Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लोहा बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
लोहा, २९ एप्रिल/वार्ताहर

 

उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या बसस्थानकातील मजबुतीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे; त्यामुळे चालक सोयीप्रमाणे कोठेही एस.टी गाडय़ा उभ्या करतात त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
गेल्या दोन वर्षांपूर्वी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते बसस्थानकाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. ‘बीओटी’ तत्त्वावर बसस्थानक आणि लगतच्या गाळ्याची उभारणी करण्यात आली आहे. बसस्थानकातील काम कासवगतीने सुरू आहे; त्यामुळे उन्हातही प्रवाशांना सावलीचा आडोसा शोधत बसची वाट पाहत कोठेही उभे रहावे लागत आहे. बसचालक आपल्या सोयीनुसार गाडय़ा उभ्या करतात. काम सुरू असल्यामुळे चालकांना गाडी लावण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. त्याचा परिणाम प्रवाशांना सोसावा लागतो.दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची सोय बसस्थानकात नाही. ‘बहुजन सुखाय’ या ब्रीदाशी वाहून घेतलेल्या आगारामुळे ‘प्रवासी त्रासाय’ची अवस्था बनली आहे.
बसस्थानकात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना बाजूच्या हॉटेलकडे धाव घ्यावी लागत आहे. शिवाय बसस्थानकात दोन रुपये खर्चून पाण्याचे पाऊच विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. कंधार आगाराने प्रवाशांना पाण्याची सोय उपलब्ध करून दिली नाही. सुटय़ांचा हंगाम असल्यामुळे गाडय़ांना गर्दी होत आहे. बालाजी कळसकर - विठ्ठल कळसकर यांनी स्वखर्चातून पाणपोई उभारली आहे. पण ही सेवा अपुरी आहे. बाहेरील राज्याच्या गाडय़ा तर बसस्थानकात न जाता रस्त्यावरच उभ्या राहत आहेत. बसस्थानकांचे काम लवकर पूर्णत्वास जावे व पाण्याची सोय त्वरित करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.