Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

परभणी-नांदेड रस्त्यावरील अवैध वाहतूक चालूच
वसमत, २९ एप्रिल/वार्ताहर

 

तालुक्याच्या सीमेलगत नांदेड जिल्ह्य़ात अवैध वाहतूक करणाऱ्या जीपचा व ट्रकचा मोठा अपघात होऊन दहा जण जागीच ठार होऊनही वसमत तालुक्यातील काळीपिवळी व अवैध वाहतूक करणारी वाहने आज बाजार दिवस असल्याने परभणी-नांदेड या महामार्गावरून होताना दिसत होती. त्यामुळे पोलीस प्रशासन किती बेफिकीर आहे याचा नमुना पाहावयास मिळाला.
सध्या वसमत तालुक्यात अवैध धंद्यांनी कहर केला आहे. त्यामध्ये अवैध वाहतूक प्रथम क्रमांकावर असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे परभणी-वसमत या महामार्गावर दररोज ३०० च्या जवळपास काळीपिवळी व अवैध वाहतूक करणारे जीप धावत आहे. आसन क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवासी मेंढरांप्रमाणे जीपमध्ये बसून बिनधास्त धावत आहे तर वसमत-मालेगाव मार्ग नांदेड या रस्त्यावरून अवैध ऑटो वाहतूक जोरात आहे. याकडे तीनही जिल्ह्य़ाच्या पोलीस अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंधातून दुर्लक्ष केले जात आहे. २७ ला नांदेड जिल्ह्य़ातील हिमायतनगर तालुक्याचील २२ कि.मी. अंतरावरील एका काटय़ावर काळीपिवळी व ट्रक यांची टक्कर होऊन १० जण ठार झाले. यानंतर हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासन काही बोध घेऊन जिल्ह्य़ातील पोलीस यंत्रणेला अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचे आदेश देतील, असे वाटत होते. पण याबाबत पोलिसांचा सतर्कता पाहावयास मिळाली. कारण आज वसमतला बाजार दिवस असल्याने बाजार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात ग्रामीण नागरिक येतात. परभणी, नांदेड, कारखाना रस्ता आदी महत्त्वाच्या रस्त्यावरून अवैध वाहनाच्या टपावर बसून नागरिक येताना दिसून येत होती. विशेष म्हणजेकारखाना रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ उपविभाग पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. याच कार्यालयाबाजूस जीपचा थांबा आहे. जीपमध्ये व जीपच्या वरही प्रवासी भरभरून येत असताना पोलीस कर्मचारी मात्र बघ्याची भूमिका बजावताना दिसून येत आहे. बसस्थानक परिसरात वाहतूक पोलीस नियुक्त असताना ऑटोमध्ये आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसून बिनधास्त नांदेड फेऱ्या करताना दिसून येतात. सीमालगत जिल्ह्य़ात एवढी मोठी घटना होऊनही पोलीस यंत्रणेला का जाग आली नाही, हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. पोलीस प्रशासन किती जागृत आहे, याचा नमुना वसमत येथे पुन्हा एकदा पाहावयास मिळाला.