Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

३१ गावे, १४ वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा
लातूर, २९ एप्रिल/वार्ताहर

 

वैशाख वणवा संपूर्ण जिल्हाभर जाणवत असून उन्हाच्या काहिलीने जिल्ह्य़ातील जनता त्रासून गेली आह. त्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे लोक त्रस्त आहेत.
जिल्ह्य़ातील दहा तालुक्यांतील एकतीस गावे व चौदा वाडय़ांना सव्वीस सरकारी व वीस खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. पाणी मिळविण्यासाठी जिल्ह्य़ातील ६८ गावांतील व तेवीस वाडय़ांतील १०४ विहिरी व विंधन विहिरी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यावर्षी सर्वाधिक पाणीटंचाईला उदगीर व जळकोट तालुक्याला सामोरे जावे लागत आहे. उदगीरमधील आठ गावे व चार वाडय़ा, जळकोटमधील सहा गावे व चार वाडय़ांना अठरा टँकरने पाणीपुरवठा होत आहे. एप्रिलमधील टँकरची ही आकडेवारी असली तरी मे महिन्यात टँकरच्या संख्येत दुपटीने वाढ करावी लागणार असल्याचा अंदाज आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे जिल्ह्य़ातील जलाशयातील पाण्याची पातळी अतिशय वेगाने खाली जात आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात केवळ अठरा टक्के तर निम्नतेरणा प्रकल्पात अठ्ठावीस टक्के पाणीसाठा आहे. आठ मध्यम प्रकल्पांपैकी दोन प्रकल्पातील पाण्याची पातळी जोत्याखाली गेली आहे. १०९ लघु प्रकल्पांपैकी दहा लघुप्रकल्प कोरडेठाक तर ४९ लघु प्रकल्पातील पाण्याची पातळी जोत्याखाली आहे. मागील वर्षी धनेगाव धरण १०० टक्के भरले होते. त्यानंतर पाण्याची पातळी खालावत गेली.