Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
प्रादेशिक

मनसेच्या ‘लाखाची गोष्ट’ची युतीला भीती!
मुंबई, २९ एप्रिल/प्रतिनिधी

मुंबई, ठाणे येथील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक मते खाल्ली तर शिवसेना-भाजप युतीची दाणादाण उडेल, अशी भीती युतीचे नेते खासगीत व्यक्त करीत आहेत. ही ‘लाखाची गोष्ट’ प्रत्यक्षात येऊ नये याकरिता शिवसेनेने जोरदार फिल्डींग लावली आहे. ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात लाखभर रुपये खर्च करताना दमछाक कशी होते ते दाखवले आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी लाखभर मते घेतली तर युतीची दमछाक होण्याची भीती आहे.

मुदतवाढ किंवा पुनíनयुक्ती देण्यास राज्य सरकारला मनाई
मुंबई, २९ एप्रिल/प्रतिनिधी

मुख्यमंत्री कार्यालयातील पाच अधिकारी/कर्मचाऱ्यांसह एकूण आठ अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर दिलेल्या पुनर्नियुक्तीसंबंधीचे सर्व रेकॉर्ड हजर करून या नियुक्त्यांचे समाधानकारक समर्थन राज्य सरकार करीत नाही तोपर्यंत निवृत्त होणाऱ्या कोणाही कर्मचाऱ्यास अथवा अधिकाऱ्यास मुदतवाढ किंवा पुनर्नियुक्ती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला मनाई केली. डॉ. जगन्नाथ ढोणे आणि गजानन दाळुगुरुजी यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. बिलाल नाझकी व न्या. श्रीमती विजया कापसे-ताहिलरामाणी यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला.

भरत बोरगे याच्या मृत्यूचे गूढ कायम
*
सीबीआय चौकशीची कुटुंबियांची मागणी
* गरज भासल्यास रिलायन्स अधिकाऱ्यांची चौकशी
* हेलिकॉप्टर दुरुस्तीचे कंत्राट रिलायन्सकडून रद्द

मुंबई, २९ एप्रिल / प्रतिनिधी

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमधील इंधन टाकीत दगड असल्याचे उघडकीस आणणाऱ्या तंत्रज्ञ भरत बोरगे याच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. शवविच्छेदन अहवालात मल्टिपल फ्रॅक्चर आणि मेंदूतील रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असे सांगत प्रथमदर्शनी हा अपघाती मृत्यू असल्याचा दावा रेल्वे पोलिसांनी आज पुन्हा एकदा केला. पुढील तपासात गरज भासल्यास रिलायन्स अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, असेही रेल्वे पोलीस आयुक्त ए. के. शर्मा यांनी स्पष्ट केले. बोरगे याच्या कुटुंबियांनी मात्र त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गावाहून पळून आलेल्या मुलीच्या जीवावर खंडणी उकळू पाहणाऱ्या दुकलीला अटक
पनवेल, २९ एप्रिल/प्रतिनिधी
घरच्यांशी झालेल्या भांडणापायी उत्तर प्रदेशातील शहागंज येथून मुंबईत पळून आलेल्या सोमया अन्सार खान (वय १४) या मुलीला मदत करण्याचे भासवून प्रत्यक्षात तिचे अपहरण करून तिच्या मामाकडून ५० हजार रुपयांची खंडणी उकळू पाहणाऱ्या श्रवणकुमार (२९) आणि अजयकुमार निषाद (४०) या दुकलीला कळंबोली पोलिसांनी बुधवारी उरण येथे अटक केली.

मतदानापूर्वी ठाण्यात पकडली १५ लाखांची रोकड
ठाणे, २९ एप्रिल/प्रतिनिधी

मतदानाला काही तास शिल्लक असताना घोडबंदर रोडवर उभ्या असलेल्या एका वाहनातून पोलिसांनी १४ लाख ५० हजार रुपयांची रोकड हस्तगत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठी आलेली होती, असे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि राजकीय नेत्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या पाज जणांची पोलीस चौकशी करीत असून त्यांनी यासंबंधी आयकर विभागाकडून माहिती मागविली आहे.

तलासरीत शांततेत मतदानासाठी चोख बंदोबस्त ठेवा
विनोद तावडे यांची मागणी
ठाणे, २९ एप्रिल/प्रतिनिधी

पालघर मतदारसंघातील तलासरी या मूळच्या मार्क्‍सवादी कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात असलेल्या १८ मतदान केंद्रांचा समावेश अतिसंवेदनशील मतदान केंद्रांच्या यादीत आहे. येथील निवडणुकांत होणाऱ्या हिंसाचाराच पूर्वइतिहास लक्षात घेता यावेळचे मतदान शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली आहे.

कसाब खटला : रस्ताबंदीचा विषय कोर्टाने तज्ज्ञांवर सोपविला
मुंबई, २९ एप्रिल/प्रतिनिधी

मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यासंबंधीचा मोहम्मद अजमल कसाबवरील खटला विनाविघ्न पार पाडण्यासाठी योजायचे सुरक्षेचे उपाय आणि त्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांची होणारी गैरसोय या दोन्हींमधून सुवर्णमध्य कसा काढायचा हे ठरविण्याचे काम मुंबई उच्च न्यायालयाने आज तज्ज्ञांवर सोपविले.

कसाबला हवी आहेत वृत्तपत्रे,
दंतमंजन आणि अत्तरसुद्धा!
मुंबई, २९ एप्रिल/प्रतिनिधी

कारागृहातील व्हरांडय़ात फिरण्याची मुभा द्यावी, ताजेतवाने राहण्यासाठी अत्तर द्यावे, दंतमंजन द्यावे आणि वाचण्यासाठी वृत्तपत्र द्यावे आदी मागण्या अजमल कसाब याने आज विशेष न्यायालयाकडे केल्या. कसाबने आपले वकील अब्बास काझमी यांना दिलेल्या पत्रात उपर्युक्त वस्तू देण्याची विनंतीवजा मागणी केली आहे. हे पत्र काझमी यांनी न्यायालयापुढे ठेवले. न्या. एम. एल. टहलियानी यांनी कसाबला कोणते वृत्तपत्र हवे आहे, असे विचारले असता त्याने ऊर्दू टाइम्स असे उत्तर दिले. कसाबने म्हटले आहे, महाशय या वस्तूंची आपल्याला त्वरेने गरज आहे. तसेच पोलिसांना आदेश द्यावेत की, मला अटक करताना जी रक्कम जप्त करण्यात आली ती आपल्या कारागृहातील खात्यावर जमा करावी. त्याचबरोबर कारागृहात आपल्याला ठेवण्यात आलेल्या कक्षाच्या बाहेरील व्हरांडय़ात फिरण्याची मुभा द्यावी व त्यासाठी सुरक्षा रक्षकांना काळजी करण्याचे कारण नाही. एकाच कक्षात राहून माझे मानसिक संतुलन ढळत चालले आहे. भविष्यात स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून या मागण्या मान्य कराव्या, असे कसाबने म्हटले आहे.

विठ्ठल उमप, सुरेखा पुणेकरांच्या मार्गदर्शनाखाली लोकनृत्य प्रशिक्षणाचे आयोजन
मुंबई, २९ एप्रिल / प्रतिनिधी

ठाणे येथील लोकरंग सांस्कृतिक मंचतर्फे लोकनृत्य प्रशिक्षण शिब्ीाराचे आयोजन करण्यात आले आहे. कोर्ट नाका येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र १ मधील स.पा. जोशी सभागृहात ५ ते १५ मे दरम्यान होणाऱ्या या शिबिरात लावणी, गोंधळ, जागरण, चक्री, घुमर, भांगडा आदी लोकनृत्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या शिबिरात लोकशाहीर विठ्ठल उमप, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, वैशाली परभणीकर, चित्रपट नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार, छगन चौगुले, प्रा. गणेश चंदनशिवे आदी मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी शैला खांडगे-९९८७३३३८९३ अथवा ९८९२४२३५११ या क्रमांकावर संपर्क साधावा.