Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

३५ गावांना अशुद्ध पाणीपुरवठा
उस्मानाबादमध्ये पाणीटंचाई
उस्मानाबाद, २९ एप्रिल/वार्ताहर

 

जिल्ह्य़ात पाणीटंचाई तीव्रतेने भासू लागली आहे. सहा टँकरने पाच गावांत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्य़ातील ३५ गावांत पाणीपुरवठा शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये वीस टक्क्य़ांपेक्षा कमी क्लोरिनचे प्रमाण आढळल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचेही प्रशासनाच्या लक्षात आले आहे. या ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य यंत्रणेने नोटिसा दिल्या आहेत.
जिल्ह्य़ात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. उमरगा तालुक्यातील माडज व कलदेव निंबाळा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने तेथे टँकरने पाणीपुरवठा होत आहे. भूम तालुक्यातील आष्टावाडी, कळंबमधील ताडगाव, वाशी तालुक्यातील दहिफळ येथेही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्य़ात २९७ ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याने उपलब्ध पाणीसाठय़ातून पाणीपुरवठा करण्यापूर्वी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला. पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक कोटी ६८ लाख रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. जिल्ह्य़ातील पाणीसाठय़ामध्ये मार्च अखेरपर्यंत उपयुक्त पाणीसाठा समाधानकारक होता. उन्हाची तीव्रता वाढल्याने उपलब्ध पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
काही ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या ब्लिचिंग पावडर सदोष असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे साथीचे रोग येण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना कळविले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ११ ग्रामपंचायती, कळंब मधील पाच, परंडय़ातील सहा व तुळजापूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी कधी आठ दिवसाला तर कधी पंधरा दिवसाला पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.