनी ‘लिकिंग’ची बंधने उठविली नाही तर राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय खतविक्रेत्यांनी बैठकीत घेतला. या बैठकीत खतविक्रेता संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. खतविक्रेता संघटनेची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत खतविक्रेत्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. या वेळी खतविक्रेत्यांनी खत उत्पादक कंपन्यांकडून लिकिंगची बंधने लावली जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच वाहतुकीचा खर्च दुकानदारांना देण्यास होत असलेली टाळाटाळ, वाहतुकीचा खर्च दुकानदारांना देण्यास होत असलेली टाळाटाळ; त्यामुळे व्यापाऱ्यांवर लागणारा भार तसेच वाहतुकीचा खर्च विक्रीमध्ये लावण्यात येत असलेली कायद्याची अडचण या प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. शेवटी लिकिंगच्या प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्चेत सुभाष कागलीवाल, सुनील शर्मा, रुपचंदजी बज, चंद्रशेखर नीलावार आदी सहभाग झाले. याच बैठकीत खत विक्रेता संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष: त्र्यंबकराव लोंढे, उपाध्यक्ष: नंदकिशोर प्रजापती, सचिव: संतोष डोईफोडे, कोषाध्यक्ष: ज्ञानेश्वर वानखेडे असे पदाधिकारी निवडले आहेत.

गैरव्यवहार करणाऱ्या खतविक्रेत्यांना तंबी
खतव्यापाऱ्यांनी खतांच्या विक्रीमध्ये गैरप्रकार केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या आधारे गुन्हा दाखल केला जाईल, अशी तंबी जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने खत विक्री प्रश्नावर मंगळवारी खतव्यापाऱ्यांची बैठक घेतली. या वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश मांज्रीकर, कृषी विकास अधिकारी कच्छवे आदी उपस्थित होते. छापील किंमतीत खताची विक्री करणे, दुकानातील उपलब्ध साठा व त्याच्या किमतीचे भावफलक लावणे अपेक्षित असून जे व्यापारी खताच्या विक्रीत गैरप्रकार करीत असल्याचे निष्पन्न झाल्यास अशा दोषी व्यापाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मांज्रीकर यांनी दिला.