Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

तुळजापुरात पाणीटंचाईने नागरिक त्रस्त
तुळजापूर, २९ एप्रिल/वार्ताहर

 

विक्रमी उष्ण तापमानाबरोबरच तुळजापूर क्षेत्री येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत असल्याने पाण्याची गरज रोज वाढतेच आहे. पण गरजेच्या तुलनेत पाणीपुरवठा अपुरा असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
शहराभोवती व लगत पाणी उपलब्ध नाही. माथ्यावर वसलेल्या या वसाहतीत काही गल्ल्या सखल भागात आहेत, तर काही उंचावर आहेत. अनेक गल्ल्यातील जलवाहिन्या छोटय़ा व जुनाट आहे. याच वाहिन्याद्वारे पाणी घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत दहा-अकरा पटीने वाढ झाली आहे. मंकावर्ती गल्ली, साळुंके गल्ली, रावळगल्ली, कासार गल्ली यासारख्या भागातील नळग्राहकांना चार-पाच घागरी पाणी मिळणेही कठीण झाले आहे. त्यात वीजकपातीवर मात करीत पाणीपुरवठा करण्याची कसरत नगरपालिकेला करावी लागत आहे.
शहरात येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या व तोकडा पाणीपुरवठा या समस्येवर मात करण्यासाठी या इलाजाने अनेक कुटुंबांनी आता पाणी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाढती गरज व मागणी लक्षात घेऊन ७० ते १०० रुपये टाकी या दराने पाणी विकणाऱ्या व्यावसायिकाची सध्या चांदी होत आहे. पाणी विक्रीच्या माध्यमाने रिक्षाधारक रोज दोन-अडीच हजारांची कमाई करीत आहेत. शहरात पालिकेतर्फे एक वेळ पाणीपुरवठा होतो. काही भागात मात्र अल्पक्षमतेच्या जुनाट जलवाहिनीमुळे पाणीपुरवठा होतो. व त्यांना टंचाईला तोंड द्यावे लागते.
नगरपालिका प्रशासन व महावितरण यांनी सुसंवाद प्रस्थापित करून व नियोजन करून पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे. दरम्यान काही मर्जीतील पत्रकारांना बोलावून नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगळे यांनी प्रशासनाच्या अडचणी सांगितल्याचे समजते.